जैव व रासायनिक युद्धतंत्र : जेव्हा जैविक व रासायनिक पदार्थांचा शत्रुसंहाराकरिता किंवा शत्रुसैनिकांना तात्पुरते निर्बल करण्याकरिता उपयोग केला जातो, तेव्हा त्या युद्धतंत्रास जैव किंवा जैविक रासायनिक युद्धतंत्र म्हणतात. सूक्ष्मजंतू, व्हायरस, कवके इ. जैविक पदार्थांचा मनुष्य, पशुपक्षी किंवा वनस्पती यांमध्ये रोगोत्पादन वा त्यांचे प्राणहरण करण्याच्या उद्देशाने उपयोग करण्यात येतो. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या प्रयोगांपासून त्यांचे संरक्षण करण्याची उपाययोजनाही केली जाते. 

इतिहास : सूक्ष्मजंतूंच्या अस्तित्वाची तसेच त्यांच्या रोगोत्पादक सुप्त शक्तीची कल्पना येण्यापूर्वीपासूनच जैविक युद्धतंत्राची उपयुक्तता मानवाला जाणवली होती. पटकी किंवा प्लेग या रोगांमुळे दगावलेल्यांची प्रेते तटबंदीबाहेर फेकून देऊन ते रोग वेढा घातलेल्या शत्रुसैनिकांमध्ये पसरविण्याची कल्पना पूर्वीच सुचलेली होती. नेपोलियनने इटलीमधील मँट्युआ शहराला वेढा दिला असताना, त्या शहराभोवती कृत्रिम दलदल तयार केली होती. दलदलीमुळे हिवतापाचा प्रादुर्भाव वाढून शहरवासी इटालियन जर्जर होऊन शरण यावेत, हा त्यामागील हेतू होता. अमेरिकेतील इंडियनांविरुद्ध झालेल्या संग्रामात गोऱ्या वसाहतकारांनी देवीच्या रोगजंतूंची मुद्दाम दूषित केलेली गरम पांघरूणे इंडियन लोकांत मुद्दाम वाटून तो रोग पसरविण्याची क्लृप्ती योजिली होती. अथर्ववेदात राक्षसांनी सोडलेली रोगरूप आयुधे अन्यत्र जाऊन पडोत, अशी इंद्राला केलेली प्रार्थना आढळते (अथर्ववेद  २·१). प्राचीन काळी ज्वाला, धूर आणि अनिष्ट वायू वापरले असावेत. तसेच विहिरीत विष कालवून शत्रूला मारण्याचे प्रयत्न होत असावेत, असे रामायणावरून वाटते. ख्रि. पू. ४३१–४०४ या काळात स्पार्टा व अथेन्स यांच्यातील युद्धात डांबर व गंधक जाळून गुदमरवून टाकणाऱ्या विषारी वायूंचा करण्यात आला होता. ६७० च्या सुमारास अतिज्वालोत्पादक (ग्रीक फायर नावाचे) रासायनिक मिश्रण शोधण्यात आले. गंधक, रोगण व चुना यांचे पाण्याबरोबरील हे मिश्रण ६७३ च्या कॉन्स्टँटिनोपलच्या वेढ्यात अरब जहाजे व सैनिकांविरुद्ध वापरण्यात आले होते. त्यानंतरच्या अनेक आरमारी युद्धांतून ते वापरले गेले. बाराव्या शतकात बगदादच्या खलिफाच्या सैन्यात एक खास पथक नेमले होते. ते नगतैल (नाफ्था) या ज्वालाग्राही पदार्थाने भरलेली भांडी शत्रूच्या अंगावर फेकी. या कामगिरीवरून त्या पथकाला ‘नॅफ्थीन’ असेच नाव पडले होते. गोऱ्या वसाहतवाल्यांविरुद्ध अमेरिकन – इंडियन हे एकोणिसाव्या शतकापर्यंत चरबी वगैरे लावलेले ज्वालोत्पादक बाण वापरीत होते. १८५५ मध्ये क्रिमियन युद्धाच्या वेळी सेव्हॅस्टोपोल शहराला वेढा घातला असताना लॉर्ड डनडॉनल्ड याने पुष्कळसे गंधक जाळून व शहरामध्ये अनिष्ट वायू सोडून ते जिंकण्याची कल्पना मांडली होती पण ती अमान्य करण्यात आली. १८६२ मध्ये अमेरिकन यादवी युद्धात क्लोरीन वायू भरलेले तोफगोळे वापरण्यास मनाई करण्यात आली होती. मिरच्यांची पूड व धूर वापरल्याची उदाहरणेही आहेत. तसेच उकळते तेलदेखील वापरले जात असे. पहिल्या महायुद्धात प्रथमच जानेवारी १९१५ मध्ये जर्मनांनी युद्धवायू वापरले. पुढे क्लोरिन, मस्टर्न गॅस हे वायू वापरण्यात आले. वायुगोळे उखळी तोफांमधून सोडण्यात येत परंतु वाऱ्यावर नियंत्रण नसल्यामुळे, ज्यांनी युद्धवायू वापरले त्यांच्यावरच त्या वायूंचे दुष्परिणाम झाले. जैविक युद्धतंत्राच्या दृष्टीने, रूमानियाच्या घोडदळांतील घोडे व अमेरिकेतून यूरोपकडे पाठविण्यात येणारे प्राणी यांच्या बाबतीत जर्मनांनी शेंबा नावाच्या रोगाच्या सूक्ष्मजंतूंचा उपयोग केला होता. दुसऱ्या महायुद्धामध्ये या युद्धतंत्राचा वापर फक्त धूर व ज्वालोत्पादक पदार्थांपर्यंतच मर्यादित राहिला. मात्र हे पदार्थ फार मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आले. या महायुद्धाच्या शेवटास जर्मनांनी काही नवीन विषारी वायू शोधले होते. ते तोपर्यंत ज्ञात असलेल्या सर्व विषारी वायूंपेक्षा अधिक प्रभावी होते. या नव्या वायूंना ‘तंत्रिका वायू’ म्हणून संबोधण्यात आले. त्यांपैकी काहींना ‘टाबून’, ‘सारीन’ व ‘सोमान’ अशी नावे जर्मनांनी दिली होती. 

