जोधपूर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील एक संस्थान. याला मारवाड असेही म्हणतात. राजपुतान्यातील हे सर्वांत मोठे संस्थान असून जोधपूरचे संस्थानिक स्वतःस अयोध्येच्या रामाचे वंशज समजतात. क्षेत्रफळ सु. ९०,५५० चौ. किमी. वार्षिक उत्पन्न ५६ लाख रुपये. लोकसंख्या २५,५५,९०४ (१९४१). उत्तरेस बिकानेर, जयपूर, जैसलमीर पश्चिमेस सिंध दक्षिणेस कच्छ, पालनपूर, सिरोही, उदयपूर पूर्वेस अजमीर व किशनगढ संस्थाने यांनी ते सीमांकित झाले असून संस्थानात २३ जिल्हे, २७ शहरे आणि ४,०३० खेडी होती. तेराव्या शतकात राठोड वंशीय राजपूत मारवाडात स्थिर झाले. १३८१ ते १४९९ च्या दरम्यान त्यांची राजधानी मंडोर येथे होती. राव जोधाने जोधपूर वसवून (१४५९) तेथे राजधानी केली. राव जोध कनौजच्या जयचंदचा वंशज. त्यानंतर राव मालदेव (१५३२–६९) याने संस्थानचा खूपच राज्यविस्तार करून शेरशाहचा पराभव केला. अकबरानेही जोधपूरवर स्वारी केली. (१५६९) आणि बराच भूप्रदेश जिंकून मालदेवाचे बहुतेक राज्य दुसऱ्या इसमास दिले. त्याचा मुलगा उदयसिंह याने अकबराचे प्राबल्य जाणून मोगलांचे स्वामित्व कबूल केले आणि आपली बहीण जोधाबाई अकबरास दिली. यामुळे बहुतेक मुलूख त्यास परत मिळाला. उदयसिंह १५९५ मध्ये मरण पावला आणि त्याचा मुलगा सूरसिंह गादीवर आला. तो १६२० मध्ये मरण पावला. त्याच्यानंतर त्याचा पुत्र गजसिंह जोधपूरचा राजा झाला. गुजरातेत लढत असता गजसिंह १६३८ मध्ये मारला गेला. गजसिंहानंतर त्याचा मुलगा जसवंतसिंह (१६३८–७८) गादीवर आला. मोगलांचा शूर सुभेदार होता. शाहजहानच्या मुलांत तंटे लागले, तेव्हा  जसवंतसिंहाने दाराचा पक्ष घेतला. त्याचा पराजय झाला. तथापि औरंगजेबाने त्यास दुखविले नाही पण त्याची बदली जोधापूरपासून दूरवरच्या प्रदेशात केली. त्याच्या मृत्यूनंतर अजितसिंह हा लहान मुलगा जोधपूरचा राजा झाला. औरंगजेबाने मारवाडवर चढाई केली. सतत २५ वर्षे स्वातंत्र्य संग्राम करून मारवाड यशस्वी ठरेल. दुर्गादास राठोडने अजितसिंहाचा सांभाळ केला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याने आपले गेलेले सर्व राज्य परत मिळविले व बापाची जी वाताहत बादशाहने केली, तिचा भरपूर सूड घेतला. त्याचा खून १७३१ मध्ये त्याच्या अभयसिंह (१७२४–५०) या मुलानेच केला.  