जोशीमठ : ज्योतिर्मठ. हिमालयातील एक तीर्थक्षेत्र. हे उत्तर प्रदेश राज्याच्या चमोली जिल्ह्यात बद्रीनाथच्या दक्षिणेस ३२ किमी. वर आहे. लोकसंख्या ५,८५२ ( १९७१). हे धौलीगंगा-विष्णुगंगा संगमाच्या वरच्या बाजूस अर्ध्या किमी.वर १,८६१ मी. उंचीवर आहे. हिवाळ्यात बर्फामुळे बद्रीनाथकडे जाता येत नाही, म्हणून देवाची चलमूर्ती व अन्य पवित्र वस्तू आश्विन ते वैशाख या काळात येथे आणल्या जातात. तेव्हा पूजेअर्चेची सोय व्हावी म्हणून आद्य शंकराचार्यांनी या मठाची स्थापना केली. यास ज्योतिर्मठ असेही म्हणतात. मठात पूजेचे शाळिग्राम असून संस्कृत पोथ्यांचा संग्रहही आहे. येथील पुष्कळ प्राचीन मंदिरांपैकी नरसिंहमंदिर प्रसिद्ध असून काही मंदिरांचे भूकंपाने नूकसान झाले आहे. तेथे आचार्यांची एक गुंफा असून, ज्या तुतीच्या झाडाखाली बसून ते चिंतन करीत, ते झाड आजही दाखविले जाते. एरोकाळी हे ठिकाण सुंदर व दाट वनश्रीने युक्त होते परंतु जळणासाठी व घरांसाठी केलेली बेसुमार जंगलतोड, रस्ते व घरे यांसाठी केलेले खोदकाम आणि सांडपाण्याचा योग्य निचरा करण्याकडे दुर्लक्ष यांमुळे भूमिपात व जमीन खचणे यांचा धोका गावाला भेडसावीत आहे.

कांबळे, य. रा.