रासायनिक युद्धतंत्राचा वापर १९१८ ते १९६७ पर्यंत फक्त दोन वेळा करण्यात आला. एकदा म्हणजे इटलीने इथिओपियाविरुद्ध केलेल्या युद्धात (१९३५–३६) आणि दुसऱ्यांदा जपानने चीनविरुद्ध केलेल्या युद्धात (१९३७–४२). १९५२ मध्ये कोरियन युद्धात अमेरिकेने जैविक युद्धतंत्राचा वापर केल्याचा आरोप लाल चीनने केला होता परंतु त्याबद्दलचा पुरावा आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस समितीपुढे देण्यास चीन व उ. कोरिया असमर्थ ठरले. उ. कोरियाने या समितीमधील सभासदांना आपल्या भागात येण्यास मनाई केली. १९६७ मध्ये येमेनमधील कानमा आणि किताफ या खेड्यांतील लोकांवर ईजिप्तने युद्धवायू वापरले, असे म्हणतात. उ. व्हिएटनाममध्ये झालेल्या युद्धात (१९६५–७२) अमेरिकेने परिस्थितिकीय युद्धतंत्र वापरले. या तंत्रात जंगले, रस्त्यांच्या कडा, उ. व्हिएटनाम सैन्याच्या आधारतळाभोवतीची जंगले, गवत वगैरेंवर वनस्पतिनाशक रसायने फवाऱ्याने शिंपडली. यामुळे झाडाझुडपांचा नाश होऊन सैनिकांना लपणे कठीण झाले. या वनस्पतिनाशक  कारवाईला ऑपरेशन रँच हँड म्हणतात. याचीच दुसरी आवृत्ती म्हणजे पीकपाणी यांचा नाश करणे ही होय. याचाही उपयोग द. व्हिएटनाममध्ये करण्यात आला. डायोकीन, थलिडोमाईड आणि पिक्लोरॅम, कार्बनी आर्सिनेट वगैरे रसायने वापरली. तसेच साम्यवादी सैनिकांना मारण्यासाठी, वातावरणातील प्राणवायुप्रमाण कमी करणारी रसायनेही वापरण्यात आली, असे म्हणतात. 

