कल्पनाजाल : वस्तुनिष्ठ घटकांऐवजी व्यक्तिगत प्रेरणा, इच्छा, भावभावना, विचार इ.घटकांनी नियमित होणारा कल्पनात्मक विचारक्रियेचा एक प्रकार.कल्पनाजाल (फँटसी) हा बहुधा व्यक्तीने स्वतःशीच केलेला काल्पनिक संवाद असतो आपले कल्पनाजाल इतरांना कळविण्याची वा निवेदन करण्याची तिची प्रवृत्ती नसते. कल्पनाजाल हे काही अंशी स्वप्न पाहण्याचाच एक प्रकार होय.बहुतेक मानसशास्त्रवेत्ते दिवास्वप्नांचा अंतर्भाव कल्पनाजालात, त्याचा एक प्रमुख प्रकार म्हणून करतात.इतकेच नव्हे, तरकल्पनाजालाचाच एक प्रकार म्हणून ते निद्रावस्थेतील स्वप्नांकडे पाहतात.

कल्पनाजालास काही व्यावहारिक उपयुक्तता नसली, तरी व्यक्तीच्या वैफल्यभावनेला अशा प्रकारच्या विचारक्रियेद्वारे (कल्पनाजालाद्वारे) वाट करून दिली जाते.म्हणजे व्यक्ती काल्पनिक रीतीने आपली इच्छापूर्ती करून घेते आणि वैफल्याचे दडपण हलके करते तसेच बाह्य जगातील सामाजिक,नैतिक इ.नियम किंवा बंधने बाजूस सारून ती व्यक्ती स्वतःस हव्या तशा सोयीच्या घटनांची वा प्रसंगांची आपल्या कल्पनाविश्वात निर्मिती करून समाधान मिळवीत असते.

बहुतेक व्यक्ती – विशेषत : कुमारवयीन – कल्पनाजालाचा कमीअधिक प्रमाणात आश्रय करताना आढळतात आणि ते स्वाभाविकही आहे.कल्पनाजाल हा परिस्थितीशी अनुकूलन साधण्याचा विधायक मार्ग नव्हे तथापि जीवनातील अप्राप्याची काल्पनिक प्राप्ती व प्राप्त संघर्षांपासून काही काळ सुटका यांचा लाभ कल्पनाजालामुळे होतो.तसेच यश, कामपूर्ती, कीर्ती, मान-सन्मान, संपत्ती इ.विविध प्रकारच्या इच्छांची आंशिक पूर्ती कल्पनाजालामुळे वा दिवास्वप्नांमुळे होऊ शकते.सु.९५ टक्के महाविद्यालयीन विद्यार्थी आपला दिवसातील काही वेळ दिवास्वप्ने रंगविण्यात व्यतीत करतात,असे आढळून आले आहे.त्यांच्या दिवास्वप्नांचे विषय प्रामुख्याने शैक्षणिक यश आणि बहुमान, प्रेमसंपादन आणि भावी काळातील कीर्ती व संपन्नता हे असतात.इच्छापूर्तीचे व संषर्घांतून काही काळ सुटका करून घेण्याचे एक निरुपद्रवी साधन म्हणून कल्पनाजाल वा दिवास्वप्ने व्यक्तीस उपकारक ठरतात.अर्थात त्यांचा अतिरेक मात्र ⇨छिन्नमानस नावाच्या विकृतीचे एक लक्षण मानले जाते. छिन्नमानसाच्या रोग्यांना वास्तव व कल्पनाजाल यांत भेद करण्याची क्षमताच उरलेली नसते व त्यांचा वास्तवाशी कसलाच संपर्क उरलेला नसतो.

दिवास्वप्ने व स्वप्ने : सर्वसाधारणपणे सर्वच व्यक्ती कमीअधिक प्रमाणात दिवास्वप्ने रचत असतात तथापि त्यांचा अतिरेक हे मात्र त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वातील सदोष अनुकूलनाचे लक्षण मानले जाते.स्वत:च्या दिवास्वप्नांचा तपशील सांगण्यास प्रौढ व्यक्ती अधिक नाखूष असतात कारण ही दिवास्वप्ने त्या व्यक्तीनेच निर्माण केलेली असतात आणि त्यांचा वास्तवाशी अथवा बाह्य जगाशी साधलेल्या व्यावहारिक अनुकूलनाशी सुतराम संबंध नसतो.प्रत्यक्ष अनुभवात अप्राप्य असणारे सुख वा समाधान दिवास्वप्नांत प्रामुख्याने मिळविले जाते. ⇨सिग्मंड फ्रॉइडच्या मते स्वप्नांप्रमाणेच दिवास्वप्नांतही इच्छापूर्तीचीच प्रक्रिया प्रतिबिंबित झालेली असते.फ्रॉइडचे असेही मत होते,की स्वप्नांच्या पद्धतशीर अभ्यासामुळे व्यक्तीच्या इच्छांबाबतची आणि व्यक्तिमत्त्वाच्या इतर अंगांबाबतची माहिती मिळून त्यावर चांगला प्रकाश पडतो.स्वप्ने आणि दिवास्वप्ने वा कल्पनाजाल यांतील महत्त्वाचा फरक म्हणजे कल्पनाजालात इच्छांचे मूळ स्वरूप न बदलता अथवा त्यांना प्रतीकात्मक रूप न येता अथवा त्यांचे निरोधन न होता, सरळसरळपणे त्या इच्छांची कल्पनेत पूर्ती करून घेतली जाते.‘इच्छापूर्ती’ हे स्वप्नांचे आणि दिवास्वप्नांचे प्रमुख अंग असले, तरी त्यांत हा महत्त्वाचा फरकही आहे.शिवाय दिवास्वप्नांचे जागृतावस्थेतील विचारक्रियेशीही काही अंशी साम्य आहे.स्वप्ने पडत असताना आपल्या डोळ्यांची हालचाल होत असते, तशी ती दिवास्वप्नांत वा कल्पनाजालात होत नाही.[→ स्वप्न].

