जीवनसत्व ई : निरनिराळ्या प्राण्यांच्या जातींना प्रजोत्पादन, स्नायूंची वाढ, रक्तातील लोहयुक्त रंगद्रव्य लाल कोशिकांतून (पेशींतून) बाहेर जाण्यास प्रतिरोध करण्याची शक्ती इ. शरीरक्रियात्मक कार्ये योग्य प्रकारे चालावीत म्हणून आवश्यक असणाऱ्या मेदविद्राव्य (मेदात विरघळणाऱ्या) अन्नघटकाला ई जीवनसत्व असे म्हणतात. रासायनिक सूत्र C29H50O2. १९४१ नंतर आल्फा-टोकोफेरॉल ही संज्ञा ई जीवनसत्त्वासाठी रूढ झाली आहे. ई जीवनसत्व ही संज्ञा त्याच्यासारखीच शरीरक्रियात्मक क्रियाशीलता असणाऱ्या सर्वच पदार्थसमूहाला देण्यात येते. आल्फा-टोकोफेरॉलामध्ये या सर्व पदार्थांपेक्षा जास्त जैव क्रियाशीलता असल्यामुळे ई जीवनसत्व या नावापेक्षा आल्फा-टोकोफेरॉल ही संज्ञा रूढ झाली आहे. सर्व टोकोफेरॉल संयुगांना मिळून जीवनसत्त्व ई असेही नाव दिले जाते. टोकोफेरॉल हे नाव ग्रीक भाषेतील ‘प्रसूती’ आणि ‘गर्भधारणा’ हा अर्थ असलेल्या शब्दांवरून दिले गेले आहे.
इतिहास : या जीवनसत्त्वाच्या अस्तित्वाचा एच्. एम्. एव्हान्झ व के. एस्. बिशप या शास्त्रज्ञांनी १९२२ मध्ये शोध लावला. १९२७ मध्ये एव्हान्झ यांनी बर यांच्या साहाय्याने या जीवनसत्त्वासंबंधी एक प्रबंध लिहिला व तो या जीनवसत्त्वातील एक प्रमुख आधार म्हणून अजूनही मानतात. १९२८ पर्यंत हे जीवनसत्त्व फक्त प्रजोत्पादनावश्यक असल्याचा समज होता. त्या वर्षी एव्हान्झ व बर यांनी या जीवनसत्त्वाची न्यूनता असलेल्या आहारावर पोसलेल्या मातांच्या दुधावर वाढणाऱ्या उंदरांच्या पिलांना अंगघात होतो, असे दाखविले. १९३१ मध्ये गोएटश्च व पापेनहाइमर या दोन जर्मन शास्त्रज्ञांनी ससा व गिनीपिग या प्राण्यांमध्ये या जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे स्नायूंचे पोषण होण्यास अडथळा होतो असे दाखविले. मानवात आढळणाऱ्या स्नायु-कष्टपोषण या विकृतीचे व प्राण्यांमधील या विकृतीचे साम्य त्यांनी दाखविले. १९३५ मध्ये डेन्मार्कमधील रिंगस्टेड यांनी व १९३८ मध्ये आयनरसन व रिंगस्टेड यांनी तंत्रिका अपकर्षाचा (मज्जेचा ऱ्हास होण्याचा) व या जीवनसत्त्वाचा संबंध असल्याचे दाखविले. या शोधानंतर नऊ वर्षांनी फोक्ट-मोलर यांनी ते गायीच्या वांझपणावर प्रथम वापरले व ते उपयुक्त असल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर मानवातील पुनःपुन्हा होणारा गर्भपात, संभवनीय गर्भपात आणि गर्भिणी विषबाधा या विकृतींमध्ये ते वापरण्यात आले. पुष्कळ संशोधनानंतरही अद्याप या जीवनसत्त्वाची औषधी उपयुक्तता अनिश्चित आहे.
या जीवनसत्त्वाच्या रसायनशास्त्रविषयक माहितीमध्ये १९३६ नंतर सतत भर पडत गेली. एच्. एम्. एव्हान्झ, जी. ए. एमर्सन व ओ. एच्. एमर्सन यांनी १९३६ साली गव्हाच्या अंकुरापासून काढलेल्या तेलामधून आल्फा- व बीटा – टोकोफेरॉल हे पदार्थ मिळविले. सरकीच्या तेलापासून त्यांनी गॅमा-टोकोफेरॉल मिळविले. हे सर्व पदार्थ अल्कोहॉले आहेत. १९३८मध्ये आल्फा-टोकोफेरॉलाची संरचना फर्नहोल्टझ यांनी शोधून काढली. त्याच वर्षी कारर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ते संश्लेषणाने (कृत्रिम रीत्या) तयार केले. १९४६ मध्ये डेल्टा-टोकोफेरॉलाविषयी प्रथम माहिती उपलब्ध झाली व त्याच्या गुणधर्मांविषयी स्टर्न, रोबसन वायस्लर व बॅक्स्टर यांनी संशोधन केले.
