कॉटार : इराणच्या आखातातील एक प्रायद्वीप राज्य. क्षेत्रफळ १०,३६० चौ. किमी. लोकसंख्या १,८०,००० (१९७१ अंदाज). सु. १६० किमी. लांब व ५६ ते ८० किमी. रुंदीच्या या द्वीपकल्पाच्या तीनही बाजूस इराण आखात, नैर्ॠत्येस सौदी अरेबिया व दक्षिणेस संयुक्त अरब अमीर राज्ये आहेत. तथापि या दोन्ही देशांशी कॉटारच्या सरहद्दी निश्चित नाहीत. दोहा ही कॉटारची राजधानी असून तिची लोकसंख्या सु. १,२०,००० आहे.

 

भूवर्णन :  संपूर्ण प्रदेश चुनखडी खडकांचा असून अंतर्गत भाग ‘कार्स्ट’ भूमिस्वरूपाचा व समुद्रसपाटीपासून सरासरी ७६ मी. उंचीचा आहे. कॉटारचा बहुतेक भूभाग खडकाळ, रेतीमिश्रित व रुक्ष आहे. मधूनमधून व विशेषेकरून समुद्रतटावर झरे व कारंज्याच्या विहिरीतून पाणी सापडते व हेच फक्त हिरवळीचे क्षेत्र बनले आहे. येथे उन्हाळ्यात अत्यंत उष्ण (३४ से.) आणि हिवाळ्यात सौम्य तपमान (१६ से.) अनुभवास येते. येथील वार्षिक सरासरी पर्जन्य ५ ते १० सेंमी. असतो. पण तो भरवशाचा नाही. काटेरी झुडपे व गवतावर जगणारे उंट व अनेक प्राणी, तसेच वसंताबरोबर आगमन करणारे व शरदात पलायन करणारे पक्षी येथे वावरतात.

 

इतिहास : कॉटारच्या प्रागितिहासावर प्रकाश टाकणारे पुरावे येथे सापडले नाहीत. सातव्या शतकात पैगंबरांच्या हयातीत इस्लाम धर्माचा स्वीकार व या धर्मातून फुटून निघालेल्या काही लोकांचा (कार्मेथियन) मक्केवर कबजा, या कॉटारमधील महत्त्वाच्या घटना होत. बरीच वर्षे येथील शेख इराणचा मांडलिक होता. एकोणिसाव्या शतकात इराणपासून फुटून अल् थाणीने आपली स्वतंत्र गादी निर्माण केली. त्याने ब्रिटिशांशी १८६८ साली संधी केल्यावर चाच्यांचा त्रास मिटला पण नंतर कॉटारच्या सुलतानाने तुर्कस्तानचा आश्रय घेतल्यामुळे १९१३ पर्यंत राजधानीत तुर्कस्तानची महसूल कचेरी होती. १९१६ साली संयुक्त अरब अमीर राज्यांनी मान्य केलेल्या अटी कॉटारने मान्य करून ब्रिटनशी तह केला व हे ब्रिटिशांचे जवळजवळ संरक्षित राज्य बनले. १९६५ साली या घटनेविरूद्ध लोकक्षोभ शिगेला पोहोचला होता. जून १९६७ मध्ये कॉटारने इंग्लंड-अमेरिकेस तेलपुरवठाही बंद केला होता. १९६८ मध्ये ब्रिटिशांनी सैन्य काढून घेण्याची घोषणा केली. कॉटारने इतर संयुक्त अरब अमीर राज्यांबरोबर तह केला. सप्टेंबर १९७१ मध्ये कॉटारला संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्व मिळाले.

राजकीय स्थिती : कॉटारमध्ये निरंकुश राजेशाही आहे. अल् थाणीनंतर त्याचा मुलगा महंमद, १९१३ मध्ये महंमदचा मुलगा अब्दुल्ला, १९४९ मध्ये अली व १९६० पासून शेख अहमद हा कॉटारचा शेख अथवा अमीर आहे. पूर्वी परदेशी नीती व बिगरमुस्लिमांच्या हक्कांचे संरक्षण ब्रिटिशांच्या स्वाधीन असे. सुलतान घराणे व ब्रिटिश प्रतिनीधी मिळून न्यायसंस्था चालविण्यात येत असे. मुस्लिमांकरिता शरीयत कायदा होता. कॉटारचा अमीर आपल्या मंत्रिमंडळाच्या साहाय्याने काम पाहतो. तेल निर्यात करणाऱ्या मध्यपूर्वेचा देशांच्या संघटनेचा कॉटार सभासद असून अरब लीगचाही सभासद आहे.