साधने : रासायनिक युद्धतंत्रामध्ये प्रथम धूर आणि अनिष्ट वायू वापरण्यात आले. पुढे रसायनशास्त्राच्या प्रगतीबरोबरच, विशेषेकरून अठराव्या व एकोणिसाव्या शतकांमध्ये अनेक प्रकारचे विषारी पदार्थ युद्धासाठी शोधण्यात आले. रासायनिक साधनांचे दोन प्रकार आहेत : (१) शरीरावर व ज्ञानेंद्रियांवर प्रत्यक्ष दुष्परिणाम करणारे विषारी वायू व (२) ज्वालोत्पादक पदार्थ. 


पहिल्या प्रकारात सुरुवातीला फक्त वायुरूप पदार्थांचाच समावेश करण्यात येत असे परंतु कालांतराने शरीरावर प्रत्यक्ष दुष्परिणाम करणाऱ्या घनरूप, द्रवरूप इ. सर्वच पदार्थांचा या गटात समावेश करण्यात आला. उदा., (अ) फोड आणणारे वायू : या वायूंमुळे त्वचा, श्लेष्मकला तसेच डोळ्याचे स्वच्छमंडल यांमध्ये प्रथम क्षोभ उत्पन्न होऊन लाली येते व नंतर द्रव असलेले फोड तयार होतात. मस्टर्ड गॅस व त्याचे प्रकार आणि लेविसाइट या पदार्थाचा यात समावेश होतो. मस्टर्ड वायूला लसणासारखा व लेविसाइटला जिरेनियमासारखा वास येतो. मस्टर्ड गॅसच्या प्रकारांना कोणताही वास नसल्यामुळे ते अधिक धोकादायक आहेत. (आ) अश्रुधूर : पहिल्या महायुद्धात अश्रुधूर मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आला. त्याचा परिणाम टिकाऊ स्वरूपाचा नसतो. प्रक्षुब्ध जमाव पांगविण्याकरिता पोलिसदले या वायूचा उपयोग करतात. (इ) मळमळकारक व वमनकारक वायू : या वायूंना शिंक आणणारे वायू असेही संबोधितात. या वायूंमुळे मळमळमणे, ओकारी होणे तसेच श्वसनमार्गाचा क्षोभ इ. दुष्परिणाम होऊन अशक्तपणा येतो. (ई) तंत्रिका वायू : हे वायू तंत्रिकातील संवेदनावाहनात बिघाड उत्पन्न करतात. जर्मनांनी दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटास टाबून, सारीन व सोमान या नावांचे तीन वायू बनविले. आजपावेतो ज्ञात असलेल्या सर्व विषारी वायूंमध्ये हे अत्यंत विषारी आहेत. अमेरिका ‘सारीन’ व रशिया ‘टाबून’ या वायूवर भर देत आहेत. अनेक कीटकनाशकांमध्ये हे वायू वापरतात. (उ) फुप्फुसक्षोभक वायू : हे वायू श्वसनमार्गात क्षोभ उत्पन्न करतात. या वायूंमुळे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मनुष्य गुदमरून मरतो. यासाठी क्लोरिन, फॉस्‌जीन हे रासायनिक वायू वापरले जातात. (ऊ) रक्तवायू : हायड्रोजन –सायनाइड, सायनोजन-क्लोराइड व आर्सीन यांचा या गटात समावेश होतो. हे वायू हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते एका जागी फार काळ टिकू शकत नाहीत. त्यामुळे ते परिणामकारक रीतीने कधीही वापरण्यात आलेले नाहीत. (ओ) दृष्टीवर परिणाम करणारे धूर : रसायनशास्त्राच्या प्रगतीबरोबरच निरनिराळ्या रंगांचे धूर मोठ्या प्रमाणावर उत्पन्न करणारी द्रव्ये शोधण्यात आली आहेत. पांढरा फॉस्फरस हा अतिज्वालाग्राही पदार्थ तोफगोळे, बाँब व हातबाँब यांत भरून त्यांचा मारा करतात. असे प्रक्षेपणास्त्र स्फोट पावताच त्याचे लहान तुकडे इतस्ततः पसरतात. अतिज्वालाग्राही असल्यामुळे ते पेटतात. त्यांपासून धूर उत्पन्न होऊन तो सर्वदूर पसरतो. हा धूर दृष्टीस अडथळा उत्पन्न करणाऱ्या सर्व धुरांमध्ये अत्यंत प्रभावी आहे. त्याशिवाय हे लहान तुकडे बराच वेळ धुमसत राहून जवळपासच्या इतर ज्वालाग्राही पदार्थांना आग लावू शकतात. ५५ टक्के सल्फर ट्रायॉक्साइड व ४५ टक्के क्लोरोसल्फॉनिक अम्ल हे मिश्रण धुराचा पडदा तयार करण्याकरिता वापरतात. लढाऊ जहाजे व विमाने यांवर या द्रवमिश्रणाने भरलेली उपकरणे बसविलेली असतात. (औ) मानसिक दुर्बलता निर्माण करणारे वायू : मर्यादित युद्धाकरिता सैनिकाला मानसिक दृष्ट्या तात्पुरते निकामी करण्यासाठी काही रासायनिक वायू तयार करता येतात. अशा वायूंमुळे सैनिक उन्मत्तपीडित, झोपाळू, उत्तेजित किंवा भयपीडित बनून लढाईत बरेच तास निकामी बनतो. हे वायू एल्.एस्.डी.–२५ पासून बनवितात. 