कल्पनाजाल व व्यक्तिमत्त्व: स्वप्नांचे विश्लेषण व अर्थविवरण करून अथवा मुक्तसाहचर्याचे विश्लेषण करून व्यक्तीचे कल्पनाजाल व व्यक्तिमत्त्व यांच्यातील संबंधांचा अभ्यास करण्याची पद्धती मानसशास्त्रात रूढ आहे.१९२१ मध्ये हेर्मान रोर्शाक ह्या मानसोपचारज्ञाने याबाबत एक नवे तंत्र प्रस्थापित केले. त्याने शाईच्या डागांबाबत व्यक्तीचे प्रतिसाद काय आहेत,याच्या अभ्यासावरून व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण केले. १९३७ मध्ये हार्व्हर्ड येथील हेन्री मरी याने या संदर्भात विषयनिष्ठ आसंवेदनाचीटी.ए.टी. (थिमॅटिक आपर्सेप्शन टेस्ट) नावाची कसोटी प्रस्तुत केली.या कसोटीत प्रयुक्त व्यक्तीस विशिष्ट प्रकारची चित्रे दाखवून त्या आधारे तिला एक कथा रचावयास सांगितले जाते.त्यामुळे प्रयुक्ताच्या कल्पनाजालरचनेस चालना मिळते.ह्या कथेची नंतर छाननी करून त्या आधारे त्या व्यक्तीच्या प्रेरणा, कृती, मन:स्थितीच्या छटा इ.अंगांचे नीट आकलन होते.

कल्पनाजाल व सर्जनप्रक्रिया : सर्जनशील अथवा नवनिर्माणक्षम विचारक्रियेत कधीकधी कल्पनाजालाचाही भाग असतो.सर्जनशील व्यक्ती चित्र, शिल्प साहित्यादी ललित कला अथवा नवे वैज्ञानिक शोध इत्यादींद्वारा आपल्या प्रतिमा, प्रतीके, कल्पनाजाल, भाव-भावना,विचार इत्यादींची अभिव्यक्ती करीत असते.सर्वसामान्य माणूस आणि प्रतिभासंपन्न कलावंत वा वैज्ञानिक यांत भेद करणारे, कल्पनाजाल हेच एकमेव लक्षण नाही, हे उघड आहे.तथापि त्यांच्या निर्मितीत काही वेळा कल्पनाजालाचाही महत्त्वपूर्ण भाग असतो. सर्वसामान्य व्यक्तींची कल्पनाजाल वा दिवास्वप्नप्रक्रिया ही त्या व्यक्तीच्या नकळतपणे अथवा जाणिवेशिवाय चालू असते आणि ती त्याची वैयक्तिक वा खाजगी बाब असते.उलट कलावंताची वा वैज्ञानिकाची हीच प्रक्रियामात्र कळूनसवरून वा जाणीवपूर्वक घडत असते.तिचा वापर तो आपल्या विशिष्ट प्रकारच्या जीवनदृष्टीच्या वा हेतूच्या अभिव्यक्तीसाठी आपल्या निर्मितीत करीत असतो म्हणूनच त्याच्या निर्मितीतील कल्पनाजाल हे या अर्थाने त्याचे वैयक्तिक वा खाजगी कल्पनाजाल उरत नाही.सर्वच चमत्कृतिपूर्ण आणि अद्भुतरम्य साहित्यात या अथाने कल्पनाजालाचा वापर केलेला आढळून येतो.जगातील विविध धर्मांच्या बहुतांश पुराणकथांचे स्वरूप पाहता,त्यांचीही निर्मिती कल्पनाजालाच्या आधारे झाली आहे असे म्हणता येईल.अर्थात ह्या पुराणकथांचे स्वरूप केवळ व्यक्तिगत न राहता, त्या त्या धर्मांच्या समाजाची त्यांना मान्यता मिळून त्या सामूहिक धर्मभावनेशी निगडित अशा स्वरूपाच्या पुराणकथा बनतात.

संदर्भ : Atkinson, J. W. Ed. Motives in Fantasy, Action and Society, New York, 1958.

सुर्वे, भा.ग.