झाईरे : काँगो लोकसत्ताक गणतंत्र व त्यापूर्वीचे बेल्जियन काँगो. आफ्रिकेतील काँगो नदीच्या खोऱ्याचा बहुतेक भाग व नाईलच्या वरच्या खोऱ्याचा थोडासा भाग व्यापणारे राष्ट्र. क्षेत्रफळ सु. २३,४५,४०९ चौ. किमी. लोकसंख्या सु. २,१६,३७,९०० (१९७०). हा देश ५° ३०’ उ. ते १३° २८’ द. व १२° १०’ पू. ते ३१° १५’ पू. यांदरम्यान आहे. शेजारच्या काँगो प्रजासत्ताकापासून वेगळे ओळखू येण्यासाठी राजधानीवरून याला काँगो (किन्शासा) व त्याला काँगो (ब्रॅझाव्हिल) म्हणत. १९७१ पासून या देशाने झाईरे हे नाव धारण केले आहे. याच्या उत्तरेला मध्य आफ्रिका संघराज्य व सूदान आणि पूर्वेस युगांडा, रूआंडा, बुरूंडी, टांझानिया व झँबिया हे देश आणि अल्बर्ट, एडवर्ड, किवू, टांगानिका व म्वेरू या सरोवरांचे पूर्वेकडील भाग आहेत. दक्षिण झँबिया व अंगोल हे देश असून पश्चिमेस अवघ्या ४० किमी. किनाऱ्यावर अटलांटिक महासागार, अंगोलाचा काबिंदा हा तुटक प्रांत, काँगो (ब्रॅझा.) व मध्य आफ्रिका संघराज्य आहेत. काँगो (झाईरे) नदीच्या मुखाचा दक्षिण किनारा अंगोलाकडे आहे. किन्शासा (पूर्वीचे लिओपोल्डव्हिल) ही राजधानी आहे. या लेखात शक्य तो देशासाठी झाईरे व नदीसाठी काँगो ही नावे वापरली आहेत.

या देशात सापडणाऱ्या विशिष्ट खनिजांमुळे त्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व होतेच. पहिल्या अणुबाँबसाठी लागलेले युरेनियम शाबा (कटांगा) येथील खाणीतून आलेले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या अनेक आफ्रिकी राष्ट्रांतील प्रश्न नऊ देशांशी सरहद्द भिडलेल्या या देशात अधिकच तीव्रतेने जाणवू लागले आणि संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या सशस्त्र साह्यामुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात त्याचा फारच बोलबाला झाला.

भूवर्णन : काँगो नदी एका विस्तृत द्रोणीसारख्या पठारावरून वाहते. तुंबा आणि माइएन्डॉम्डी (लिओपोल्ड– २) या सरोवरांभोवतीच्या झाईरेच्या मध्यभागाची उंच ३३८ मी. पर्यंत आहे. काँगोच्या जलवाहनप्रदेशाचा सु. ६७% भाग या देशात आहे. माताडीपासून खालच्या भागात नदीच्या उजव्या बाजूस मायूंबेचा डोंगराळ प्रदेश आहे. अरुंद किनारी मैदानाच्या मागे क्रिस्टल पर्वत आहे. अंगोलाच्या सरहद्दीवर, देशाच्या दक्षिण भागात सु. ७०० मी. उंचीचे क्वांगो पठार व कासाई आणि शाबा पठारे आहेत. यांतच लूबूंबाशी (१,१०० मी.), मानीका (१,४६० मी.), कुंडेलूंगू (१,५५० मी. ) आणि किबारा (१,७०० मी.) ही छोटी पठारे समाविष्ट असून त्यांच्या दरम्यान कामालोंडा-उपेंबा द्रोणीप्रदेश, लूफीरा मैदान, म्वेरू सरोवर व लूआपूला खोरे हे सखल भाग आहेत. उत्तरेकडे काँगोचे खोरे चॅडपासून व नाईलच्या खोऱ्यापासून ऊबांगी- वेले या बुटक्या पठारांनी अलग झालेले आहे. पूर्वेकडे खोऱ्याची कड एकदम उंच झालेली असून तेथे आफ्रिकेच्या मोठ्या खचदरीच्या काठावर २,४८३ मी. उंच मिटुंबा पर्वताची एक रांगच उभी आहे. या खचदरीच्या खळग्यांतून टांगानिका, किवू, एडवर्ड व ॲल्बर्ट ही सरोवरे साचलेली आहेत. किवू सरोवराच्या उत्तरेस लाव्हाच्या विस्तीर्ण थरांतून व्हीरुंगाची ज्वालामुखी शिखरे वर आलेली आहेत. ॲल्बर्ट व एडवर्ड सरोवरांच्या दरम्यान युगांडाच्या सरहद्दीवर रूवेनझोरीची पर्वतराजी असून त्यात या देशातील सर्वोच्च, सतत बर्फाच्छादित असलेले शिखर मौंट एन्गालीएमा असून त्याची मौंट मार्गारीटा व मौट अलेक्झांड्रा ही अनुक्रमे ५,१०९ मी. आणि ५,१७५ मी. उंचीची टोके आहेत. देशाच्या मध्यभागातही छोटी पठारे, पायऱ्यापायऱ्यांसारखे प्रदेश, क्वचित दलदलींनी भरलेली दऱ्याखोरी व त्यांवर लोंबलेले कडे असे दृश्य दिसते.

काँगो खोरे क्रिटेशस कालखंडात तयार होऊ लागले. तृतीय-कल्पातील भूमीच्या हालचालींमुळे पूर्वेकडील पर्वत व द्रोण्या तयार झाल्या. किवू भागातील ज्वालामुखी क्रिया तृतीयक कालाच्या शेवटी सुरू झाली व ती अद्याप चालूच आहे. झाईरेतील खडकांचा पृष्ठभाग अगदी कुजून गेला असून येथे जीवाश्म जवळजवळ सापडतच नाहीत. बोमा आणि समुद्रकिनारा यांच्या दरम्यान सामुद्री रचनेचा एक अरुंद किनारी पट्टा आढळतो त्यात कधीकधी डामराचे झिरपे दिसतात. कँब्रियनपूर्व रूपांतरित तळखडकांत पुष्कळदा ग्रॅनाइट आढळतो. पृष्ठभागावरील विस्तृत थरात वाळू, चिकणमाती व वालुकाश्म आढळतात. कासाई व किसांगानी भागात क्रिटेशस व जुरासिक काळात सागरी आक्रमण झाले असावे असे दिसते. खोऱ्याच्या मध्यभागात तृतीयक व चतुर्थक काळातील थर आढळतात. त्यात पृष्ठभागाजवळ लॅटेराइट तयार झालेला दिसतो. तथापि झाईरेची भूशास्त्रीय माहिती अद्याप अपुरी आहे.

दक्षिण शाबाच्या वलीकृत कँब्रियनपूर्व चुनखडकांत व वालुकाश्मात तांबे, कोबाल्ट, युरेनियम, शिसे, रेडियम, प्लॅटिनम, कॅडमियम आणि जस्त यांची धातुके सापडतात. उत्तर शाबा आणि दक्षिण किवूमध्ये कॅसिटेराइट आढळते. किबाली-इतुरी आणि उत्तर व दक्षिण किवूमध्ये सोने सापडते. याशिवाय मँगॅनीज, कथिल, चांदी , कोलंबाइट, टँटेलाइट, टंगस्टन, जर्मेनियम यांचेही उत्पादन झाईरेत होते. औद्योगिक कामासाठी लागणारे हिरे व कोबाल्ट यांबाबत बिगर कम्युनिस्ट देशांत झाईरेचा प्रथम क्रमांक आहे. स्वस्त जलविद्युत् उपल्बध होण्यापूर्वी शाबात कारखान्यांस इंधन म्हणून लागणारा कोळसा सापडत असे. किनारी व खचदारी भागात खनिज तेल आणि कोळसा सापडण्याचा संभव आहे.

