कॉर्डाइटेलीझ : पुराजीव महाकल्पातील (सु. ६०-२४⋅५ कोटी वर्षांपूर्वीच्या) जीवाश्मरूप (अवशेषरूप) प्रकटबीज उपविभागातील [→वनस्पती, प्रकटबीज उपविभाग] वनस्पतींचा एक गण. यांचे जीवाश्म यूरोप, अमेरिका आणि आशिया खंडांत कार्बाॅनिफेरस व पर्मियन (अनुक्रमे सु. ३५—३१ व २७⋅५—२४⋅५ कोटी वर्षांपूर्वीच्या) खडकांत सापडतात. यांच्या अनेक जाती असून त्यांचा समावेश पिटिएसी,पोरोझीलेसी व कॉर्डाइटेसी या तीन कुलांत केला आहे. पहिल्या दोन्हींच्या फक्त शाकीय भागांचेच (वाढ व पोषण या कार्यांशी संबंधित असलेल्या भागांचेच) जीवाश्म उत्तम स्थितीत आढळतात. कॉर्डाइटेसीतील वंश त्या काळातील जंगलात प्रमुख असून त्या वृक्षांची उंची सु. ३० मी. व दिसावयास हल्लीच्या शंकुमंत (शंकूच्या आकाराचे प्रजोत्पादक इंद्रिय असलेल्या, कॉनिफर) वनस्पतीप्रमाणे होते [→कॉनिफेरेलीझ]. फांद्या खोडाच्या वरच्या भागावर पाने साधी, रेखाकृती किंवा जिभेसारखी व सिराविन्यास (शिरांची मांडणी) द्विशाखी होता. शंकू (कॉर्डाएंथस) लहान फांद्यांवर असून पुं-शंकू व स्त्री-शंकू भिन्न होते. शंकूमध्ये ऱ्हस्व प्ररोह (छोट्या फांद्या) आणि त्या प्रत्येकात बरीचशी शल्के (खवले) असून पुं-शंकूमध्ये टोकावरील काही शल्कांवर परागकोश व तसेच स्त्री-शंकूमध्ये बीजके (बीजाची पूर्वावस्था) होती. या स्त्री-शंकूच्या अभ्यासामुळे शंकुमंतांच्या शंकूंचा विकास कसा झाला असावा हे समजण्यास मदत होते. बिया (कार्डिओकार्पस) चपट्या, बदामासारख्या असून त्यांचे बाहेरचे आवरण मऊ व आतील भाग कठीण होता. या वनस्पतींचे कॉनिफेरेलीझ व ⇨गिंकोएलीझ या गणांशी फार निकटचे संबंध असून त्यांना या दोन्हींचे पैतृकस्थान मानले आहे. या तीन गणांचा मिळून प्रकटबीज वनस्पतींचा कॉनिफेरोफायटा हा एक महत्त्वाचा जातिविकसित उपवर्ग ओळखला जातो.
वऱ्हाडपांडे, द. गो.
डॅडोझायलॉन:पुराजीव महाकल्पात आढळणाऱ्या काही वनस्पतींच्या काष्ठजीवाश्मांना हे नाव दिले आहे. कॉर्डाइटेलीझ गणातील कॉर्डाइटस वंशात या वंशाचा अंतर्भाव केला गेलेला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर डॉसन यांनी पूर्व अमेरिका व कॅनडातील अनेक काष्ठजीवाश्मांचे वर्णन डॅडोझायलॉन या सदराखाली केले त्यांपैकी कित्येक कॉर्डाइटीय आणि इतर काही इतर वंशातले आहेत. पुराजीव महाकल्पातील कॉर्डाइटीय प्रकारच्या काष्ठाच्या तुकड्यांना डॅडोझायलॉन म्हणण्याची प्रथा पडली आहे. या वंशात अनेक जाती असून त्यांपैकी डॅ. इंडिकम, डॅ. बेंगॉलेन्स व डॅ. रेसिनोजम या भारतातील जाती पूर्व गोंडवनी खडकांत सापडतात. सर्वच जाती खोडातील काष्ठांचे प्रकार असून त्या काष्ठातील वाहिकांवर (पाण्याचे वहन करणाऱ्या व काष्ठात आढळणाऱ्या तीक्ष्ण टोकांच्या लांबट घटकांवर) खाचांच्या एक ते तीन रांगा असतात तसेच या खोडातील भेंडात (भोवताली वाहक पेशीसमूह असलेल्या मुख्यत्वे मृदूतकीय पेशींच्या दंडगोलात, [→भेंड] पडदे असावेत. काहींमध्ये वृद्धिवलये [→शारीर, वनस्पतींचे] आढळतात उदा., फॉकलंड बेटातील जाती. त्या पर्मियन हिमकालानंतरच्या होत्या. डॅ. रोमिंजेरियानम (मध्य पेनसिल्व्हेनियन, सु. ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या) व डॅ. डुग्लसेन्स ह्या जातींच्या काष्ठांत वलये नाहीत, कारण त्या कोळशाच्या थरातील आहेत. डॅडोझायलॉनाचा प्रसार फार मोठा होता.
पहा: पुरावनस्पतिविज्ञान.
संदर्भ: 1. Andrews, H. N. Studies in Palaeobotany, New York, 1967.
परांडेकर, शं. आ.
“