संरचना : हे जीवनसत्त्व आल्फा-, बीटा-, गॅमा- व डेल्टा-टोकोफेरॉल म्हणून नैसर्गिक रीत्या वनस्पतिज तेलांत आढळते. यांपैकी आल्फा-टोकोफेरॉल महत्त्वाचे असून काही शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे ई जीवनसत्त्व म्हणजेच आल्फा-टोकोफेरॉल होय. त्याची संरचना मागे दिल्याप्रमाणे आहे.
आल्फा-टोकोफेरॉलाचे बीटा- आणि गॅमा-टोकोफेरॉल हे समघटक (तेच व तितकेच अणू रेणूमध्ये असूनही त्यांच्या संरचना भिन्न असल्यामुळे वेगळे गुणधर्म असलेले पदार्थ) आहेत. त्यांच्या ॲरोमॅटिक गर्भस्थानी [→ ॲरोमॅटिक संयुगे] दोन मिथिल गट (-CH3) असतात व डेल्टा-टोकोफेरॉलामध्ये एकच मिथिल गट असतो.
गुणधर्म : सर्व टोकोफेरॉले कोठी तापमानात (सर्वसाधारण तापमानात) तेले आहेत आणि ती मेदविद्राव्य आहेत. ही सर्व टोकॉल [२ मिथिल- २- (ट्रायमिथिल-ट्रायडिसील)- ६- हायड्रॉक्सिक्रोमेन] या संयुगाचे अनुजात (एका संयुगापासून तयार केलेली दुसरी संयुगे ) आहेत. आल्फा-टोकोफेरॉल ग्लिसराइड तेले, अल्कोहॉल, क्लोरोफॉर्म आणि ॲसिटोन यांमध्ये विद्राव्य आहे. टोकोफेरॉल फॉस्फेट काहीसे जलविद्राव्य असल्यामुळे ते एंझाइमांच्या (जीवरासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थांच्या) अभ्यासाकरिता वापरतात. टोकोफेरॉले प्रबल अम्ल आणि प्रबल क्षार (अम्लाबरोबर विक्रिया झाल्यास लवण देणारा पदार्थ, अल्कली) यांमध्ये नाश पावत नाहीत परंतु त्यांचे ⇨ऑक्सिडीभवन फार जलद होते. या त्यांच्या गुणधर्मांवर त्यांचे प्रमाण अजमावण्याच्या रासायनिक पद्धती आधारित आहे. या गुणधर्मामुळेच ती खवट मेदामध्ये अतिजलदपणे नाश पावतात. हवेत आणि जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडे अदृश्य) किरणांत ती अस्थिर आहेत. दृश्य प्रकाशाचा मात्र त्यांच्यावर परिणाम होत नाही, नेहमीच्या अन्न शिजवण्यामुळे त्यांचा नाश होत नाही, मात्र खरपूस तळण्याने त्यांचा नाश होतो.
आंतरराष्ट्रीय एकक, पुरवठा व दैनंदिन गरज : एक मिग्रॅ. संश्लेषित शुद्ध डीएल-आल्फा-टोकोफेरॉल ॲसिटेट म्हणजे एक आंतरराष्ट्रीय एकक होय. चारही नैसर्गिक टोकोफेरॉले जैव क्रियाशीलतेमध्ये एकमेकांपासून भिन्न आहेत. तसेच त्यांची प्रति-ऑक्सिडीकारके (ऑक्सिडीभवन होण्यास विरोध करणारे पदार्थ) म्हणून असणारी शक्तीही निरनिराळी आहे. जिवंत प्राणिशरीरामध्ये आल्फा-टोकोफेरॉलाची जैव क्रियाशीलता सर्वाधिक असून ते प्रति-ऑक्सिडीकारक म्हणूनही सर्वाधिक शक्तिमान आहे.