झाईरेतील मृदा सामान्यतः निकृष्ट आहे. दाट वनप्रदेशातील मृदा क्षरणकारकांच्या अभावी जागीच राहते. तेथे वरच्या थरांतील क्षार पाण्याबरोबर खालच्या थरांत जातात. काँगो नदीच्या काठी व उपनद्यांच्या खोऱ्यांत गाळाच्या जमिनीचे सुपीक विभाग आहेत. तसेच खचदरीच्या बाजूस, विशेषतः किवू भागात, ज्वालामुखीजन्य सुपीक मृदा आढळते. तोच येथील शेतीप्रधान विभाग आहे.

काँगो (झाईरे) नदी देशाच्या आग्नेय भागात लूआलाबा नावाने उगम पावते व एका प्रचंड अर्धवर्तुळाकार मार्गाने सु. ४,६७० किमी. वाहत जाऊन बोमाजवळ अटलांटिक महासागरास खाडीमुखाने मिळते. प्रथम विषुववृत्त ओलांडून ती वायव्य आणि मग पश्चिम दिशांस वाहू लागली म्हणजे तिला काँगो हे नाव मिळते. उत्तरेकडून तिला ऊबांगी व दक्षिणेकडून कासाई या प्रमुख उपनद्या मिळतात. या दोघींनाही अनेक मोठमोठ्या उपनद्या मिळतात. यांशिवाय काँगोला उत्तरेकडून आरूवीमी, लिंडी, लोईका, इतिंबीरी, माँगाला, गिरी आणि दक्षिणेकडून लोमामी, लूलाँग्गा, रूकी, इकलेंबा या प्रमुख उपनद्या मिळतात. लहानमोठ्या जलप्रवाहांचे एक प्रचंड जाळेच या देशात निर्माण झालेले दिसते. याचे कारण म्हणजे काँगो विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंनी वाहत जाते आणि दोन्ही बाजूंनी तिला तिच्या उपनद्या आपापल्या उपनद्यांसह येऊन मिळतात. हा विषुववृत्तीय प्रदेश बारमहा भरपूर पावसाचा आहे आणि सूर्याच्या दक्षिणोत्तर गतीबरोबर दोन्हीकडील नद्यांना आलटून पालटून मोठमोठे पूर येतात. यामुळे काँगो नदी सतत जलपूर्ण असते. समुद्रात भरपूर पाणी येऊन ओतण्याबाबत ती जगात फक्त अमेझॉनच्याच खालोखाल क्रमांकाची आहे. काँगो व तिच्या उपनद्या अनेक ठिकाणी खोल निदऱ्यांतून वाहतात आणि धबधब्यांवरून व प्रपातांवरून एकदम वेगाने खाली येतात. यामुळे एकूण सुप्त जलविद्युत् शक्तीबाबत त्यांचा जगात पहिला क्रमांक लागतो. यापैकी फारच थोडी शक्ती सध्या कार्यान्वित आहे. खचदरीतील सरोवरांशिवाय काँगोत म्वेरू, उपेंबा, माइएन्डॉम्डी (एनडाँबी ) वा  (लिओपोल्ड–२) व तुंबा ही महत्त्वाची सरोवरे आहेत.


हवामान : विषुववृत्तीय भागात तपमान वर्षभर सु. २५से. असते. त्यात फारसा बदल होत नाही . त्यातल्यात्यात फेब्रुवारीत तपमान वाढते. वार्षिक पर्जन्यमान सु. १८० सेंमी. असते. पाऊस वर्षभर असतोच परंतु तो एप्रिल-मे व ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यांत अधिक पडतो. उत्तरेकडे व दक्षिणेकडे जावे तसतसे सरासरी तपमान आणि वार्षिक सरासरी तपमान कक्षाही वाढत जाते. जास्त पावसाचे दिवस वर्षातून दोनदा अधिक स्पष्ट जाणवतात. जानेवारी- फेब्रुवारीत पाऊस कमी पडतो. जून-जुलै-ऑगस्ट हा काळ कोरडा जाऊ लागतो. समुद्रकाठच्या प्रदेशात थंड बेंग्वेला प्रवाहाचा परिणाम जाणवतो. तेथे आणि आग्नेय भागात जून ते ऑक्टोबर बहुधा बिनपावसाचा काळ असतो. जुलै आणि ऑगस्टमध्ये तपमान सर्वांत कमी असते. शाबा पठारावर हवामानातील हा फरक अधिक स्पष्ट होतो वार्षिक पर्जन्यमान १४० सेंमी. पर्यंत असते परंतु पावसाचा व बिनपावसाचा काळ वर्षातून दोनदा न येता एकेकदाच येतो. पर्वतीय प्रदेशात सरासरी तपमान १९ से. व पाऊस सु. १३० सेंमी. असतो.

वनस्पती : विषुववृत्ताच्या उत्तरेस आणि दक्षिणेस ४° पर्यंत सबंध पूर्व-पश्चिम पट्ट्यात ५०–६० मी. उंचीच्या वृक्षांची दाट विषुववृत्तीय अरण्ये आहेत. ह्यात कित्येक ठिकाणी दुपारीही सूर्यकिरण क्वचितच जमिनीपर्यंत पोहोचतात. पावसाचे पाणी डबक्याडबक्यांतून बरेच दिवस साचून राहते. जाडजाड दोरीसारख्या वेलींचे जाळे इतके दाट असते, की ठराविक मार्गाने पायी जाणेसुद्धा कठीण होते.एखादा प्रचंड वृक्ष वाटेत आडवा पडला, तर त्याच्या फांद्या, वेली वगैरेंचा पसारा दूर करण्यापेक्षा ते सर्व ओलांडून जाणेच अधिक सोयीचे ठरते. या दाट अरण्याच्या उत्तर व दक्षिण बाजूंस लिंबाली अरण्य आहे. त्यातील वृक्ष ३० मी. पर्यंतही उंच असतात. इतुरी-आरूवीमी खोऱ्यांत युगांडा ‘आयर्नवुड’ वृक्ष पुष्कळ आढळतात. नद्यांकाठीही अरण्ये वाढलेली असतात. आफ्रिकन ओक, मॉहॉगनी, एबनी, गोरखचिंच, रेड सीडार, आफ्रिकी अक्रोड, शेवरी इ. उपयुक्त वृक्ष आहेत. मूळ अरण्य तुटले असेल तेथे दुय्यम प्रतीचे अरण्य वाढते. त्यात तेल्यामाड, शेवरी, कोपल, रबर, सिंकोना इ. वृक्ष दिसतात. शाबाच्या बाजूस अरण्य विरळ झालेले दिसते, त्यात लहान पानझडी वृक्ष आढळतात. पूर्वेकडे रूयेनझोरीसारख्या पर्वतउतारांवर उंच जावे तसतसे क्रमाने अरण्य, गवत, खुरटे गवत व वनस्पती आणि आल्प्स प्रकारचे गवत यांचे पट्टे आढळतात. अरण्यांभोवती सॅव्हाना व स्टेप गवतांचा पट्टा आढळतो. तो या देशात विषुववृत्ताच्या दक्षिणेस अधिक विस्तृत आहे. शाबा, बांडुंडू, कासाई इ. भाग बहुतेक सॅव्हानाव्याप्तच आहेत. त्यात मधूनमधून झाडे आणि खुरटी, गाठाळ खोडांची झुडुपे असतात. बऱ्याच भागांत औषधी वनस्पती व दलदली भागात कच्छ वनस्पती आहेत.

