कॉर्क: आयरिश प्रजासत्ताकाच्या दक्षिणेकडील कॉर्क परगण्यातील प्रमुख शहर. लोकसंख्या १,२८,२३५ (१९७१). हे ली नदीच्या मुखाजवळ डब्लिनच्या नैर्ॠत्येस २१६ किमी. असून अटलांटिकपासून २४ किमी. आत आहे. येथून दुग्धपदार्थ, जनावरे, धान्य, कापड, मासळी इत्यादींची निर्यात होते. हे औद्योगिक शहर असून येथे मोटारी, रबराचे पदार्थ, रंग, रसायने, कातडी सामान, मद्ये इत्यादींचे उत्पादन होते. सातव्या शतकात स्थापन झालेल्या या शहराने आयरच्या इतिहासातील अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. युनिव्हर्सिटी कॉलेज साहित्य, विज्ञान व कृषी यांच्या शिक्षणसंस्था व कार्नेगी ग्रं थालय या येथील प्रमुख संस्था असून शहराजवळील घोड्यांच्या शर्यतीचे मैदान प्रसिद्ध आहे. जगातील पहिले शीडनौकाविहारमंडळ (यॉट क्लब) १७२० मध्ये येथे स्थापन झाले.
ओक, द. ह.
“