अन्नपदार्थामध्ये भाज्या, फळे, तृणधान्ये, प्राणिज पदार्थ व बहुतेक सर्व वनस्पतिज तेले यांमध्ये टोकोफेरॉले असतात. सर्वसाधारण आहारात १५ मिग्रॅ. टोकोफेरॉले असतात. अन्नातील मेदमय पदार्थांवर तसेच त्यांच्या उष्णतामूल्यावर या जीवनसत्त्वाचे त्यामधील प्रमाण अवलंबून असते. तृणधान्यांच्या तेलांमध्ये टोकोफेरॉले विशेषत्वाने आढळतात. गव्हाच्या अंकुरापासून काढलेल्या तेलात त्यांचे प्रमाण सर्वांत जास्त असते. त्याखालोखाल मक्याच्या व सरकीच्या तेलात आढळते. कुसुंबा व करडईच्या तेलांतही त्यांचे प्रमाण जास्त असते. माशांच्या तेलात ती अल्प प्रमाणात आढळतात. सालीट या पालेभाजीत व आल्फाआल्फा (लसूण घास) या गवतात ती जास्त प्रमाणात असतात. प्राण्यांमध्ये ती फार कमी प्रमाणात असतात. त्यातल्या त्यात यकृतात ती जास्त प्रामाणात आढळतात.
आलगीकरण व संश्लेषण : वनस्पतिज तेलांपासून नैसर्गिक रीत्या आढळणारीटोकोफेरॉले वेगळी करण्यासाठी विविध प्रक्रिया वापरल्या जातात. १९३८ मध्ये कारर, टॉड इ. शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या प्रक्रियेनुसार टोकोफेरॉलाचे चारही प्रकार संश्लेषित करतात. तसेच टोकोफेरॉलांचे अनुजात तयार करतात.
केवळ या जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळेच उद्भवणारी विकृती मानवात आढळलेली नाही. त्यामुळे त्याची दैनंदिन गरज निश्चित ठरविता आलेली नाही. तथापि यासंबंधी अनेक प्रयोग करण्यात आलेले असून हिकमन व हॅरिस यांनी मानवाला प्रतिदिनी सु. ३० मिग्रॅ. नैसर्गिक टोकोफेरॉलांच्या मिश्रणाची गरज आहे, असा १९४६ साली निष्कर्ष काढला होता.
साठा व उत्सर्जन : प्राणिशरीरातील बहुतेक ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांमध्ये) हे जीवनसत्त्व असते. चतुष्पाद प्राणी या जीवनसत्त्वाचा साठा बराच काळ करू शकतात. एव्हान्झ वर बर यांनी या जीवनसत्त्वाची एकच मात्रा उंदराला तीन ते चार प्रसूती होईपर्यंत पुरते, असे दाखविले. मानवी रक्तरसामध्ये (रक्त गोठल्यानंतर उरणाऱ्या पेशीरहित निवळ द्रवामध्ये) या जीवनसत्त्वाचे प्रमाण प्रत्येक १०० मिली.मध्ये १ मिग्रॅ. एवढे असते. नवजात अर्भकात ते ०·२५ ते ०·४ मिग्रॅ. असते.
ई जीवनसत्त्वाचे अवशोषण इतर मेदविद्राव्य जीवनसत्त्वांप्रमाणेच होते. हे जीवनसत्त्व दिल्यानंतर सु. सहा तासांनी त्याचा यकृतातील साठा सर्वांत अधिक होतो. बहुतेक सर्व प्राण्यांमध्ये ई जीवनसत्त्वाचे उत्सर्जन मलामधून होत असावे. मानवाने सेवन केलेल्या टोकोफेरॉलापैकी दोन तृतीयांश भाग मलातून उत्सर्जित होत असावा. मूत्रात ते अजिबात नसते. दुधातून ते उत्सर्जित होते.
शरीरक्रियात्मक कार्य : मानवी शरीरामध्ये या जीवनसत्त्वाचे कार्य अजूनही अनिश्चित आहे. निरनिराळ्या ऊतकांत आणि शरीर भागांत ते प्रति-ऑक्सिडीकारक म्हणून कार्य करते. ते एंझाइमाचा घटक असावे किंवा को-एंझाइमाचे (एंझाइमाच्या विक्रियेसाठी मदत करणाऱ्या पदार्थाचे) कार्य करीत असावे. प्रयोगशाळेतील प्रयोगान्ती हीमोग्लोबिन (रक्तातील लाल रंगद्रव्य), हीमिन (हीमोग्लोबिनातील हीम या संयुगाचे क्लोराइड) व कोशिका रंजकद्रव्य हे पदार्थ उत्प्रेरक (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविणारे पदार्थ) असताना होणारे ऑक्सिडीकरण आल्फा-टोकोफेरॉल स्थगित करीत असल्याचे दिसून आले आहे. प्रत्यक्ष प्राणिशरीरात अशाच प्रकारचे नियंत्रण हे जीवनसत्त्व ठेवीत असावे. अ जीवनसत्त्व, कॅरोटीन आणि ॲस्कॉर्बिक अम्ल (क जीवनसत्त्व) या जीवनावश्यक पदार्थांचे ऑक्सिडीकरणापासून हे जीवनसत्त्व संरक्षण करीत असावे.
