काँब्रेटेसी : (अर्जुन कुल). फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) वनस्पतींचे एक कुल. याचा अंतर्भाव ⇨मिटेंलीझ  या गणात केला असून सु. २० वंश व ५०० जाती त्यात समाविष्ट आहेत. वृक्ष, क्षुपे (झुडपे) व वेली या स्वरूपात ह्या वनस्पती उष्णकटिबंध व त्यालगतच्या प्रदेशांत आढळतात. पाने साधी, चिवट, बहुधा समोरासमोर फुले द्विलिंगी, क्वचित एकलिंगी, नियमित, सच्छद, बहुधा लहान फुलोरा मंजरी किंवा कणिश संवर्त अरुंद पेल्यासारखा व किंजपुटास वेढणारा पुष्पमुकुट कधीकधी नसतो, असल्यास पाकळ्या संवर्तावर आधारलेल्या केसरदले पाकळ्यांसमोर किंवा त्यांच्याशी एकाआड एक किंजपुट अधःस्थ व एक कप्प्याचा बीजके दोन ते सहा, लोंबती व अधोमुख फुलातील सर्व मंडलांत चार-पाच दले केसरदले कधी आठ ते दहा व दोन मंडलांत असतात. [→फूल ]. फळ शुष्क, सपक्ष किंवा अश्मगर्भी (आठळीयुक्त) व न तडकणारे, कोनीय, गोल किंवा लांबट, एकबीजी. बी अपुष्क (वाढणाऱ्या बीजाच्या गर्भाला अन्न पुरविणारा पेशीसमूह नसलेले).

मिर्टेसी, ऱ्हायझोफोरेसी, प्युनिकेसी, मेलॅस्टोमेसी, ऑनेग्रेसी इ. कुलांशी या कुलाचे आप्तभाव आहेत. याला ‘हरीतकी कुल’ असेही म्हणतात. हिरडा (हरीतकी), बेहडा, धावडा, लाल चमेली, किंजळ इ. उपयुक्त वनस्पतींचा या कुलात समावेश आहे.

 

पहा : मिर्टेलीझ.

 

केळकर, शकुंतला