काळपुळी : (कारबंकल). या विकारात त्वचा व त्वचेखाली असलेल्या ऊतकांत (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशीसमूहांत) तीव्र जंतुसंसर्ग झाल्यामुळे त्यांचा कोथ (रक्तप्रवाहातील अडथळ्यांमुळे ऊतकांचा मृत्यू होणे) होतो व पू-रूपाने तो अनेक तोंडांवाटे बाहेर पडतो. याशिवाय ज्वर, विषरक्तता (रक्तप्रवाहात मोठ्या प्रमाणात विष भिनणे) वगैरे सार्वदेहिक लक्षणेही दिसतात. हा विकार बहुधा वयाच्या चाळिसाव्या वर्षानंतर स्त्रियांपेक्षा पुरुषांत अधिक दिसतो.
हा विकार स्टॅफिलोकोकाय या जंतूमुळे होतो. केशमूलामध्ये (केसाच्या मुळात) या जंतूचा प्रथम संसर्ग होतो व त्यामुळे येणारी सूज खालपर्यंत पसरून नुसता विद्रधी (पूयुक्त फोड) होण्याऐवजी त्वचा सुजून लाल व जाड होते. जंतूंच्या क्रियेमुळे कोथ व कोशिकाविलयन (कोशिकांचा नाश) झाल्यामुळे उत्पन्न होणारा पूयुक्त द्रव अनेक तोंडांनी बाहेर पडतो, तरीसुद्धा त्या भागाचा पूर्ण निचरा होत नाही व त्यामुळे रक्तात विष भिनते आणि ज्वर, अशक्तता, जंतुरक्तता (रक्तप्रवाहात मोठ्या प्रमाणावर जंतूंचे अतिक्रमण) वगैरे लक्षणे होतात. चेहरा, गाल व वरचा ओठ या भागांत काळपुळी झाल्यास मस्तिष्कातील (मेंदूतील) नीलाविवरांत संसर्ग होऊन अंत:क्लथन (वाहिनीमध्ये रक्त गोठणे) होते.
जंतूंविरुद्ध प्रतिकारशक्ती कमी असलेल्या अशक्त व वृद्ध व्यक्तीत मधुमेहादी विकारांत काळपुळीचे प्रमाण अधिक सापडते. मानेचा मागला भाग, पाठ वगैरे भागांत बहुधा काळपुळी तयार होते. काही वेळा जंतूंचा रक्तात प्रवेश होऊन त्यामुळे सर्व शरीरभर विद्रधी, ज्वर, वातादी लक्षणे दिसून येतात.
चिकित्सा : शस्त्रक्रिया करून त्वचेखाली तयार होणाऱ्या विषारी द्रवाला व नष्ट झालेल्या ऊतकांना बाहेर पडण्यास वाट करून देणे ही पहिली गोष्ट आहे. मधुमेहादी मूळ कारणांवर उपचार केले पाहिजेत. प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांचा (उदा., पेनिसिलिनाचा) प्रथमपासून उपयोग केल्यास शस्त्रक्रियेची जरुरी पडत नाही. अतितीव्र प्रकारांत किंवा अशक्त व्यक्तीला काळपुळी मारक होऊ शकते.
कापडी, रा. सी.
आयुर्वेदीय चिकित्सा : काळपुळी ही प्रमेहात विशेषत: मधुमेहात उत्पन्न होत असते. प्रमेहात वीस प्रकारच्या पिटिका उत्पन्न होतात. त्यांपैकी काळपुळी ही जालीनी पुळी होय. तिच्यात अतिशय दाह होतो व त्या पुळीस अनेक भोके असतात व तिचे स्वरूप जाळीसारखे होते.
तिच्या पूर्वरूपात वड, पिंपळ ह्यांचा काढा शेळीचे मूत्र घालून प्यायला द्यावा आणि पुळीचे शीर तोडून रक्त काढावे. ही पुळी केव्हाही शेकू नये. उपवास, विरेचन, वमन इ. शरीर कृश करणारे असे उपचार करावेत. धान्वन्तर घृत द्यावे. कच्च्या पुळीच्या सुजेप्रमाणे शेक वर्ज्य करून सर्व उपचार करावेत. व्रण झाल्यानंतर व्रणरोपक तेल लावावे. आरग्वधादी काढ्याने व्रण धुवावा. शालसारादी काढा शिंपडावा. पिप्पल्यादी काढा पिण्याला आणि भोजनात वापरावा व पाठादी चूर्ण मधातून चाटवावे. शालसारादी लेह घ्यावा. त्यास कृष्ण लोह आणि ताम्रभस्म असते. लोहारिष्ट द्यावे. बाकी चिकित्सा प्रमेहाप्रमाणे [→ परमा].
जोशी, वेणीमाधवशास्त्री