कॉइटर, व्हालकर : (? १५३४ – २ जून १५७६). डच तुलनात्मक शारीरविज्ञ. त्यांनी तुलनात्मक शारीराच्या (शरीररचनाशास्त्राच्या) अभ्यासाचा पाया घातला. त्यांचा जन्म नेदर्लंड्समधील ग्रोनिंगेन येथे झाला. विद्यार्थिदशेतील त्यांच्या हुषारीमुळे त्यांना फ्रान्स व इटलीतील विद्यापीठांत उच्च शिक्षण घेण्यासाठी ग्रोनिंगेन शहरातर्फे शिष्यवृत्ती देण्यात आली. १५६२ साली त्यांचा इटलीतील बोलोन्या विद्यापीठाची वैद्यकाची डॉक्टरेट मिळविली. बोलोन्या विद्यापीठात ते शस्त्रक्रियाविज्ञानाचे अधिव्याख्याते होते. धार्मिक मतभेदांमुळे त्यांना रोम आणि बोलोन्या येथे काही काळ तुरुंगवास सोसावा लागला. १५६६ मध्ये ते जर्मनीत गेले व अँबर्ग येथे १५६९ पर्यंत त्यांनी अध्यापन केले. १५६९ साली न्यूरेंबर्ग शहराचे वैद्य म्हणून त्यांची नेमणूक झाली. तेथे त्यांना गुन्हेगारांच्या प्रेतांचे विच्छेदन करण्याची संधी मिळाली.
बोलोन्या येथे असताना त्यांनी मानवी शारीरासंबंधी कोष्टकरूप माहिती प्रसिद्ध केली. न्यूरेंबर्ग येथे असताना त्यांनी मानवी गर्भाच्या हाडांचा सांगाडा व सहा महिन्याच्या मुलाचा सांगाडा यांसंबंधी एक महत्त्वाचा विवेचक तुलनात्मक ग्रंथ लिहिला. त्यावरून त्यांनी अस्थींच्या विकासासंबंधी केलेला सखोल अभ्यास कळून येतो. मानवी शारीराबरोबरच त्यांनी विशेषत: बहुतेक पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांचा, उभयचर (जमिनीवर व पाण्यात दोन्हीकडे वास्तव्य करणारे प्राणी), सरीसृप (सरपटणारे प्राणी), पक्षी व सस्तन प्राणी यांच्या शारीराचा विस्तृत अभ्यास केला. १५७२ साली त्यांनी कोंबडीच्या पिलाच्या विकासाचे पद्धतशीर वर्णन प्रसिद्ध केले. अशा प्रकारचे वर्णन फक्त ॲरिस्टॉटल यांनी २,००० वर्षांपूर्वी देण्याचा प्रयत्न केला होता. शारीरविषयक लेखनातील चित्रांचे महत्त्व ओळखून त्यांनी आपल्या लेखनातील चित्रे स्वत:च उत्तम रीतीने काढली होती. त्यांनी अनेक रोगांचेही वर्णन केलेले होते व १५७३ मध्ये मस्तिष्कमेरुरज्जू ज्वराचे (मेंदू व त्याच्या मागून निघालेली मज्जातंतूंची दोरी यांच्या दाहयुक्त सुजेचे) प्रथमच वर्णन केले. ते फ्रान्समधील शॅंपेन येथे मृत्यू पावले.
जमदाडे, ज. वि.