फीनिक्स बेटे : मध्य पॅसिफिक महासागरातील किरिबाती (गिल्बर्ट बेटे) प्रजासत्ताकातील एक द्वीपसमूह. गिल्बर्ट बेटे ही पूर्वीची ब्रिटिशांची वसाहत. ती किरिबाती नावाने १९७९ साली स्वतंत्र झाली. क्षेत्रफळ २८ चौ.किमी. ही बेटे ⇨ सामोआच्या उत्तरेस सु. १,१२० किमी. अंतरावर २° ३०’ द. ते ४° ३०’ द. अक्षांश व १७१° प. ते १७४° ३० प. रेखांश यांदरम्यान पसरलेली आहेत. यांत बरनी, गार्डनर, हल, सिडनी, मकीन, फीनिक्स, कँटन व एंडरबरी या आठ बेटांचा समावेश होतो. ऑक्टोबर १९७८ पूर्वी यांतील पहिली सहा बेटे ⇨ गिल्बर्ट आणि एलिस बेटे या ब्रिटिशांकित वसाहतीत समाविष्ट होती, तर शेवटच्या दोन बेटांवर १२ जुलै १९७९ पर्यंत अमेरिका व ग्रेट ब्रिटन यांचे संयुक्त शासन होते.

या बेटांचा शोध १८२३ ते १८४० या कालावधीत ब्रिटिश व अमेरिकन संशोधकांनी लावला. १९३७ मध्ये त्यांचा समावेश ब्रिटिश वसाहतींत करण्यात आला. १९३८ ते १९४० या काळात गिल्बर्ट बेटांवरील लोकांचे पुनर्वसन हल, सिडनी व गार्डनर बेटांवर करण्यापूर्वी ही बेटे निर्मनुष्य होती. मात्र हे पुनर्वसन अयशस्वी झाल्यामुळे पुन्हा सर्व लोकांना फीनिक्स बेटांच्या पश्चिमेकडील सॉलोमन बेटावर हलविण्यात आले (१९६३). १९३७ मध्ये कँटनवर रेडिओकेंद्र उभारून ब्रिटनने आपला हक्क सांगितला, तर कॅंटन व एंडरबरी बेटांवर सूर्यग्रहण निरीक्षक पथक पाठवून अमेरिकेने आपला हक्क प्रस्थापित केला (१९३८). परिणामी १९३९ मध्ये ग्रेट ब्रिटन-अमेरिका यांमध्ये करार करण्यात येऊन त्यानुसार ही दोन्ही बेटे पुढील पन्नास वर्षांकरिता अमेरिका-ग्रेट ब्रिटन यांच्या संयुक्त शासनाखाली ठेवावी, असे ठरविण्यात आले. मात्र १९७८ मध्ये एलिस बेटे आणि १९७९ मध्ये गिल्बर्ट बेटे स्वतंत्र झाल्यामुळे हा करार संपुष्टात आला.

फीनिक्स बेटे ही कंकणाकृती प्रवाळद्वीपे आहेत. समुद्रसपाटीपासून त्यांची सरासरी उंची सु. ९ मी. आढळते. बेटांवर खाजणेही आहेत. येथील हवामान उष्ण असून अवर्षाणाचे प्रमाण अधिक आहे. सिडनी, हल व गार्डनर या बेटांवर इतर बेटांच्या मानाने पर्जन्यप्रमाण अधिक असून येथे नारळाची झाडे आहेत. फीनिक्स बेटे ⇨ ग्वानो खतासाठी प्रसिद्ध होती. कँटन बेटावर आंतरराष्ट्रीय विमानतळ असून पूर्वी फिजी व होनोलूलू यांमधील हवाई मार्गाच्या दृष्टीने त्याला फार महत्त्व होते. मात्र दूर अंतरावर उडणाऱ्या विमानांच्या वापरामुळे याचे महत्त्व कमी झाले आहे.

डिसूझा, आ. रे.