प्राणी : अरण्यांत अनेक प्रकारची माकडे आहेत. विषुवृत्तीय अरण्यात चिंपांझी, पूर्वेकडील पर्वतभागात गोरिला व विरळ अरण्यात बॅबून हे कपी आहेत. येथील विशिष्ट प्राणी म्हणजे ओकापी, प्रचंड रानडुक्कर, दलदली भागातील छोटेखानी हत्ती, ईशान्य भागातील पांढरा गेंडा व जिराफ हे होत. शाबा व इतर काही भागांत सिंह आहेत. बिबळ्या, चित्ता, रानटी कुत्रा, झेब्रा, काळा गेंडा हे विशेषतः शाबात आढळतात. हत्ती, रानमांजरे, वाघ, रेडा, काळवीट, रानडुक्कर हे विरळ अरण्ये व गवताळ भागात असतात. तरस, कोल्हा, सिव्हेट, साळिंदर, खारी, ससे, रानउंदीर हे विपुल आहेत. नद्यांत सुसरी, हिप्पो आणि अनेक प्रकारचे मासे आढळतात. काँगोच्या खालच्या भागात मोठमोठे मनाटी आहेत. किनाऱ्याजवळ देवमासे व डॉल्फिनही आढळतात. अरण्यविभागातच व इतरत्रही अनेक प्रकारचे सरडे, बेडूक, अजगर, साप, तसेच पोपट, कोकिळा, घुबड, गरुड, गिधाड, कबुतर, बगळा, करकोचा, पाणकोळी इ. पक्षी व कीटक आहेत. काँगोत विविध प्राण्यांसाठी अनेक ठिकाणी राखीव वनविभाग आहेत आणि शिकारीवर नियंत्रण आहे. मलेरिया पसरविणारे डास व इतर कीटकांपेक्षाही ‘त्से त्से’ ही भयानक माशी या देशातही आहे. ती चावल्यास गुरे पुष्कळदा मरतात आणि माणसांना निद्राविकार जडतो.

इतिहास व राज्यव्यवस्था : झाईरेतील मूळ रहिवासी पिग्मी होत. त्यांना दुर्गम भागात पिटाळून लावून नायजेरियाच्या आग्नेय भागातून आलेल्या बांटू लोकांनी येथे वस्ती केली. सतराव्या शतकात काही नाइलॉइटही आले. तेराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत येथे अनेक राज्ये आली व गेली. झाईरेच्या राजाने ख्रिस्ती धर्म स्वीकारून पोर्तुगीजांशी व्यापारी संबंध जोडले होते परंतु यादवीमुळे ते राज्य धर्मासह बुडाले. पूर्वेकडील बाकूबा राज्यात कला व पंधराशे वर्षांचा तोंडी इतिहास जतन केलेला आहे. लोमामी नदीखोऱ्यात सोंग्ये हे शहरी राज्य उदयास आले होते. त्यांच्या लुबा साम्राज्याने अठराव्या शतकाच्या अखेरीस हल्लीचे कटांगा (शाबा) व्यापले होते. दक्षिणेकडील लुंडा साम्राज्य हल्लीच्या अंगोला , शाबा व झँबियापर्यंत पसरले होते. काउँ द्योगू या पोर्तुगीज समन्वेषकाने १४८२ मध्ये काँगो नदीचे मुख शोधून काढले. त्यानंतर बऱ्याच लोकांनी काँगोतून वर जाण्याचा प्रयत्न केला  परंतु हल्लीच्या किन्शासाच्या वर कोणी जाऊ शकले नव्हते. अखेर जुलै १८७७ मध्ये हेन्री स्टॅन्लीने बहुतेक सर्व काँगो नदी पार केली. १८००–५० पर्यंत यूरोपियनांनी येथे गुलामांचा व्यापार केला. दरवर्षी येथून सु. दीड लाख गुलामांची निर्यात होई. अरबांनीही गुलामांचा व्यापार वाढविला होता. पुढे गुलामांच्या व्यापारावर बंदी घातली गेली. बेल्जियमचा राजा लिओपोल्ड याने १८७८ मध्ये स्टॅन्लीला झाईरेतील लहानलहान राज्यांच्या प्रमुखांशी संधी करण्यासाठी पाठविले आणि ‘इंटरनॅशनल आफ्रिकन असोसिएशन’ चे रूपांतर ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ काँगो’ मध्ये करण्यात आले. ही संस्था लिओपोल्ड स्वतःची खाजगी मालमत्ताच समजत असे. यानंतर यूरोपीय राष्ट्रांचे लक्ष झाईरेकडे वेधले परंतु १८५५ च्या बर्लिन काँग्रेसमध्ये सर्व मोठ्या यूरोपीय राष्ट्रांनी झाईरेवरील बेल्जियमचा हक्क मान्य केला. जुलै १८८५ मध्ये लिओपोल्डने बोमा बंदरात कर्नल विंटनकरवी आपले सार्वभौमत्व जाहीर करून ‘काँगो फ्रि स्टेट’ अस्तित्वात आणले. अरबांची व इतरांची बंडाळी मोडून काढण्यात आली. तथापि तेथे एखादी विशिष्ट राज्यपद्धती रूढ करण्याऐवजी येथील नैसर्गिक संपत्तीचा अधिकाधिक लाभ कसा उठविता येईल यावरच भर देण्यात आला. पुढे आर्थिक कारणांमुळे येथील लोकांना व गोऱ्यांनाही अतिशय वाईट वागणूक मिळू लागल्यामुळे ग्रेट ब्रिटन, अमेरिका वगैरे देशांत आणि खुद्द बेल्जियम संसदेतही त्याविषयी नापसंती व्यक्त होऊ लागली. चौकशीमंडळे, त्यांचे अहवाल, सुधारणामंडळे इ. होऊनही जेव्हा लिओपोल्डने झाईरेचा उल्लेख आपल्या मृत्युपत्रात स्वतःची मालमत्ता म्हणून केला, तेव्हा बेल्जियम संसदेने १९०८ मध्ये फ्रि स्टेट आपल्या ताब्यात घेतले व ‘बेल्जियम काँगो’ जन्मास आले. दुसऱ्या महायुद्धात बेल्जियमला झाईरेची बरीच मदत झाली.