 

आर्थिक स्थिती : मोती काढण्याचा प्राचीन व्यवसाय, तेल उत्पादन व कल्चर मोती या व्यवसायांमुळे मागे पडला आहे. १९३९ साली तेलाचा शोध लागल्यानंतर उत्पादन वाढत गेले व १९६५ साली ९१,५८,००० मेट्रिक टन उत्पादन झाले. १९६६ पूर्वी ब्रिटन, इराक, नेदर्लंड्स व अमेरिकेतील कंपन्यांना तेल-अधिकार होते. १९६९ मध्ये इराकी व डच कंपन्यांचे कार्य चालू होते. एका जपानी कंपनीलाही परवानगी देण्यात आली होती. याशिवाय ठिकठिकाणी मासेमारी, होड्याबांधणी, खजुराची लागवड आणि पशुपालन इ. अन्य व्यवसाय आहेत. तेलावरील स्वामित्वशुल्कामुळे कॉटारची एकदम श्रीमंत राष्ट्रांत गणना होऊ लागली. अनेक चैनीच्या वस्तूंबरोबरच या पैशामुळे देशात पाणीपुरवठा, रस्ते, वीज उत्पादन, शिक्षण, समाजकल्याण, रुग्णालये, आंतरराष्ट्रीय विमानतळ व बंदरनिर्मिती अशा सोयी झाल्या. सर्व अर्थकारण राष्ट्रीय बॅंकेद्वारा चालते. येथे काही परदेशी बॅंकाही व्यवहार करतात. १९६६ पासून देशात कॉटार-दुबाई रियाल हे नाणे अंमलात होते. १९७३ पासून कॉटार रियाल अंमलात आले. १ रि. = २ शि. १ पे. हा दर आहे (१९७४). आंतरराष्ट्रीय सहकार या नात्याने कॉटार अरब देशांना आर्थिक साहाय्य करतो. १९६५ साली उभारण्यात आलेल्या संयुक्त अरब अमीर राज्यविकास निधीला कॉटार मदत करीत असतो. देशात १९६५ साली ७५० किमी. लांबीचे रस्ते होते. देशात १९६५ मध्ये सु. ८,००० मोटारी व लॉरी होत्या. शहर सोडले की, वाळवंटी जमिनीवरून मोटारी जातात. दोहा येथे विमानतळ असून उम सैद उत्तम बंदर आहे. पश्चिम किनाऱ्यावरील झाकरित हे दुय्यम प्रतीचे बंदर असून बहारीनहून येथे वाहतूक चालते. १९६६ साली १० माणसांमागे एक टेलिफोन होता.

 

लोक व समाजजीवन : १९५९ साली १५,००० असलेली लोकसंख्या, १९६९ साली १,७०,००० झाली यांपैकी ८०,००० लोक अल् दोहा या पूर्वतटावरील राजधानीत राहतात. बहुसंख्य असलेल्या अरबी (सुन्नी) लोकांमध्ये निग्रोंच्या रक्ताचे मिश्रण आढळते. याचे कारण गुलाम-व्यापार असे सांगता येईल. बहुसंख्य लोकांची भाषा पर्शियनमिश्रित अरबी असून हे पुराणमतवादी आहेत.

 

कॉटार येथे १९७२–७३ साली ४४ शाळांमधून ५७३ शिक्षक ११,१०० मुले शिकवीत होते. याशिवाय ४१ मुलींच्या शाळांमधून ५३० शिक्षिका ८,७७४ मुलींना शिक्षित करीत होत्या. निःशुल्क शिक्षणाबरोबर स्वास्थ्यसेवादेखील निःशुल्क आहे. सार्वजनिक ग्रंथालय नाही. काही लोकांकडे व तेल कंपन्यांजवळ काही ग्रंथांचे साठे आहेत. बहारीन येथून छापून येणारी अरबी व इंग्रजी नियतकालिके सर्वत्र प्रचारात आहेत. गृहबांधणीसाठी तेल कंपन्या व शासन कमी व्याजाची कर्जे देतात. कॉटार येथे ५ दवाखाने असून १९६४ साली ४५ डॉक्टर्स, ८ दंतवैद्य, १०२ परिचारिका व २ औषधनिर्माते होते. या देशात पर्यटनव्यवस्था नाही. तथापि जगातील तेल उत्पादन करणारे श्रीमंत राष्ट्र म्हणून कॉटारला महत्त्व आहे. 

 

खांडवे, म. अ.

कॉटार