दुसऱ्या प्रकारातील ज्वालोत्पादक पदार्थ दुसऱ्या महायुद्धामध्ये फार मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले. मॅग्नेशियमचे निरनिराळे प्रकार, ॲल्युमिनियम चूर्ण, लोह ऑक्साइड व जस्त यांचे चूर्ण इत्यादींचे मिश्रण त्यांकरिता वापरतात. तेलापासून बनविलेले ज्वालोत्पादक पदार्थ हे गॅसोलीन, जड तेले व घनीकारक म्हणून  ॲल्युमिनियम साबण यांच्या मिश्रणापासून बनवितात. या मिश्रणास नापाम (Napam) म्हणतात व ते बाँब लढाऊ विमानातून टाकतात. ग्रीक अग्नीच्या धर्तीवर मोर्चे व सैनिक यांवर आग ओकण्यासाठी ज्वालाक्षेपक (फ्लेमथ्रोअर) असतात. हे पाठीवरून कोठेही नेता येतात.

साधने वापरण्यासाठी तत्त्वे व पद्धती : जैविक रासायनिक युद्धासाठी जी साधने वापरावयाची ती पुढील प्रमाणे परिपूर्ण असणे आवश्यक आहे : (१) त्यांची संक्रमणता परमावधीस गेलेली असावी (२) उष्णता, सूर्यप्रकाश इ. नैसर्गिक प्रतिरोधास ती न जुमानणारी असावी (३) त्यांचा प्रादुर्भाव व फैलाव जलद व्हावा (४) त्यांची मारकशक्ती तीव्र असून दुष्परिणाम टिकाऊ असावेत (५) मानव, प्राणी व वनस्पती यांवर ती परिणाम करणारी असावीत. 

साधने वापरताना कोणता परिणाम घडावयास हवा, हे अगोदर ठरवावे लागते. सैनिकी संहार मोठ्या प्रमाणावर करावयाचा असल्यास प्लेग, कॉलरा, देवी यांसारख्या रोगांचे सूक्ष्मजंतू वापरतात. याउलट सैनिकांना काही काळ निकामी बनविण्याकरिता टुलारीमिया किंवा ब्रुसेलोसिस यांसारख्या रोगांचा फैलाव करण्यात येतो. रोगांचा प्रादुर्भाव व फैलाव होण्याकरिता हवा, पाणी, अन्न व शारीरिक संपर्क या सर्वांचा उपयोग होतो. साधने वापरताना प्रत्येक वेळी विशिष्ट परिपाककाळाचा विचार करावा लागतो. हा काळ एक दिवसाचा किंवा कित्येक आठवड्यांचाही असू शकेल. सर्वच संक्रमणशील रोगांची मारकशक्ती सारखी नसते. प्लेग हा सर्वांत जास्त मारक रोग आहे. प्लेगची लागण झाल्यास ५० टक्के रोगी दगावण्याची शक्यता असते. 