झाईरेच्या सर्वांगीण सुधारणेसाठी १९४९ मध्ये योजना आखण्यात आल्या. बेल्जियमांनी येथे काळेगोरे भेद केला नाही परंतु या प्रदेशाला स्वातंत्र्य देण्याची त्यांची तयारी नव्हती. त्यांनी झाईरेला राजकारणापासून व आफ्रिकी राष्ट्रवादापासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. आरोग्य व शहरांची वाढ यांत सुधारणा झाल्या परंतु प्रगत शिक्षणास वाव मिळाला नाही व आफ्रिकी लोकांस महत्त्वाचे नागरी हक्क नाकारले गेले. स्थानिक स्वराज्याची तर कल्पनाही नव्हती परंतु १९५७ मध्ये झाईरेच्या लोकांना मतदानाचा हक्क द्यावा लागला आणि १९५९ मध्ये सगळीकडे दंगे झाल्यामुळे आणि अल्जीरियाचे युद्ध व द गॉल यांचे वसाहतविषयक बदललेले धोरण यांचाही काही अंशी परिणाम होऊन १९६० च्या ब्रूसेल्स बैठकीत झाईरेला स्वातंत्र्य देण्याचे बेल्जियमने मान्य केले. ३० जून १९६० रोजी झाईरे स्वतंत्र लोकसत्ताक गणतंत्र झाले.

या नव्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष कासावुबू व मुख्य प्रधान पॅट्रिस लुमुंबा झाले परंतु राज्यव्यवस्थेचा आधीचा कोणताच पाया नसल्यामुळे लवकरच अंतर्गत बंडाळीला सुरुवात झाली. बेल्जियम व इतर यूरोपीय मिळून सु. दोन लाख लोक झाईरेतून निघून गेले. यादवीच्या निमित्ताने बेल्जियमने झाईरेत गोरे सैन्य आणले, तेव्हा कासावुबू व लुमुंबा यांनी संयुक्त राष्ट्रांकडे बेल्जियमविरुद्ध लष्करी साहाय्याची मागणी केली. सुरक्षा मंडळाने ती मान्य केली तेव्हा बेल्जियम लष्कराने शाबाशिवाय सगळीकडून काढता पाय घेतला. शाबाच्या मॉइसे त्शोंबेने संयुक्त राष्ट्रांना जुमानले नाही. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस डाग हामारशल्ड यांनी स्वतःच्या देखरेखीखाली संयुक्त राष्ट्रसेना ऑगस्ट १९६० मध्ये शाबात घुसविली तेव्हा बेल्जियम लष्कर तेथून निघून गेले परंतु शाबातील संपत्तीच्या लोभाने त्शोंबेने भाडोत्री गोऱ्या सैनिकांकरवी लढा चालूच ठेवला.


याच वेळी अल्बर्ट कलोंजीने बेल्जियमवर विसंबून बाक्वांगा विभागाच्या आसपासच्या हिऱ्यांचा कासाई व लुबा प्रदेश स्वतंत्र असल्याचे जाहीर केले. तेव्हा त्शोंबेनेही कासाईवर सैन्य पाठविले. त्यामुळे तीन लाखांवर कासाई व लुबा लोक रानावनात पळून गेले. सर्वत्र दुष्काळी छाया पसरली. शेवटी संयुक्त राष्ट्रांनी त्या लोकांना रानावनातही जीवनोपयोगी वस्तूंचा पुरवठा केल्यामुळे लोक वाचले. त्शोंबेचे वर्तन लुबा लोकांना आवडले नाही. त्यांच्या बलुबाकात पक्षाच्या जोसेफ सेंडवे या पुढाऱ्याने त्शोंबे किंवा कलोंजी कोणाचेच वर्चस्व मानले नाही व त्यांच्या भाडोत्री गोऱ्या सैनिकांशी दोन हात चालूच ठेवले.

सप्टेंबर १९६० मध्ये कासावुबू व लुमुंबा यांच्यात बेबनाव होऊन केंद्र सरकार मोडले संयुक्त राष्ट्र सैन्याचे संरक्षण लुमुंबाने नाकारले, तेव्हा तो त्याच्या शत्रूच्या लोकांच्या हाती सापडला व पुढे त्याचा खून झाला. संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेल्या मंडळाच्या अहवालानुसार लुमुंबाचा मित्र अंतोन गिझेंगा याने डिसेंबर १९६० मध्ये राज्यसूत्रे हाती घेतली. फेब्रुवारी १९६१ मध्ये लष्करी सत्तेचा अंत करण्यात येऊन कासावुबूने इलेओ याला मुख्य प्रधान केले. मेमध्ये कॉकिलातव्हिले ( हल्लीचे एम्बांडाका ) येथील बैठकीत सर्व पुढाऱ्यांच्या संमतीने सहा प्रांतांऐवजी वीस स्वायत्त शासकीय राज्ये निर्माण करण्याचे ठरले. नवीन संविधांन तयार करण्यासाठी लोकसभा बोलवण्यात आली. तिने सिरिल अडौलाला मुख्य प्रधान निवडले. सप्टेंबर १९६१ मध्ये संयुक्त राष्ट्रसेना व भाडोत्री गोरे सैन्य यांचे युद्ध सुरू झाले. डाग हामारशल्ड स्वतः त्शोंबेशी वाटाघाटी करण्यासाठी निघाला परंतु झँबियाजवळ त्याच्या विमानाला अपघात होऊन त्यात त्याचा अंत झाला. शेवटी त्शोंबेने तह केला. अडौलाने कलोंजीला अटक केली. जून १९६४ मध्ये अडौलाला राजीनामा देणे भाग पडले व त्शोंबे मुख्य प्रधान झाला पण देशात शांतता आणि सुव्यवस्था स्थापन करण्यात त्याला यश आले नाही. कासावुबूने त्याला काढून त्याच्या जागी किंबाला आणले परंतु सेनाप्रमुख मोबुटू याने कासावुबूला पदच्युत केले. तो स्वतः अध्यक्ष व मुलांबा मुख्य प्रधान झाले.

त्शोंबेला त्याच्या अनुपस्थितीत १९६७ मध्ये मृत्यूची शिक्षा फर्माविण्यात आली. जनरल मोबुटूने १९६६ मध्ये अनेक गावांची आणि प्रांतांची नावे बदलली व झाईरेचे २४% भाग भांडवल असलेल्या बेल्जियम खाणकंपनीवर कर व निर्बंध लादले. अखेर वाटाघाटी होऊन झाईरेचे ५५% भाग भांडवल असलेली, झाईरेतच मुख्य कचेरी असलेली परंतु बेल्जियम तज्ञांची मदत घेणारी नवी कंपनी स्थापन झाली.

जनरल मोबुटू (१९७२ पासून नवीन नाव मोबुटू सेसे सेर्फो) अध्यक्ष, मुख्य प्रधान व संरक्षणमंत्री असून त्याने १९६७ मध्ये अध्यक्षाच्या हाती सत्ता सोपविणारे संविधान मान्य करून घेतले आहे. त्याला मदत करण्यासाठी चार मंत्री, सेनाप्रमुख, पोलीस प्रमुख आणि सुरक्षा प्रमुख यांचे राष्ट्रीय सुरक्षा मंडळ आहे. मार्च १९६९ मध्ये झाईरेच्या स्वातंत्र्याचा प्रमुख पुरस्कर्ता व पहिला अध्यक्ष कासावुबू मरण पावला तसेच पळवून अल्जीरियात नेलेला त्शोंबेही जून १९६९ मध्ये कैदेतच मरण पावला. किसांगानीचा बंडखोर न्‌गालो यास पकडून ठार करण्यात आले. बल्गेरिया, फ्रान्स, मध्य आफ्रिका संघराज्य व काँगो (ब्रॅझाव्हिल) यांच्याशी झाईरेचे संबंध या ना त्या कारणाने ताणले किंवा दुरावले गेले.

