किन्नर-१ : अतिमानवी योनीतील एक वर्ग. ‘विद्याधरोप्सरोयक्षरक्षोगन्धर्वकिन्नराः’ या अमरकोशातील श्लोकात देवयोनीत त्यांचा अंतर्भाव केला आहे. किंपुरुष, तरंगवदन अथवा अश्वमुख आणि मयू अशीही त्यांची नावे आहेत. अमरकोशात कुबेरास त्यांचा स्वामी म्हटले आहे.
‘किंपुरूषोवै मयुः’ असा यांचा शतपथब्राह्मणात (७⋅५⋅२⋅३२) उल्लेख आहे. किन्नर हे देवांशरूप असल्याकारणाने त्यांना गौण देवता मानतात. मुख अश्वाचे आणि शरीर मानवाचे असा हा प्राणी आहे. ते वानर असावेत, असे कीथ व मॅक्डॉनाल्ड यांचे मत आहे. बौद्धकल्पनेनुसार किन्नर अर्धपक्षी व मानवमुख असतात. काही पुराणांत त्यांची उत्पत्ती ब्रम्हदेवाच्या अंगुष्ठापासून मानली आहे, तर काही पुराणांत त्यांना कश्यपाची प्रजा म्हटले आहे. गंधमादन पर्वतावर त्यांचा निवास असतो. ते एक महिना पुरुष व एक महिना स्त्री असतात, असाही उल्लेख आढळतो. कालिदासाने त्यांच्या मधुर गायनाचा व हिमालयावरील वास्तव्याचा उल्लेख केला आहे. वाङ्मयात किन्नरयुगुले अथवा किन्नरमिथुने असा यांचा उल्लेख असतो. ती परस्परानुरक्त असतात. फुलांचे ताटवे, लताकुंज आणि निर्झर ही त्यांची आवडती स्थाने आहेत. नृत्य व गायन यांत ते निपुण असतात.
सुर्वे, भा. ग.
“