झँबीझी : आफ्रिकेतील एक मोठी नदी. लांबी सु. ३,५४० किमी. जलवाहनक्षेत्र उपनद्यांसह सु. १२,९५,००० चौ.किमी. ही झँबियाच्या वायव्य कोपऱ्यात १,४६३ मी. उंचीवर, कालिनी हिल येथे उगम पावून अंगोला, झँबिया, नैर्ऋत्य आफ्रिका, बोट्स्वाना, ऱ्होडेशिया व मोझँबीक यांतून किंवा त्यांच्या सीमांवरून सामान्यतः आग्नेयीकडे वाहत जाऊन चिंदे येथे हिंदी महासागरास मिळते. उगमापासून मुखापर्यंत कावळाझेप अंतर १,८०० किमी.पर्यंत असले, तरी तिच्या प्रवाहाला दक्षिणेकडे एक आणि उत्तरेकडे एक अशी प्रचंड वळणे मिळाल्यामुळे त्याची आकृती आडव्या इंग्रजी एस् अक्षरासारखी झाली आहे. पहिल्या वळणात तिला उजवीकडून ल्वेना, लुंग्वेबुंगू, चोबे (क्वांडो), सान्याती व डावीकडून काबोम्पो, सर्वांत मोठी काफूए तसेच दुसऱ्या वळणात उजवीकडून माझोए व डावीकडून ल्वांगगिंगा, कापोचे, शीरे या प्रमुख उपनद्या व इतर अनेक प्रवाह मिळतात. झँबीझी उष्णकटिबंधातून वाहत असल्यामुळे तिला पावसाचे भरपूर पाणी मिळते. तिच्यातून दरवर्षी सरासरी ४५·६ लक्ष हेक्टर–मीटर (३७० लक्ष एकर–फूट) पाणी वाहते. तिच्या खोऱ्याचा बराचसा भाग पठारी असल्यामुळे त्याचे हवामान काहीसे सौम्य झाले आहे. ल्वांगगिंगा खोऱ्यात कमाल तपमान ४४° से. व ९५१ मी. उंचीवरील सेशेके येथे किमान तपमान –७° से.नोंदले गेले आहे.
झँबीझीच्या खोऱ्यात विषुववृत्तीय अरण्ये, गवताळ प्रदेश व ओसाड आणि निमओसाड प्रदेश असल्यामुळे ते ते विशिष्ट वनस्पतिप्रकार व प्राणी तेथे आढळतात.
झँबीझी अंगोलातून झँबियात येते तेथे चावुमा धबधबा, त्यानंतर बरॉत्स मैदानातून गेल्यावर एन्गोन्ये धबधबा, त्याच्या खाली कातीमा मूलीलो रॅपिड्सपर्यंत ११२ किमी. द्रुतवाह आणि झँबिया–ऱ्होडेशिया सीमेवर तिचे पात्र सर्वांत रुंद (१,७०० मी.) होते. तेथे जगप्रसिद्ध व्हिक्टोरिया धबधबा आहे. त्यानंतर सु. ४८० किमी.वर करिबा येथे प्रचंड धरण आहे. सान्याती संगमाखाली करिबा येथे, ल्वांगगिंगा संगमाचेवर एम्फटा येथे, मोझँबीकमध्ये केब्राबासा येथे व त्याच्या खाली लुपाटा येथे नदी अरुंद, खडकाळ निदऱ्यातून जाते. केब्राबासानंतर टेटे मैदानातून व लुपाटानंतर मोझँबीकच्या मैदानातून ती जाते. मुखाजवळ चिंदेच्या दक्षिणेस तिचा विस्तृत व दलदलीचा त्रिभुज प्रदेश आहे.
दहाव्या शतकात अरबांनी व सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी हस्तिदंत, सोने व गुलाम मिळविण्यासाठी झँबीझीच्या मुखातून अंतर्भागात प्रवेश केला. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास मिशनरी लिव्हिंग्स्टनने व्हिक्टोरिया धबधब्याचे व सेशेकेपासून महासागरापर्यंतच्या प्रदेशाचे समन्वेषण केले. त्यानंतर इतर भागांचे समन्वेषण झाले.
झँबीझीच्या खोऱ्यात अनेक आफ्रिकी जमातीचे लोक निर्वाह शेती, पशुपालन, मासेमारी व थोडा व्यापार करून राहतात. ते ज्वारी, बाजरी, मका, रताळी, कापूस, ऊस, तंबाखू इ. पिकवतात. यूरोपातून पोर्तुगीज, इंग्रज वगैरे आल्यावर त्यांनी खाणकाम, व्यापारी शेती इ. सुरू करून नौकानयन, जलविद्युत् निर्मिती यांसाठी नदीचा उपयोग सुरू केला. करिबा येथे १९७० मध्ये निर्माण झालेली आठ अब्ज किवॉ.ता. वीज ६६·७% ऱ्होडेशियाने व २३·३% झँबियाने वापरली. केब्राबासा येथे व काफूए नदीवर जलविद्युत् निर्मिती योजना आहेत.
व्हिक्टोरिया धबधब्याजवळच्या आणि मोझँबीकमधील झँबीझीवरील पुलांवरून लोहमार्ग व सडका जातात. चीरूंडू येथे काफूए संगमाजवळ सडकेचा पूल असून करिबा धरणाच्या भिंतीवरून १२ मी. रुंदीची सडक जाते. मुखापासून केब्राबासापर्यंत ६४० किमी. व त्याच्या वर धबधबे व द्रुतवाह टापूत सु. १,९६० किमी. वर सपाट तळाच्या आगबोटी चालू शकतात.
झँबीझीशी संबद्ध असलेल्या प्रदेशातील राजकीय घडामोडींचा परिणाम तिच्या उपयोगित्वावर कितपत होतो, हे अद्याप स्पष्ट व्हावयाचे आहे.
यार्दी, ह. व्यं. कुमठेकर, ज. ब.
“