राज्यव्यवस्थेसाठी देशाचे किन्शासा सिटी. बांडुंडू, एक्वेटर, कासाई (पश्चिम), कासाई (पूर्व), किवू, बाझाईरे, शाबा व ओझाईरे असे नऊ विभाग पाडण्यात आले आहेत. त्यांचे गव्हर्नर अध्यक्ष नेमतो. देशाची लोकसभा असून तिचे सदस्य ५ वर्षांसाठी सार्वजनिक गुप्त मतदानाने निवडले जातात. देशात फक्त दोनच राजकीय पक्ष असावेत असे ठरले आहे. ‘मुव्हमेंट पॉप्युलर डी ला रेव्होल्यूशन’ (एम्‌.पी.आर्.) या पक्षाचा नेता स्वतः जनरल मोबुटू असून त्याने आपल्या राजवटीला विरोध असणाऱ्या सर्वांना मिळून एक विरोधी पक्ष बनविण्यास सांगितले होते. अध्यक्ष हा ७ वर्षासाठी सार्वत्रिक प्रौढ मतदानाने निवडला जातो. तो झाईरेत जन्मलेला व वयाने ४० वर्षांहून मोठा असला पाहिजे. तो राज्याचा व शासनाचा प्रमुख, तसेच सेनाप्रमुख असतो. १ नोव्हेंबर १९७० रोजी मोबुटू सात वर्षासाठी पुन्हा निवडून आला. त्याच्या पक्षाने ठरविलेले ४३० सदस्य निवडून येऊन नवीन लोकसभा १ डिसेंबर १९७० रोजी सुरू झाली. तिचे एम्‌. पी. आर्. ने ठरविल्याप्रमाणे एम्‌.पी.आर् हीच देशातील सर्वोच्च संस्था राहील इतर संस्था तिला दुय्यम राहतील व एम्. पी. आर्. हीच देशातील एकमेव राजकीय पक्ष राहील, अशी घटना दुरुस्ती मंजूर केली. मोबुटूने सर्व राजकीय विरोधकांना सार्वत्रिक माफी जाहीर केली. देशाबाहेरचे असे लोक १ जानेवारी १९७१ पूर्वी देशात परतले, तरच त्यांस या माफीचा फायदा मिळावयाचा होता.

विधिमंडळ व शासन यांपासून न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. सर्वोच्च न्यायालय, अपील न्यायालये, सैनिकी न्यायालये व लवाद न्यायालये यांच्या द्वारा न्यायव्यवस्था होते. सामाजिक स्थान, धर्म, टोळी, लिंगभेद, जन्म वा वसती काहीही असली , तरी कायद्यापुढे सर्व नागरिक समान आहेत. व्यक्तिगत मान, जीवित सरंक्षण व वैयक्तिक सुरक्षा यांचा प्रत्येकास अधिकार आहे. सर्वांना मतस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्य आहे. सैनिकी सेवा प्रत्येकास आवश्यक आहे परंतु कायद्याप्रमाणे त्याऐवजी इतर सार्वजनिक सेवा मान्य आहे. सर्व झाईरी लोकांस काम करण्याचा हक्क आणि कर्तव्य आहे. कामगार संघटनांद्वारा आपल्या हक्काचे संरक्षण करता येते. कायद्याच्या चौकटीत संप करण्याच्या हक्कास मान्यता आहे.

झाईरेच्या संरक्षणव्यवस्थेकरिता १९६७ च्या सुरुवातीस सेनेच्या ७ ब्रिगेड मिळून सु. ३१,६०० सैनिक होते. त्यांत ७३० अधिकारी व १३ जनरलच्या हुद्याचे होते. १९६९ मध्ये वायुदलात १२५ विमाने होती.

आर्थिक स्थिती :  झाईरेमध्ये १९०८ पर्यंत ७५% रबराचे व उरलेल्या २५% पैकी बहुतेक उत्पन्न हस्तिदंताचे येत असे. मलाया, नेदर्लंड्स, इंडीज वगैरे ठिकाणी रबराची लागवड झाल्याने झाईरेत रबराची लागवड करण्यास बेल्जियन सरकार उद्युक्त झाले. तेल्यामाडाची वाढ खूप जोरात होत आहे. त्यापासून तेल, साबण वगैरे तयार करतात. साधारणतः १९१२–१३ पासून मनिएमे व सांकूरू येथे कापसाच्या लागवडीस सुरुवात झाली. १९३० पासून ‘रोबस्टा’ व ‘एक्सेल्‌सा’ कॉफीच्या लागवडीस किवू व वेले विभागांत सुरुवात झाली व ‘अरेबिका ’ कॉफीची लागवड रूवेनझोरी विभागात झाली आहे. विषुबवृत्तीय प्रदेशात, ओझाईरे प्रांतात, मायूंबे आणि सांकूरू विभागात रबराची लागवड झालेली आहे. १९२६ पासून माताडी व मालेबो पूल (स्टॅन्लीपूल) यांच्या दरम्यान उसाच्या लागवडीस सुरुवात झाली. तज्ञ संशोधनसंस्थांतर्फे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत करून, त्यांची उन्नती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शेती अजूनही जुन्या पद्धतीनेच केली जाते. ताडतेल, ताडफळांचा मगज, रबर, कापूस, कॉफी, भुईमूग, तांदूळ, मका, रताळी, याम, ऊस ही येथील प्रमुख पिके आहेत. इमारती लाकूडही महत्त्वाचे उत्पन्न आहे. यांशिवाय बटाटे, कसावा, मोहरी, सरकी, ताग, केळी, तंबाखू, चहा, कोको यांचेही उत्पादन होते. नायजेरिया सोडल्यास संपूर्ण आफ्रिका खंडात झाईरेतच ताडाच्या तेलाचे व तेल्यामाडाचे उत्पादन होते कापसाच्या उत्पादनात झाईरेचा चौथा क्रमांक लागतो. १९७१ साली ९,३०,००० गुरे ५,७५,००० मेंढ्या १६,५०,००० शेळ्या व ४,५०,००० डुकरे होती. १९२५ नंतर शाबा विभागातील रहिवाश्यांनी पशुपालनास सुरुवात केली. त्से त्से माशीपासून सुरक्षित केलेल्या विभागात मोठ्या प्रमाणात गुरांचे कळप पाळले जातात. असे कळप सरोवर विभाग, शाबा, पूर्व कासाई येथे पाळण्यात येतात.


काँगो व तिच्या उपनद्या झाईरेला पाणीपुरवठा करतात. तसेच पाऊसही भरपूर पडत असल्याने पाणीपुरवठ्याच्या इतर पद्धती देशात अंमलात आणलेल्या दिसत नाहीत.

देश शेतीप्रधान आहे. बराच काळ पारतंत्र्यात राहिल्याने व एकवर्ती प्रबळ शासनसत्तेचा अभाव असल्याने बऱ्याचशा समस्या झाईरेसमोर उभ्या आहेत. शेतीमालाची बाजारपेठ निर्माण करणे, शेतकऱ्यांना चांगले बी-बियाणे पुरविणे, यांत्रिकीकरण करणे, नगदी पिकांची उपज जास्त प्रमाणात वाढविणे, पिकांवरील रोगराईला प्रतिबंध करणे, कामगारांच्या प्रगतीकडे लक्ष पुरविणे या त्यांपैकी काही होत. आंतरराष्ट्रीय सहकार्याने व अमेरिकेच्या साहाय्याने बऱ्याच क्षेत्रांत प्रगतीशील कार्य सुरू असलेले दिसते.