अगदी अलीकडेच पांडुरोग (ॲनिमिया), जालिका-कोशिकाधिक्य (रक्तात व अस्थींच्या पोकळीत मऊ पदार्थात असणाऱ्या व सूक्ष्मजंतू इ. नष्ट करणाऱ्या विशिष्ट पेशींची संख्या वाढणे), बिंबाणु-आधिक्य (रक्तात असलेल्या सर्वांत लहान विशिष्ट पेशींची संख्या वाढणे) व शोफ (द्रवयुक्त सूज) या विकृती कमी वजन असलेल्या नवजात अर्भकांमध्ये दिसून आल्या. या अर्भकांना बहु-अतृप्त मेदाम्ले (एकापेक्षा जास्त द्विबंध वा त्रिबंध ज्यांमध्ये आहेत अशी मेदाम्ले) जादा प्रमाणात असलेल्या कृत्रिम दुधावर वाढविण्यात येत होते. या अर्भकांच्या रक्तासातील ई जीवनसत्त्वाचे प्रमाण प्रत्येक मिली. मध्ये ०·१८ मिग्रॅ. एवढेच आढळले. मातेच्या दुधावर वाढविलेल्या अर्भकात ते ०·४ मिग्रॅ. असते. कृत्रिम दुधावर वाढविलेल्या विकृत अर्भकांना ७५–१०० मिग्रॅ. ई जीवनसत्त्व देण्यात आले, त्यामुळे रक्तरसातील ई जीवनसत्त्वामध्ये वाढ झाली व प्रकृती सुधारली.
या जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे लिपिड पेरॉक्साइडे रक्तकोशिकांत साठविली जात असावीत. त्यांपासून त्यांच्या कलांमध्ये (पातळ पटलांमध्ये) विकृती उत्पन्न होऊन त्या नेहमीपेक्षा लवकर नाश पावत असाव्यात व पांडुरोग होत असावा. याच कारणामुळे केशवाहिन्यांच्या (सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या) पारगम्यतेवर (द्रव आरपार जाण्याच्या क्षमतेवर) परिणाम होऊन शोफ उत्पन्न होत असावा.
निरनिराळ्या प्राण्यांमध्ये या जीवनसत्त्वाच्या त्रुटीचे परिणाम वेगवेगळ्या शरीरभागावर झाल्याचे दिसून आले आहे. उंदरांवरील प्रयोगात ते मादीतील वंध्यत्व व नर उंदरांमध्ये वृषण अपकर्ष (पुं-जनन ग्रंथींचा ऱ्हास) यांवर उपयुक्त असल्याचे आढळल्यावरून त्यास वंध्यत्व-प्रतिरोधक जीवनसत्त्व असे संबोधण्यात आले होते.
मानवातील या जीवनसत्त्वाचे महत्त्व अनिश्चित स्वरूपाचे आहे. स्नायूंची वाढ खुंटणे, हृद्रोहिणी हृद्रोग, वंध्यत्व, गर्भपात इ. विकृतींकरिता हे जीवनसत्त्व वापरतात परंतु एक ‘आशादायक’ औषधे या व्यतिरिक्त त्याचा उपयोग नसावा.
या जीवनसत्त्वाच्या अतिसेवनाने विषाक्तता (विषबाधा) होत नाही.
वापर : आल्फा-टोकोफेरॉल व त्याचे एस्टर अनुजात यांचा उपयोग बहुजीवनसत्त्वयुक्त औषधांत व औषधी गोळ्यांत करतात. तसेच त्यांचा उपयोग अंतःक्षेपणात (इंजेक्शनात), मलमे इत्यादींकरिता करण्यात येतो. प्रगत देशांत ई जीवनसत्त्वाच्या उत्पादनाचा बराच भाग पशुखाद्यात (विशेषतः कुक्कुट खाद्यात) वापरतात. प्रति-ऑक्सिडीकारक म्हणून आल्फा-टोकोफेरॉलाचा उपयोग खाद्यपदार्थ उद्योगात व औषधनिर्मितीत करतात.
संदर्भ : 1. Bicknell, F. Prescott, F. The Vitamins In Medicine, London, 1953.
2. Sebrell, W. H. (Jr.) Harris, R. S. Eds. The Vitamins, Vol. V, New York and London, 1967.
3. West, E. S. Todd, W. R. Textbook of Biochemistry, New York, 1961.
नागले, सु. कृ.
“