जैविक पदार्थ वातविलेपाद्वारे वापरता येतात. तसे वापरण्याकरिता ते घनावस्थेत किंवा अर्धद्रवावस्थेत असले तरी चालतात. हे पदार्थ त्वचेमधून मानवी शरीरात प्रवेश करू शकत नाहीत. त्याकरिता तोफगोळे, बाण इत्यादींचा प्रथम वापर करून त्वचाभेदन करणे जरूर असते. मात्र ते श्वसनमार्गाद्वारे शरीरात प्रवेश करू शकतात. रेणवीय जीवविज्ञान आणि सूक्ष्मजीवी आनुवंशिकी यांच्या प्रगतीमुळे १९५० नंतर रोगजंतूंची मारकशक्ती वाढविणे तसेच सूर्यप्रकाश, आर्द्रता व प्रतिजैविके यांविरुद्ध त्यांची प्रतिकारशक्ती वाढविणे शक्य झाले आहे. 

रासायनिक पदार्थ चूर्ण, द्रव किंवा वायू या स्वरूपात वापरता येतात. ज्या ठिकाणी ते वापरावयाचे त्या ठिकाणच्या हवामानाचा विचार करावा लागतो. वारा, वादळ, पाऊस, हिमवर्षाव, तापमान व आर्द्रता यांचा रासायनिक पदार्थांवर परिणाम होतो. रासायनिक युद्धतंत्र हे युद्धनीती व व्यूहकौशल्य अशा दोन्ही शाखांत वापरता येते. निवडक्षमता, टिकाऊपणा, क्षेत्रव्याप्ती व गतिशीलता हे या युद्ध तंत्राचे महत्त्वाचे घटक आहेत. नेहमीच्या तोफगोळ्यांपेक्षा रासायनिक पदार्थांनी भरलेल्या तोफगोळ्यांचे परिणामक्षेत्र मोठे असते. रासायनिक पदार्थ वाऱ्याबरोबर वाहून नेले जातात आणि त्यामुळे नेहमीच्या संरक्षणात्मक उपायांना न जुमानता ते दूरवर पसरू शकतात. 


संरक्षणात्मक उपाय : रासायनिक साधनांचे तीन प्रकार लक्षात घेऊन संरक्षणात्मक उपाय योजावे लागतात. बिनविषारी धूर फारसे हानिकारक नसतात. बंदिस्त ठिकाणी अडकून पडलेल्या व्यक्तींनाच ते अपायकारक ठरतात. ज्वालोत्पादक पदार्थांविरुद्ध आगनिवारक व आगप्रतिबंधक उपाय उपयुक्त ठरतात. शरीरावर व विशेषतः श्वसनमार्गांवर होणाऱ्या विषारी वायूंच्या दुष्परिणामावर लक्ष ठेवावे लागते. त्याकरिता विशिष्ट वायुमुखवटे व विशिष्ट पेहराव वापरावे लागतात. शत्रूने अवलंबिलेल्या रासायनिक युद्धतंत्रामुळे होणाऱ्या हानीचे प्रमाण वायूच्या अनुशासनावर (गॅस डिसिप्लिन) अवलंबून असते. या युद्धातंत्रास तोंड कसे द्यावयाचे याविषयी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. रासायनिक युद्धतंत्र वापरल्याची सूचना ताबडतोब मिळणे, वायूचा प्रकार ओळखणे, संसर्गित सैनिक तातडीने योग्य स्थळी हालविण्याची योजना करणे, संसर्गरोध करण्याकरिता लागणाऱ्या साधनांचा भरपूर साठा राखणे इ. गोष्टी महत्त्वाच्या असतात. सांघिक उपायांप्रमाणेच वैयक्तिक उपायही महत्त्वाचे असतात. शरीरावर ज्या ठिकाणी विषारी पदार्थाचा संसर्ग झाला असेल, तो झटपट संसर्गहीन करूनच वायुमुखवटा चढविणे जरूरीचे असते. वायुमुखवट्याशिवाय, अंगावरील विशिष्ट पेहराव वापरणे (पार्य, अर्धपार्य किंवा अपार्य कापडापासून बनविलेले), जागरूक जनता व सैनिक, दक्ष आरोग्यसेवा, जागरूक कृषिव्यवसाय संस्था यांनाही संरक्षणयंत्रणेत महत्त्वाचे स्थान असते.