काँगो नदीच्या पात्राची सरासरी उंची ३०० मी. आहे. अर्धेअधिक पात्र ४५० मी. ते ९०० मी. उंच आहे, तर १/४ पात्र ९०० मी. पेक्षाही जास्त उंच आहे. यातच भर म्हणजे १२५ ते १७५ सेंमी. पाऊस पडतो. त्यामुळे जलविद्युत् शक्ती निर्माण करण्याची खूप सुप्त शक्ती असूनही शाबा व इतर औद्योगिक विभाग सोडल्यास, या शक्तीचा विशेष उपयोग केलेला आढळत नाही. परंतु कोळसा व तेल उपलब्ध नसल्याने १९६० पासून याकडे विशेष लक्ष पुरविण्यात येत आहे. १९६९ मध्ये २,९१,२०,००,००० किवॉ. तास जल विद्युत्‌चे उत्पादन झाले.

शाबा प्रांतात खनिजे सापडल्यानंतर त्या प्रांताची प्रगती होण्यास सुरुवात झाली. तेथे तांबे, मँगॅनीज, कथिल, सोने, हिरे, युरेनियम, रेडियम भरपूर प्रमाणात सापडतात. झादोव्हिल (लिकासी) येथे लोखंडाचा मोठा कारखाना आहे. काँगो खोरे हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. हिऱ्यांचे दोन प्रकार आढळतात–कासाई हिरे आणि लुबिलाश हिरे. कासाई हिऱ्यांचा जवाहरासारखा उपयोग होतो. रूवे व किलो या ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत. १९०४ पासून सोने काढण्याचे कार्य चालू आहे. जगातील उत्पादनापैकी २% हिरे येथे सापडतात. लिकासीजवळील शिंकोलोब्वे येथे रेडियमच्या व युरेनियमच्या खाणी आहेत. शाबात कोबाल्ट सापडते व जगाला कोबाल्टचा पुरवठा करण्याइतपत हे धातुक झाईरेत सापडते.

झाईरेमधील उद्योगधंदे अद्याप बाल्यावस्थेत असून येथे अन्नधान्ये, पेये, तंबाखू, सुती कापड, कपडे तयार करणे, लाकूडसामान, छपाई, रसायने, रबर, खनिजतेल, धातू, यंत्रसामग्री, दळणवळणाची साधने, सिमेंट, कौले, दारूगोळा, मद्ये, दुभत्यांचे पदार्थ, मार्गरीन इ. विविध उद्योगधंदे सुरू आहेत.

१९७० मध्ये २६,६४,९१,००० झाईरे किंमतीची आयात आणि ३७,०८,७७,००० झाईरेंची निर्यात झाली. आयातीत यंत्रे ११·९%, वीजयंत्रे व सामाग्री ६·३%, वाहने ९·३%, खनिज तेल पदार्थ ५·२%, धान्ये व त्यांचे पदार्थ ४·४%, विमाने २·३% व ते पाठविणारे प्रमुख देश बेल्जियम-लक्झेंबर्ग २३·६%, अमेरिका १२·७%, फ्रान्स ७·७%, नेदर्लंड्‌स ६·४%, ब्रिटन ६·२%, प. जर्मनी १०%, जपान ७% आणि निर्यातीत तांबे ६६·६% अनौद्योगिक हिरे ५·३%, कॉफी ४%, कोबाल्ट ३·८%, ताडतेल ३%, कथिल २·६%, रबर २·५%, जस्त व मिश्रधातू २·२% आणि ते घेणारे प्रमुख देश बेल्जियम लक्झेंबर्ग ४३·२%, इटली १२·२%, फ्रान्स ७%, नेदर्लंड्‌स २·४%, प. जर्मनी २·२%, ब्रिटन ८·८% असे प्रमाण होते.

जून १९६७ पासून झाईरे हे चलन असून ०·५० झाईरे = १ अमे. डॉलर व १·१८ झाईरे = १ पौंड स्टर्लिंग असा एप्रिल १९७४ चा अधिकृत विनिमयदर होता. १ झाईरे = १०० माकुटा (एकवचन लिकुटा) आणि १ लिकुटा = १०० सेंगी.

आयातकर, आयकर वगैरे देशातील उत्पान्नाच्या मुख्य बाबी आहेत तर राज्यव्यवस्था, कर्जफेड, शिक्षण, दवाखाने व औषधे आणि संरक्षण या खर्चाच्या मुख्य बाबी होत. झाईरेच्या राष्ट्रीय बँकेची स्थापना १९६१ मध्ये झाली. त्याशिवाय इतर पाच बँका देशात आहेत. स्वातंत्र्यानंतर अर्थव्यवस्था बरीच अस्थिर होती. तथापि जून १९६७ च्या आर्थिक सुधारणांनंतर तसेच तांब्याच्या किंमतीत वाढ आणि शासकीय खर्चातील कपात यांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. तूट भरून निघून शिल्लक वाढू लागली आणि विकासाकडे लक्ष देता येऊ लागले. विद्युत् निर्मितीत वाढ करण्यासाठी काँगो नदीचे पाणी ड्युरेन खोऱ्यात नेण्याचा इंगा प्रकल्प सुरू झाला. ब्रिटन, बेल्जियम, अमेरिका यांचे व्यापारी व औद्योगिक सहकार्य वाढू लागले व परदेशी भांडवलाचा ओघ झाईरेकडे वळू लागला.

वाहतूक व दळणवळण : देशात १९७० मध्ये एकूण १,४५,५३४ किमी. लांबीचे रस्ते होते. प्रवासी मोटार वाहने ५५,८२४ व व्यापारी वाहने-बसगाड्यांसह ४३,१४६ होती. १९७० मध्ये एकूण लोहमार्ग ६,०५४ किमी. काँगो नदीसह अंतर्गत जलमार्ग १३,५०० किमी. १९७१ची हवाई वाहतूक ५२,८०,००,००० प्रवासी-किमी. व माल वाहतूक १,७३,१४,००० टन किमी. होती. देशात ५ आंतरराष्ट्रीय, ३६ प्रमुख, ३४ दुय्यम, ७५ स्थानिक व ७८ आणीबाणीच्या वेळाचे विमानतळ आहेत. ब्रूसेल्स, एंटेबी, नैरोबी, दारेसलाम , सॉल्झबरी, जोहॅनिसबर्ग, लागोस यांच्याशी मुख्यतः हवाई वाहतूक होते. झाईरेतील माताडी-किन्शासा लोहमार्ग काँगो नदीच्या अखेरच्या भागातील प्रपात व द्रुतवाह टाळण्यासाठी व किसांगानी–पाँत्यॅर्व्हिल आणि किंडूकाबालो लोहमार्ग तिच्या सुरुवातीच्या भागातील प्रपात व द्रुतवाह टाळण्यासाठी बांधण्यात आले. किवू व मायूंबे लोहमार्ग बोमा बंदर अरण्य विमागांशी जोडतात. तांब्याच्या खाणीप्रदेशातून जाणारा शाबा लोहमार्ग लूबूंबाशीवरून जाऊन झँबियातील लोहमार्गाला मिळतो. पोर्ट फ्रांस्वा-बुकामा लोहमार्ग कासाई नदीखोऱ्यातून काँगो नदीच्या खालच्या विभागाला मिळतो. टेंके-डीलालो लोहमार्ग बेंग्वेला लोहमार्गाला मिळतो आणि लोबितो या अंगोलाच्या बंदरापर्यंत जातो. यांशिवाय इतर अनेक लहानमोठे लोहमार्ग मुख्यतः झाईरेतील खनिजे बाहेर नेण्याच्या सोयीसाठी बांधलेले आहेत

