जेरिको : इझ्राएलमधील व नवाश्मयुगीन अवशेषांचे एक प्रसिद्ध स्थळ. जॉर्डनच्या खोऱ्यात जेरूसलेमच्या ईशान्येस सु. २४ किमी. आणि मृतसमुद्राच्या उत्तरेस सु. ८ किमी. वर समुद्रसपाटीखाली सु. २४० मी. वर ते वसले आहे. या परिसरात याच नावाची अनेक नगरे वसली आणि कालौघात नष्ट पावली. आधुनिक इरीहा म्हणजेच प्राचीन जेरिको. ते जेरूसलेम–अम्मान (जॉर्डन) रस्त्यावर असून पर्यटनाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. १९६७ पासून इझ्राएलने त्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याच्या उत्तरेस सु. अडीच किमी.वर तेल एस-सुलतान नावाचे प्राचीन अवशेषांचे एक टेकाड आढळले. १८६८ साली प्रथम चार्ल्स वॉरेन याने व त्यानंतर कार्ल वॉटझिंगर, अर्नेस्ट सेलिन (१९०७-०८) आणि जॉन गारस्टँग (१९२९–३६) यांनी विसाव्या शतकात उत्खनन करून नवाश्मयुगीन मानवी वस्तीचे अवशेष उजेडात आणले. त्यांच्या मते इ. स. पू. ८००० च्या सुमारास येथे वस्ती झाली असावी. याशिवाय ब्राँझयुग आणि ताम्रपाषणयुग या सांस्कृतिक कालखंडांतील अनेक वस्त्यांचे पुरावे त्यांना मिळाले. ब्राँझयुगातील तीन शहरे (इ. स. पू. ३००० ते इ. स. पू. १२००) निदर्शनास आली. त्यांपैकी तिसरे शहर काननाइट राजाकडे होते. ते जॉस्यूई (जॉश्यूआ) राजाने जिंकून इ.स.पू. १४०० मध्ये नष्ट केले, असा उल्लेख जुन्या करारात आढळतो. पॅलेस्टाइनचा पराभव केव्हा झाला, हे निश्चितपणे ज्ञात नाही. तथापि ही घटना इ. स.पू. १४०० ते १२५० च्या दरम्यान घडली असावी. पुढे हे नगर हाये या राजाने पुन्हा बांधले. ते हेरॉड द ग्रेट (इ. स. पू. ७३ ते इ. स. पू. ४) या राजाने जिंकले. त्याने जुन्या जागेच्या दक्षिणेस दुसरे नवीन शहर वसविले आणि तेथे घोड्यांच्या शर्यतीचे मैदान, रंगमंडप व राजवाडा या इमारती बांधल्या. अरब व इराणी टोळ्यांनी ते पुढे उद्ध्वस्त केले आणि अखेर ते मुसलमानांच्या पूर्णतः ताब्यात गेले. धर्मयुद्धाच्या काळात या ठिकाणी अनेक इमारतींचे बांधकाम झाले १९५२ मध्ये ग्रीकांश गढी व हेरॉड द ग्रेटचा राजवाडा यांचे उत्खनन के. एम्. केन्यन यांनी केले. त्यांना मध्याश्मयुगीन वस्तींचे पुरावे मिळाले
नाहीत तथापि नवाश्मयुगीन मृत्पात्रविरहित वस्ती येथे इ.स.पू. सु. ६८०० या काळात होती, असे कार्बन १४ पद्धतीनुसार त्यांनी सिद्ध केले. या काळातील वस्तीभोवती तटबंदी आणि दगडी बुरूज आढळून आले. शिवाय थडगी तसेच वेतकाम व सुती विणकाम यांचेही अवशेष उत्खननात सापडले. नवाश्मयुगाच्या उत्तरकाळात मृतांच्या कवट्या चुन्याच्या साहाय्याने पूर्ण करून त्यांना रूप देण्याची विलक्षण प्रथा येथे सुरू झाली. मध्याश्मयुग, नवाश्मयुग, ब्राँझयुग व लोहयुग या सर्व काळांत जेरिको येथे मानवी वस्ती झाल्याचे पुरावे मिळाले आहेत.
संदर्भ : Kenyon, K. M. Excavations at Jericho. 2 Vols., London, 1960, 1965.
देव, शां. भा.
“