जिबूती :पूर्वी आफ्रिकेच्या आफार्झ अँड ईसाझ राज्याचे खुल्या व्यापाराचे बंदर आणि राजधानी. लोकसंख्या ६२,००० (१९७०). हे एडनच्या पश्चिमेच्या ताजूरा आखातावर वसलेले असून बंदरात आगबोटींना चांगला निवारा मिळतो.
जिबूतीचे हवामान उष्ण व रुक्ष आहे. शेती आणि खनिजे ह्यांचा अभाव आहे. अबूली ह्या भूमिगत प्रवाहाचा पाणीपुरवठा शहराला होतो.
जिबूती बाब-एल्-मांदेब सामुद्रधुनीच्या तोंडाशी असल्याने त्याचे सनिकी महत्त्व विशेष आहे. १८८८ मध्ये फ्रेंच सोमाली लँडचा पहिला गव्हर्नर लागाद याने हे स्थापन केले. जिबूतीपासून अदिस अबाबा ह्या इथिओपियाच्या राजधानीपर्यंत लोहमार्ग आहे. मुख्यतः इथिओपियाचा सर्व परदेशी व्यापार जिबूतीतूनच चालतो. हा व्यापार व आगबोटींना इंधन व सामग्री पुरविणे यांवरच देशाची व शहराची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. शहरात जुन्या व नव्या वास्तुशिल्पांचे मजेदार मिश्रण दिसून येते.
लिमये, दि. ह.