जुनागढ : गुजरात राज्यातील जुनागढ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आणि भूतपूर्व जुनागढ संस्थानची राजधानी. लोकसंख्या उपनगरांसह ९५,९०० (१९७१). हे राजकोटच्या नैर्ऋत्येस लोहमार्गाने १०१ किमी. वर गिरनार व दातार टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेले आहे. महमूदशाह बेगडाने १४७२ मध्ये त्याला मुस्तफाबाद नाव दिले. शहराच्या पूर्वेस उपरकोट गढीच्या प्रवेशद्वारावर सुंदर तोरण आहे. इ. स. पू. तिसऱ्या शतकातील अनेक बौद्ध गुहा येथे सापडल्या आहेत. येथून सु. २० किमी.वर गिरनारचा अशोककालीन प्रसिद्ध शिलालेख आहे.
जिल्ह्याची ही प्रमुख बाजारपेठ व उत्पादन केंद्र असून येथे हातमागावरील कापड, सोन्या-चांदीचे नक्षीकाम, तांब्या-पितळेची भांडी, तेलघाण्या, औषधे इ. व्यवसाय चालतात. हे लोहमार्गांचे व सडकांचेही प्रस्थानक आहे. केशोद या ३५ किमी.वरील विमानतळावरून रोज विमानवाहतूक चालते. विमानतळापासून ३ किमी.वरील केशोद रेल्वे स्थानकाहून आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी विविध सोयी उपलब्ध आहेत.
शहरात महमूदशाह बेगडाने बांधलेली मशीद, चुडासम राजांच्या दासींनी बांधलेल्या दोन विहिरी, विलिंग्डन बगीचा व धरण, सकर बाग, वस्तुसंग्रहालय व प्राणिसंग्रहालय, खापराखोडिया इ. प्रेक्षणीय आहेत.
कापडी, सुलभा