काँजिया टोमेंटोजा : (कुल-व्हर्बिनेसी). ही एक मोठी प्रतानारोही (तनाव्यांच्या साहाय्याने वर चढणारी) वेल मूळची ब्रम्हदेश, थायलंड, आसाम इ. प्रदेशांतील असून उत्तर भारतात बरीच लागवडीत आहे शोभेकरिता महाराष्ट्रातही बागेत लावलेली आढळते. ॲझूरिया  नावाचा प्रकार महाराष्ट्रात विशेष लावतात उत्तर भारतात ऑब्लाँगीफोलिया  हा प्रकारही अधिक आढळतो. नावाप्रमाणे टोमेंटोजा  प्रकार अधिक लवदार असतो. याची पाने संमुख (समोरासमोर), आयत, १०–१२ X ५–१० सेंमी., वरून खरबरीत, खालून केसाळ व उठावदार शिरांची या वेलीची निळसर पांढरी, लहान फुले केसाळ व अग्रस्थ (शेंड्यावरील) परिमंजरीवर जानेवारी-मेमध्ये येतात. छदे व छदके मोठी प्रत्येक वल्लरीखाली तीन छदकांचे व वाटीसारखे फिकट लाल वा निळे मंडल असते. संवर्त नसराळ्यासारखा पुष्पमुकुट नलिकाकृती [→फूल]. इतर लक्षणे ⇨ व्हर्बिनेसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे बोंड तडकत नाही. बिया व कांड्या यांपासून नवीन लागवड करतात.

चौगले, द. सी.