कविचंद्र द्विज : (अठरावे शतक). असमिया कवी. आहोम वंशीय राजा शिवसिंह (कार. १७१४-१७४०) याच्या दरबारात कविराज चक्रवर्तीबरोबर तोही होता. शिवसिंहाच्या प्रथमेश्वरी व अंबिका ह्या दोन राण्यांकडून कविचंद्रास प्रोत्साहन मिळाले. त्याने संपूर्ण धर्म पुराणाचे असमियात पद्यमय भाषांतर केले तसेच त्यातील कथा-प्रसंगांना साजेशी अनेक चित्रेही तयार करवून घेतली. त्याचे हे सचित्र हस्तलिखित त्याच्या कलात्मक वृत्तीचा प्रत्यय घडविते. उषाअनिरुद्धाच्या प्रेमकथेवर त्याने एक सहा अंकी नाटकही लिहिले असून त्यातील काही भाग असमियात, तर काही संस्कृतमध्ये आहे. या नाटकात अनेक भावपूर्ण पदेही आहेत.
सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) शिरोडकर, द.स. (म.)