बानाना, बोमा, म्वांदा व माताडी ही झाईरेतील मोठी बंदरे होत. म्वांदा हे खनिज तेलाचे बंदर आहे. तथापि झाईरेचा बराचसा व्यापार लोबितो या अंगोलाच्या बंदरातून चालतो. देशात १९७१ मध्ये दूरध्वनी २२,३४४ रेडिओ ६५,००० (१९७०) व दूरचित्रवाणीयंत्रे ७,०५० (१९७०) होती. देशात ७ दैनिके, १० साप्ताहिके, ५ पाक्षिके व ५४ नियतकालिके प्रसिद्ध होतात. बहुतेक सर्व फ्रेंच भाषेतून व काही देशी भाषांतून निघतात.


लोक व समाजजीवन : झाईरेमधील मानवसमूह मुख्यतः ‘बांटू’ कुलसमूहात मोडतो. येथील पुरातन मानव पिग्मी होय. आजही बरेच पिग्मी रानावनात राहतात. आजचा बांटू समाज हा बांटू, निग्रो, हॅमाइट व इतर वंशांच्या सरमिसळीतून उत्पन्न झालेला आहे. काही जमाती आजही बांटूपेक्षा वेगळ्या वाटतात. त्यांनी आपले वैशिष्ट्य कायम ठेवलेले दिसते. अशातच पिग्मींची गणना करावी लागते.

सर्वसाधारण जनता शेती करते. लोकर, कंदमुळे व फळे गोळा करणे, वेताच्या पिंजरेवजा टोपल्यांतून नदीत मासे पकडणे, भांडी, टोपल्या, कापड विणणे, लाकडावरील कोरीवकाम, लोखंडी वस्तू करणे इ. व्यवसाय चालतात. पूर्वेकडील व दक्षिणेकडील भागांत पशुपालन व्यवसायही चालतो. काही ठिकाणी आधुनिक पद्धतीने मळे, शेती इत्यादींची सुरुवात होत आहे. सु. २३% लोक शहरांतून राहतात. लोकसंख्येचे वितरण अत्यंत विषम आहे. ‘रफिया ’ माडापासून दारू काढतात. ही दारू येथील लोकांचे राष्ट्रीय पेय आहे.

अनेक जमाती व पोट-जमाती अस्तित्वात असल्याने त्यांच्या चारविचारांत फरक पडतो. युद्धासाठी व मानासाठी तलवारीचा उपयोग होई व अजूनही होतो. प्रत्येक जमातीच्या तलवारीचा आकार वेगळा असतो. उत्तरेकडील अनेक जमाती भाले व विशेषतः वेध घेणारे चाकू यांचा उपयोग करण्यात अतिशय पटाईंत आहेत.

समाजव्यवस्थाही जमातीनुसार वेगवेगळी आढळते. तसेच त्यांच्या प्रथा व सणही वेगवेगळे असतात. बांटू समाजातील हजारो पोटजातींत सुंतेची पद्धत आहे. वयात येणाच्या वेळी अनेक जमातींत धार्मिक कृत्ये केली जातात. तशाच प्रकारची धार्मिक कृत्ये ‘सुकु’ समाजही अंमलात आणतो. पुरातन काळी आठव्या वर्षी व सध्या १० ते १५ वर्षाचे दरम्यान सुंता केली जाते. या जमातीत मुलींसाठी असे धार्मिक कृत्य मात्र आढळत नाही. सुंतेनंतर मुलाचे नवीन नाव ठेवले जाते. त्याला त्यानंतर समाजात मानाने वागविले जाते. पिग्मी समाजात ‘म्‌बुती ’ नावाचा सुंतेसारखा पण यौवनारंभ विधी साजरा केला जातो. इतर निग्रो जमातींत ‘न्-कुम्बि’ नावाचा विधी असतो परंतु पिग्मी लोकांच्या दृष्टीने न्-कुम्बि संस्कारानेच केवळ मुलगी वयात आली असे मानले जात नाही त्यासाठी ‘एलिमा’ विधी पहिल्या ऋतुप्राप्तीच्या वेळी करतात. एलिमा झालेली मुलगी वयात आली असे मानून तिचे लग्न करण्यास मोकळीक असते. तिला समाजात मानाचे स्थान मिळते. हा संस्कारविधी खेड्याबाहेरील वेगळ्या ‘एलिमा-झोपडी’ त केला जातो. मुलीबरोबर तिच्या मैत्रिणीही महिनाभर एलिमा-झोपडीत राहतात. अशा वेळी समवयस्क मुलामुलींना एकत्र येण्याची परवानगी दिली जाते. मुले मुलींची स्तुती करतात. त्यांची अनुमती मिळवितात आणि अशा सलगीतून लग्ने जमविण्यात येतात. इतर खेड्यांतील तरुणांचा शोध व मुलींना धार्मिक व रूढीनुसार नृत्य-गायन शिकविणे यांसाठी मुलींना मग झोपडीपासून दूर नेतात. मुलांना आपल्या शौर्याच्या जोरावर आपले तारुण्य सिद्ध करावे लागते. अनेक स्रियांच्या गराड्यातून जो तरुण दंडांचा व दगडांचा मार सहन करीत त्यांना पार करतो, त्यास मुलींच्या माराला तोंड द्यावे लागते. मारता मारता मुली थकेपर्यंत तरुणाने जर टिकाव धरला, तर तो तारुण्यावस्थेला पोहोचला असे मानतात. कुटुंबपोषण पात्रता सिद्ध करण्यासाठी तो तरुण शिकार मारून, ती मुलींच्या आईवडिलांस भेट म्हणून देतो. अशा तरुणास हवे असेल, तर त्याच्या शौर्याबद्दल त्याच्या कपाळावर तीक्ष्ण बाणाने तीन रेघा कोरल्या जातात. अशा प्रकारचे अनेक विधी वेगवेगळ्या जमातींत साजरे केले जातात.

बहुतेक लोक जडप्राणवादी आहेत. तथापि काही ख्रिस्तीही आहेत आणि रोमन कॅथलिक व प्रॉटेस्टंट पंथांचे प्रचारक, पाद्री इ. आहेत. थोडे मुसलमानही आहेत. १९७० मध्ये ८० लक्ष रोमन कॅथलिक, ५० लक्ष प्रॉटेस्टंट, ३० लक्ष स्थानिक ख्रिस्ती, मुस्लिम सु. २ लक्ष आणि २,००० ज्यू होते. बहाई पूजास्थाने १४३ ठिकाणी होती.

समाजकल्याण व आरोग्य : १९६८ मध्ये झाईरेत ६१,५४५ रूग्णखाटा व १९६९ मध्ये ६१४ डॉक्टर होते व नवीन योजनेप्रमाणे त्यांची संख्या दुप्पट होईल. आजारपण, निवृत्तिवेतन व कुटुंबभत्ता यांसाठी आवश्यक राष्ट्रीय विमा योजना आहे. झाईरेत परदेशी विमा कंपन्यांस बंदी आहे.