  

बहुतेक सर्व लष्करांमध्ये रासायनिक दल नावाचा विभाग असतो. या विभागाकडे जैविक व रासायनिक युद्धतंत्रातील चढाई व संरक्षण यांकरिता लागणाऱ्या उपकरणांचा शोध आणि उत्पादन, या युद्धतंत्राविषयीचे प्रशिक्षण इ. कार्ये असतात. लष्करी वैद्यकीय विभाग, सार्वजनिक आरोग्यविभाग आणि नागरी संरक्षण विभाग यांच्या सहकार्याने हे दल राष्ट्राच्या संरक्षणात्मक तयारीमध्ये महत्त्वाचा भाग घेते. औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रकाराच्या रासायनिक उत्पादनावर हे दल लक्ष ठेवील. लष्कराला जरूर पडेल तेव्हा हवे ते रासायनिक पदार्थ पुरविण्याची जबाबदारी या दलाची असते.  रासायनिक, जैविक आणि किरणोत्सर्गी युद्धतंत्राचे संशोधन व विकास या दलांकडे सोपविलेला असून त्यात बरीच प्रगती झालेली आहे. हे युद्धतंत्र वापरल्यास ते ओळखण्याकरिता निरनिराळी अभिज्ञातके (डिटेक्टर्स) शोधण्यात आली आहेत. सूक्ष्मजंतू ओळखण्यासाठी पटल गाळणी नावाचे उपकरण वापरले जाते. जे काम नेहमीच्या प्रयोगशाळांतून ९० तासांपेक्षा जास्त वेळ घेते तेच काम केवळ १५ तासांत आणि तेही सूक्ष्मदर्शकासारख्या उपकरणांच्या उपयोगाशिवाय ही गाळणी करते. किरणोत्सर्गाची तीव्रता मोजणारी किरणोत्सर्गमापके, तंत्रिका वायुसारख्या अतिविषारी वायूंना ओळखणारी अभिज्ञातके इ. साधने उपलब्ध आहेत. संरक्षणात्मक उपकरणांमध्ये बरीच प्रगती झालेली आहे. वायुमुखवटा हे उपकरण केवळ विषारी वायूपासून बचावाचे साधन राहिलेले नसून ते सूक्ष्मजंतू व किरणोत्सर्गित कण यांपासूनही बचाव करते. त्यामुळे त्यास वायुमुखवटा म्हणण्यापेक्षा संरक्षण-मुखवटा म्हणणे योग्य ठरते.

  

जैविक व रासायनिक युद्धतंत्राच्या नियंत्रणाबद्दल हेग (१८९९) व ⇨जिनीव्हा युद्धसंकेत (१९२५) अस्तित्वात आहे. दोहोंचा वेळोवेळी भंग करण्यात आलेला आहे. भारत व पाकिस्तान यांनी या तहनाम्यास मान्यता दिलेली आहे. १९२९ मध्ये चीनच्या त्या वेळेच्या राजवटीने दिलेली मान्यता आजच्या चीन प्रजासत्ताक राजवटीनेही समंत केली आहे. जवळजवळ पन्नास राष्ट्रांनी या करारास मान्यता दिलेली असली, तरी अमेरिका अजूनही त्यात सहभागी नाही. या तहनाम्यात नापामसारख्या ज्वालोत्पादक पदार्थाचा उल्लेख नाही.

  

जैविक व रासायनिक संहारक साधने मोठ्या प्रमाणावर व मोठ्या क्षेत्रावर वापरणे कठिण असते. आणवीय शस्त्रास्त्रे, पारंपरिक बाँब इ. जैविक व रासायनिक शस्त्रास्त्रांपेक्षा मोठा संहार करू शकतात परंतु ही शस्त्रास्त्रे युद्धक्षेत्रातच वापरण्याकडे कल असतो. जैविक शस्त्रास्त्रे कोठेही वापरणे शक्य आहे परंतु त्यांचा परिणाम होण्यास बराच काळ लागतो. जैविक-रासायनिक कारणामुळे शत्रूला तात्पुरते निर्बल करणे शक्य असते. ती शक्यता निर्माण करणे कमी खर्चाचे असते. तथापि अण्वस्त्रांच्या निर्मितीमुळे जैविक-रासायनिक युद्धतंत्राला मर्यादित उपयुक्तता प्राप्त झाली आहे.

संदर्भ :

1. Laurence, Martin, Arms and strategy, London, 1973.

2.Worley, Jr. Marvin, L. New Developments in Army Weapons, Tactics, Organization and Equipments, Harrisburg,1959.

         

                                                    भालेराव, य. त्र्यं.