झार : रशियातील मस्कोव्हीच्या (मॉस्को) राजपुत्रांनी धारण केलेले एक बिरुद. ही संज्ञा रोमन सम्राटांच्या सीझर या अभिधानाचा अपभ्रंश आहे. राजघराण्यातील इतर व्यक्तींनाही त्यामुळे अशीच नावे प्राप्त झाली उदा., झारची पत्नी–झारित्सा युवराज–झारेविश राजकन्या–झारेव्हना इत्यादी. एकोणिसाव्या शतकात थोरला राजकुमार व भावी वारसदार यांना झेसारेव्हिच म्हणत.
मध्ययुगीन रशियात बायझंटिन सम्राटास झार हे बिरुद लाविले जात असे. तो ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चचा प्रमुख मानला जाई. १२४० च्या सुमारास तातार खान हा रशियाचा अधिपती झाला व त्याला रशियन कागदपत्रांत झार म्हणून उल्लेखण्यात आले. बायझंटिन साम्राज्याच्या अवनतीनंतर (१४५३) व रशिया स्वतंत्र झाल्यानंतर (१४८०) रशियातील सत्ताधीश झार हे बिरुद स्वतःसाठी वापरू लागले.
तुर्की लोकांनी बाल्कन द्विपकल्पात सत्ता प्रस्थापित केल्यावर ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चचे धर्मगुरू रशियन सत्ताधीशांकडे आपले संरक्षणकर्ते या दृष्टीने पाहू लागले. त्यामुळे रशियन राजा हा त्या चर्चचा प्रमुख झाला. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला फिलोफेई या धर्मगुरूने राजपुत्र तिसरा व्हस्यिल्यी याला लिहिलेल्या पत्रात मॉस्कोचा तिसरे रोम असा उल्लेख केला. त्यामुळे राजकीय व धार्मिक दृष्ट्या राजा हा सर्वश्रेष्ठ मानण्यात येऊ लागला. १४७२ मध्ये मॉस्कोचा तिसरा इव्हान या राजपुत्राने सॉफिया पॅलिऑलोगस (शेवटच्या बायझंटिन सम्राटाची पुतणी) हिच्याबरोबर विवाह केला. तिने आपल्याबरोबर बायझंटिन रूढी, रीतिरिवाज आणले. त्यांमधून दुहेरी गरुडाची मुद्राही आली. साहजिकच ही दुहेरी गरुड-मुद्रा रशियन राजाच्या वापरात आली. पुढे १५४७ मध्ये चौथ्या इव्हानने अधिकृतपणे झार हा किताब धारण केला. त्याला राज्याभिषेक करणाऱ्या प्रमुख धर्मगुरूने सांगितले की, ‘तुला देवाने चर्चच्या संरक्षणार्थ तसेच लोककल्याणार्थ व देशाचे संरक्षण करण्याकरिता धाडले आहे’. झारची सत्ता जरी अमर्याद असली, तरी प्रत्यक्षात त्यावर रीतिरिवाज व रूढी यांची बंधने होती. एवढेच नव्हे, तर चर्चचे वर्चस्व होते. धर्माव्यतिरिक्त इतर बाबींत बॉयर्स नावाची परिषद राजास सल्ला देई तसेच न्यायाच्या बाबतीत पूर्वी झालेले १४९७, १५५० व १६४९ चे कायदे राजाला डावलता येत नसत. तथापि झार हा लष्करी हुकूमशाह होता आणि रशियाचे स्वतंत्र अस्तित्व टिकविण्याची त्याची धडपड चालू होती. १७२१ मध्ये पीटर द ग्रेटने झार हे बिरुद आपल्या नावातून काढून टाकून रशियाचा सम्राट हे बिरुद धारण केले.
देशपांडे, सु. र.