झने, झां : (१९ डिसेंबर १९१०– ). फ्रेंच कादंबरीकार आणि नाटककार. पॅरिस येथे जन्म. आईचे नाव गाब्रीएल झने वडिलांचे नाव अज्ञात आहे. वयाच्या सातव्या वर्षी मॉरव्हां येथील एका शेतकरी कुटुंबात त्याची राहण्याची व्यवस्था झाली. लहानपणापासूनच तो चोऱ्या करू लागला. वयाच्या पंधराव्या वर्षी त्याला एका सुधारशाळेत पाठविण्यात आले. एका बहिष्कृत गुन्हेगाराचे जीवन तो तेव्हापासून जगू लागला. अनेकदा त्याने तुरुंगवास भोगला. चोऱ्या करणे, भीक मागणे आणि समलिंगी संभोगासाठी स्वतःच्या शरीराचा विक्रय करणे हा त्याचा व्यवसाय झाला. घरफोडीच्या आरोपावरून तुरुंगात असताना (१९४२) तो लेखन करू लागला. नॉत्र-दाम-दे-फ्लर (१९४४, इं. भा . अवर लेडी ऑफ द फ्लॉवर्स, १९४९) आणि मिराक्ल द् ला रोझ (१९४५–४६, इं. भा. मिरॅकल ऑफ द रोझ, १९६५) ह्या त्याच्या आरंभीच्या दोन कादंबऱ्या. पहिलीत गुन्हेगारांच्या व मनोविकृतांच्या अधःपतित जगाचे वेधक वर्णन असून दुसरीत तुरुंगातून आणि सुधारशाळांतून गुन्हेगारांना मिळणाऱ्या वागणुकीचे विदारक चित्रण आहे. पाँप फ्युनेब्र (१९४७, इं. भा. फ्यूनरल राइट्स, १९६८) आणि करॅल द् ब्रॅस्त (१९४७, इं. भा. करॅल ऑफ ब्रॅस्त, १९६६) ह्या दोन कादंबऱ्याही गुन्हेगारीशीच संबंधित आहेत.
पुढे झने नाट्यलेखनाकडे वळला. ओत स्युरव्हॅय्यांस (१९४९, इं. भा. डेथवॉच, १९५४) ह्या त्याच्या आरंभीच्या नाटकात खरा गुन्हेगार हा अटळ नियतीचा बळी असतो, असा विचार आलेला आहे. त्यानंतरच्या ले बॉन्न (१९४७, इं. भा. द मेड्स, १९५४) ह्या नाटकास विशेष यश मिळाले. त्यातील सखोल सामाजिक आशय लक्षणीय आहे. झनेने आपल्या नाट्यकृतींतून अनेक ज्वलंत विषय हाताळले. उदा., ले नॅग्र (१९५८, इं. भा. द ब्लॅक्स, १९६०) मध्ये वर्णद्वेष ल बाल्काँ (१९५६, इं. भा. द बाल्कनी, १९५८) मध्ये क्रांती ले पाराव्हां (१९६१, इं. भा. द स्क्रीन्स, १९६२) मध्ये युद्ध इत्यादी. प्रयोगशील दृष्टी ठेवून झनेने नाट्यलेखन केले व सुसंस्कृत जगातील दांभिकता उघड केली.
जुर्नाल दं व्हॉलर (१९४९, इं .भा. द थीफ्स जर्नल, १९५४) ह्या त्याच्या आत्मचरित्रात त्याच्या जीवनाची स्फोटक हकीकत आलेली आहे. त्याने कविताही लिहिल्या. त्यात ‘ल काँदाने आ मॉर ’ – देहान्ताची शिक्षा झालेली कैदी- ही विशेष उल्लेखनीय आहे.
एका गंभीर गुन्ह्याच्या संदर्भात झनेला १९४८ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली, तेव्हा झां पॉल सार्त्रसारखे विख्यात फ्रेंच साहित्यिक त्याची सुटका करावी, असे आवाहन करण्यासाठी पुढे आले व झनेला मुक्त करण्यात आले. त्याच्या समग्र लेखनाचा पहिला खंड १९५१ मध्ये प्रसिद्ध झाला. त्याला सार्त्रने ‘सँ झने कॉमेदियँ ए मार्तीर’ (इं. भा. सेंट झने ॲक्टर अँड मार्टर, १९६३) ही आपली मार्मिक प्रस्तावना जोडली होती.
झनेच्या जुर्नाल दं व्हॉलरमधील पुढील आशयाच्या ओळींवरून त्याच्या वाङ्मयीन प्रकृतीची थोडीफार ओळख होते : माझे नशीब हुडकून काढण्यासाठी काळोखाच्या दिशेने जाण्याचे मी ठरविले. तुमच्या जीवनाच्या उलट तुमच्या सौंदर्यकल्पनांच्या उलट…
सरदेसाय, मनोहरराय