किंबर्लाइट : दक्षिण आफ्रिकेतील गतकालीन ज्वालामुखींच्या नळात आढळणारा आणि ज्याच्यात हिरे आढळतात असा अंतर्वेशी (आत घुसलेला) खडक. तो मुख्यत: ऑलिव्हीन आणि त्याच्यापासून तयार झालेले सर्पेंटाइन या खनिजांचा बनलेला असतो. पुष्कळ वेळा मूळच्या ऑलिव्हिनाचा फारच थोडा अंश शिल्लक असतो. कधीकधी याच्यात बरेच एन्स्टॅटाइट व फ्लोगोपाइटी अभ्रक ही खनिजे आढळतात. पुष्कळदा या खडकाची संरचना कोणाश्मासारखी असते [→ कोणाश्म]. तो पेरिडोटाइटापासून तयार झालेला असतो, परंतु मूळची खनिजे खूप बदललेली असतात. उदा., ऑलिव्हिनाचे सर्पेंटाइन झालेले असते. किंबर्लाइट खूप खोल जागी तयार झाला असावा व नंतर जोराने ढकलला जाऊन पृथ्वीच्या उथळ भागात वर आला असावा अशी कल्पना आहे. या खडकाने भरलेले कित्येकशे नळ दक्षिण आफ्रिकेच्या संघराज्यात आढळतात. तसेच नळ नैर्ऋत्य आफ्रिका, ऱ्होडेशिया, काँगो व पूर्व आफ्रिका या प्रदेशांतही आढळतात. या नळांचा व्यास काही थोड्या मीटरांपासून सु. हजार मीटरांपर्यंत असतो. दक्षिण आफ्रिकेतील किंबर्ली गावाजवळ ज्यांच्यात हिरे आढळतात असे ज्वालामुखी नळ म्हणजे हिऱ्यांचे नळ आहेत. त्यांच्यातील किंबलाईट खडक हा पुष्कळदा ज्वालामुखी कोणाश्म असतो व त्याच्यात शेल, ग्रॅनाइट, क्वॉर्ट्झाइट इ. अनेक खडकांचे तुकडे आढळतात. किंबर्ली गावावरूनच किंबलाईट हे नाव पडले आहे. त्याला ‘ब्ल्यू ग्राऊंड’ असेही म्हणतात. भारतातील पन्ना येथील हिऱ्याच्या खाणी अशाच नळांत असून तेथील किंबर्लाइट नळ विंध्य खडकांत घुसलेले आहेत.
ठाकूर, अ. ना.