अभयसिंह १७५० मध्ये मरण पावला व त्याचा मुलगा रामसिंह काही दिवस जोधपूरच्या गादीवर बसला पण त्याची उचलबांगडी चुलता बख्तसिंह याने केली. बख्तसिंहास विषप्रयोगाने मारले (१७५३). बख्तसिंहाचा मुलगा विजयसिंह गादीवर आला पण रामसिंहाने त्याच्याशी लढून आपले राज्य परत मिळविले. या सुमारास शिंद्यांचा जोधपूरच्या राजकारणात प्रवेश झाला आणि अजमीरचा भाग त्याच्याकडे गेला. रामसिंह १७७३ मध्ये मरण पावला. त्यानंतर विजयसिंह गादीवर आला. तो नामधारी राजा होता. खरी सत्ता मराठ्यांच्या ताब्यात होती. त्याने मराठ्यांच्या पडावाची खटपट केली पण तिचा काही उपयोग झाला नाही. विजयसिंह १७९३ मध्ये मरण पावला आणि त्याचा पुत्र भीमासिंह इतर भावास मारून मादीवर बसला पण दहा वर्षे झगडून अखेर त्याने आपले राज्य घालविले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस होळकर, पेंढारी यांचे प्राबल्य व अंतर्गत कलह आणि उदयपूरच्या कृष्णकुमारीसाठी जयपूरशी झगडा इ. घटनांची राज्याची शक्ती क्षीण झाली. मानसिंह याने उदयपूरची राजकन्या कृष्णकुमारी हिची प्राप्ती व्हावी, म्हणून जयपूरच्या जगतसिंहाबरोबर युद्ध केले. हा अत्यंत कलाभिज्ञ राजा झाला. त्याच्या कारकीर्दीत हजारो चित्रे तयार झाली. १८१८ मध्ये मानसिंहाचा मुलगा चतुरसिंह ह्याजबरोबर इंग्रजांनी तैनाती फौजेचा तह केला आणि जोधपूरने इंग्रजांची मांडलिकी पतकरली. इंग्रजांनी तख्तसिंहानामक एका दूरच्या वंशजास जोधपूरच्या गादीवर बलविले. १८४७ मध्ये इंग्रजांनी उमरकोट जिल्हा आणि किल्ला घेऊन त्याच्या बदल्यात खंडणी रु. १,०८,००० वरून रु. ९८,००० वर आणली पण इंग्रजांनी तैनाती फौजेकरिता वार्षिक रक्कम १,१५,००० रु. घेण्याचे ठरविले. एकोणिसाव्या शतकात जोधपूरच्या महाराजांना स्वतःच्याच सरंजामदारांशी झगडावे लागले. त्यानिमित्त इंग्रजांना १८३९ व १८६८ मध्ये संस्थानच्या कारभारात हस्तक्षेप करावा लागला. तख्तसिंहाच्या कारकीर्दीत (१८४३–७३) सांभरच्या मिठाच्या खाणी इंग्रजांनी ताब्यात घेतल्या. जसवंतसिंहाने (१८७४–९५) रेल्वे, पाणीपुरवठा, जकातव्यवस्था, जमीनमहसूल, वनरक्षण, पक्क्या सडका, डाक व्यवस्था, मोफत शिक्षण, आरोग्य अशा अनेक सुधारणा केल्या. सांभर शहरावर जोधपूर–जयपूरचा संयुक्त अधिकार असे. शिवाय ब्रिटिश मारवाडातील २१ खेड्यांत जोधपूरला काही हक्क होते. जसवंतसिंहानंतर त्याचा मुलगा सरदारसिंह (१८९५–१९११) गादीवर आला. त्यांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सुमेरसिंह (१९११–३८) गादीवर बसला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा धाकटा भाऊ उमेदसिंह गादीवर आला.

विसाव्या शतकात संस्थानात मारवाड हितकारिणी सभा, तिची शाखा मारवाड सेवा संघ, मारवाड युथ लीग इत्यादींमुळे राजकीय जागृती झाली. १९२० मध्ये महाराजांच्या परदेशवासाविरुद्ध सेवासंघाने सत्याग्रह केला. लीगने जबाबदार राज्यपद्धतीची मागणी केली. संस्थानने पहिल्या महायुद्धात इंग्रज सरकारला सर्वतोपरी साहाय्य दिले. १९४९ मध्ये संस्थान राजस्थान संघात विलीन झाले. महाराज संघाचे जेष्ठ उपराजप्रमुख झाले.

कुलकर्णी, ना. ह.