स्टर्न, ओटो : (१७ फेब्रुवारी १८८८—१७ ऑगस्ट १९६९). जर्मन-अमेरिकन भौतिकीविज्ञ. त्यांनी ⇨ रेणवीय शलाका विकसित करून त्याचा उपयोग प्रोटॉनाचे चुंबकीय गुणधर्म आणि चुंबकीय परिबल यांच्या अभ्यासासाठी केला. त्यांना १९४३ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक प्रोटॉनाच्या चुंबकीय परिबलाचा शोध लावल्याबद्दल मिळाले.

ओटो स्टर्न

स्टर्न यांचा जन्म सोरो ( अप्पर सायलेशिया, जर्मनी ) येथे झाला. त्यांनी ब्रेस्लॉ विद्यापीठातून भौतिकीय रसायनशास्त्र या विषयातील पीएच्.डी. पदवी संपादन केली (१९१२). त्याचवर्षी त्यांनी ॲल्बर्ट आइन्स्टाइन यांच्यासमवेत प्राग आणि झुरिक विद्यापीठांत संशोधन केले. ते फ्रँकफुर्ट येथील विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकी या विषयाचे प्राध्यापक (१९१४—२१), रॉस्टॉक विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकीचे सहप्राध्यापक (१९२१-२२) आणि हँबर्ग विद्यापीठात भौतिकीय रसायनशास्त्राचे प्राध्यापक व तेथील प्रयोगशाळेचे प्रमुख संचालक होते (१९२३—३३). तसेच ते पिट्सबर्ग (युनायटेड स्टेट्स) येथील कार्नेगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत भौतिकीचे संशोधन प्राध्यापक होते (१९३३—४५).

स्टर्न यांनी विशेषत: सांख्यिकीय ऊष्मागतिकी आणि पुंज सिद्धांत या सैद्धांतिक भौतिकीच्या विषयातच आपले संशोधन कार्य (१९१२—१८) करून त्याविषयीचे शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यांनी १९१९ मध्ये प्रायोगिक भौतिकीच्या कार्यावर भर दिला. रेणवीय शलाका पद्धतीचा उपयोग त्यांनी अणू, रेणू आणि अणुकेंद्रकाचे गुणधर्म शोधण्याकरिता केला. या रेणवीय शलाका पद्धतीच्या साहाय्याने त्यांनी जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांचा वायूतील वेग वंटनाचा नियम पडताळून पाहिला. त्यांनी १९२१ मध्ये गेरलॉक यांच्यासमवेत बाह्य चुंबकीय क्षेत्रामुळे अणूंच्या चुंबकीय परिबलावर होणारा परिणाम व त्यामुळे होणारे अणूंचे विचलन यासंबंधीचा प्रयोग केला. हा प्रयोग पुंज सिद्धांतामध्ये एक महत्त्वाचा प्रायोगिक पाया मानण्यात येतो. त्यानंतर त्यांनी रेणवीय शलाका पद्धतीचा उपयोग प्रोटॉनाच्या चुंबकीय परिबलाचे मापन करण्याकरिता केला.

स्टर्न यांनी हायड्रोजन व हीलियमाच्या किरणांचा उपयोग करून अणु-रेणूच्या प्राकृतिक तरंगाचे प्रात्यक्षिक घडवून आणले. स्टर्न यांना बर्कलीमधील कॅलिफोर्निया विद्यापीठाद्वारे एल्.एल्.डी. या पदवीने सन्मानित करण्यात आले (१९३०). ते नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन ॲसोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स आणि अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी या संस्थांचे सदस्य होते.

स्टर्न यांचे बर्कली (कॅलिफोर्निया) येथे निधन झाले.

एरंडे, कांचन