भाषा आणि साहित्य : राज्यकारभाराची अधिकृत भाषा फ्रेंच आहे. तथापि सामान्य: बहुतेक लोकांत बांटू महाकुलातील अनेक भाषा बोलल्या जातात. तसेच नायजर-काँगो महाकुलातील बऱ्याच भाषा येथे प्रचलित आहेत. त्यातल्या त्यात स्वाहिली, कि-लुबा, कि-काँगो,मोनोकुतुबा या महत्त्वाच्या भाषा आहेत.

झाईरेत जितक्या जातीजमाती तितक्या भाषा, त्यामुळे एकता नांदणे कठीण असते. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक, शास्रीय व सांस्कृतिक संघटनेतर्फे १९६५ च्या ‘बामाको काँग्रेस’ मध्ये काही आफ्रिकन लिप्यांच्या एकीकरणाचा प्रस्ताव आला होता. आफ्रिकन भाषासाम्याच्या अभ्यासासाठी एखाद्या संस्थेची गरज भासते. आज शाळेतील माध्यमाचा सर्वात मोठा प्रश्न झाईरे समाजापुढे उभा आहे. लिखित साहित्यास अलीकडे सुरुवात झाली आहे परंतु लोकसाहित्य भरपूर आहे.

शिक्षण : १९४८ पर्यंत शिक्षणपद्धती रोमन कॅथलिक व प्रॉटेस्टंट धर्मप्रचारक संस्थांवर अवलंबून होती. त्यानंतर निधर्मी शाळा उघडण्यात आल्या. १९५६ पर्यंत यूरोपीय व आफ्रिकन या दोन्ही शाळापद्धतींत हवाबंद कप्पे नव्हते. आफ्रिकनांना यूरोपीय शाळेत जावयास बंदी नव्हती. १९७० मध्ये १५ वर्षांवरील लोकसंख्येत १५% साक्षर, पुरुष २९·२% व स्त्रिया २·८% होत्या. १९६९-७० मध्ये ४,२५९ प्राथमिक (६ ते १२ वर्षे) शाळांतून २८,२२,९०८ विद्यार्थी व ६३,५५१ शिक्षक आणि ५२१ माध्यमिक (१२ ते १४–१६ वर्षे) शाळांतून १,७५,६०३ विद्यार्थी व ५,८०४ शिक्षक होते. यांत सामान्य, तांत्रिक व व्यापारी माध्यमिक शाळांचा समावेश आहे. २२० व्यावसायिक शाळांतून २७,१९१ विद्यार्थी व २,३२० शिक्षक होते तर ३०२ शिक्षक-प्रशिक्षण शाळांतून ३८,६९० विद्यार्थी व २,९३० शिक्षक होते. दोन वर्षांच्या माध्यमिक शिक्षणानंतर दोन वा चार वर्षांच्या अभ्यासक्रमात वाङ्‌मय, इतिहास, व्यापार इ. विषयक खास शिक्षण घेता येते. विद्यापीठांव्यतिरिक्त ३३ उच्च शिक्षण संस्थांतून १०,१६५ विद्यार्थी व १,२९४ शिक्षक होते त्यांत ७ प्रगत शिक्षक-प्रशिक्षण महाविद्यालये, राष्ट्रीय कारभार विद्यालय, बांधकाम व सार्वजनिक काम संस्था, राष्ट्रीय खाण संस्था, कला अकादमी, उच्च व्यापार संस्था, उच्च शारीरिक शिक्षण संस्था, सामाजिक प्रशिक्षण संस्था, वैद्यकीय प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय राजकारण अभ्यास संस्था यांचा समावेश होतो. देशात तीन विद्यापीठे आहेत. १९६६-६७ मध्ये किन्शासा येथील लोव्हॅनियम विद्यापीठात १,८३७, लूबूंबाशी येथील झाईरे अधिकृत विद्यापीठात ९०२ व किसांगानी आणि कनांग येथील फ्री युनिव्हर्सिटीत १८६ असे एकूण २,९२५ विद्यार्थी होते.


कला व क्रीडा : झाईरे देश कला व क्रीडा या बाबतींत अनेक आफ्रिकी देशांच्या पुढे आहे. त्यांची आनुवंशिक कला म्हणजे लाकडावरील कोरीवकाम होय. विशेषतः द. झाईरेतील जमाती पुरातन धार्मिक विधींशी संलग्न कल्पनांप्रमाणे लागणाऱ्या आकृत्या व नृत्याचे वेळी लागणारे मुखवटे करण्यात फारच पटाईत आहेत. आधुनिक खेळांचा व त्यांच्या स्पर्धांचा प्रसार वेगाने होत आहे.

महत्त्वाची स्थळे : एम्बांडाका (कोकिलातव्हिल), एक्वेटर प्रांताची राजधानी असून रूकी-काँगो नदी संगमावर आहे. बानाना हे काँगो नदीच्या मुखावरील उत्तम बंदर असून सोळाव्या शतकापासून यूरोपीयांचे केंद्र आहे. बोमा ही पूर्वीची शासकीय राजधानी असून लोहमार्गाने व सडकेने मायूंबेशी जोडलेली आहे. या बंदरातून कॉफी निर्यात होते. बूकावू (पूर्वीचे कॉस्टेरमान्सव्हिल ) हे किवू सरोवरावरील निसर्गसुंदर किवू प्रांताची राजधानी आहे. त्याच्या सभोवतीचा प्रदेश पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने भरभराटीला येण्याजोगा आहे. माताडी हे झाईरेचे महत्त्वाचे बंदर आहे. येथून मालेबोपूल व किन्शासापर्यंत लोहमार्ग आहे. हे बानानापासून १५० किमी. असून येथपर्यंत सागरी बोटी येऊ शकतात. किन्शासा (लिओपोल्डव्हिल) हे राजधानीचे ठिकाण असून औद्योगिक केंद्र आहे. किसांगानी (स्टॅन्लीव्हिल) ही ओझाईरे प्रांताची राजधानी असून किन्शासापासून सु. १,२०० किमी. आहे. लूबूंबाशी ही शाबाची राजधानी आहे. कनांग ही पश्चिम कासाई प्रांताची व एम्बूजी मायी हे हिरेखाणी केंद्र पूर्व कासाई प्रांताचे प्रमुख शहर आहे. लिकासी (झादोव्हिल) हे शाबातील एक महत्त्वाचे शहर आहे. बहुतेक सर्व प्रमुख शहरांतून विशेषतः यूरोपीयांच्या वस्तीत, सर्व आधुनिक सुखसोयी-वीज, पाणी, रस्ते, स्वच्छता, चांगली घरे, हॉटेले, क्लब, क्रीडांगणे, चित्रपटगृहे, वर्तमानपत्रे इ. आढळतात.

संदर्भ : 1. Boyd Van Rensbury, An Atlas of African Affairs, London, 1962.

   2. Last, G. C. A  Regional Survey of Africa,  Addis Ababa, 1964.

पांडे, वि. गो. कुमठेकर, ज. ब.

8लोफोई धबधबा, शाबा.संसदभवन, किन्शासा.पारंपरिक लोकनृत्य‘मायूंबे’-वनातील प्राचीन थडगीआधुनिक खुले नाट्यगृहकिन्शासा : एक बाजारदृश्य.धर्मविधीतील मुखवटातांबे व कोबाल्ट खाण, लिकासी.झाईरेतील प्राणिविशेष