कॅप्स्टन : (उभा रहाट). जहाजावरील दोर अथवा साखळदंड ओढणारा उभ्या अक्षाचा रहाट. धक्क्यापासून काही अंतरावर असलेले जहाज धक्क्याला लावताना त्याला मुख्यत: आडव्या गतीची गरज असते. अशी गती जहाजाच्या मागे बसलेल्या मळसूत्री पंख्याने मिळू शकत नाही. अशा वेळी जहाजावरील दोराचे टोक धक्क्यावरील  खुंट्यात अडकवून जहाजावरील उभ्या रहाटावर दोर गुंडाळीत जहाज हळूहळू धक्क्याजवळ आणले जाते. प्राणरक्षक नावेसारख्या अवजड वस्तू पाण्यातून वर उचलून घेण्यासाठी अथवा जहाजाच्या नांगरांचे साखळदंड ओढण्यासाठी अशा रहाटाचा उपयोग होतो. दोन धक्क्यांमधील चिंचोळ्या भागातून जहाज ओढून नेण्यासाठी असे रहाट धक्क्यावरही बसवलेले असतात. जहाजावरचे रहाट साधारणत: गच्चीवर बसवतात परंतु रहाट चालविण्याचे एंजिन किंवा विद्युत् चलित्र (मोटर) खालच्या मजल्यावर ठेवतात. अशा उभ्या रहाटाची रचना आकृतीमध्ये दाखविली आहे.

कॅप्स्टन. (अ) उभा छेद : (१) दोरखंड गुंडाळला जाणारा भाग, (२) हातदांडा खुपसून बसविण्याची खाच, (३) जहाजाची गच्ची, (४) वक्रदंती चाक व खिटी, (५) गच्चीवरील जलरोधी घर्षण नलिका, (६) रहाट हाताने फिरविताना विद्युत् चलित्र अलग करण्याची खुंटी, (७) रहाट फिरविणारे विद्युत् चलित्र.

पूर्वी रहाट चालविण्यासाठी वाफेचे एंजिन वापरीत असत. आता बहुतेक जहाजांवर विद्युत् चलित्र वापरतात. या चलित्राला दंतचक्रांची वेगबदल पेटी जोडतात. तिच्या मदतीने रहाटाला उलट सुलट दिशेने पाहिजे तशी गती देता येते. जहाज ओढीत असताना दोरावर फार मोठा ताणभार असतो त्यामुळे दोर मंदगतीने ओढावा लागतो. सुटे दोरखंड गोळा करताना ताणभार अगदी कमी असतो त्यावेळी दोर झपाट्याने गुंडाळता येतो. अशी विविध प्रकारची क्षमता अशा रहाटामध्ये असते. जड वस्तू उतरविताना गतिरोधकाच्या (ब्रेकच्या) साहाय्याने गतीचे नियंत्रण करता येते. काही कारणाने विद्युत् शक्ती मिळत नसेल तेव्हा विद्युत् चलित्राचा संबंध तोडतात आणि चार पाच माणसे हातदांड्यांच्या साहाय्याने हा रहाट फिरवितात. त्यांची एकूण शक्ती कमी पडली तर रहाट निसटून उलटा फिरू नये व त्यामुळे माणसांना इजा होऊ नये म्हणून रहाटाच्या खालच्या भागात एक वक्रदंती चाक व खिट्या बसविलेल्या असतात.

कॅप्स्टन. (आ) बाजूचा देखावा : (१)दोरखंड गुंडाळला जाणारा भाग,(२)हातदांडा खुपसून बसविण्याची खाच, (३) जहाजाची गच्ची, (४)वक्रदंती चाक व खिटी.

हा रहाट उघड्या जागेत बसवीत असल्याने तो ऊन, वारा व लाटा यांचा मारा सहन करील असा मजबूत बसविलेला असतो. रहाट चालविण्याचे यंत्र खालच्या मजल्यावर बंदिस्त जागेत असते. साखळदंड ओढताना तो निसटू नये म्हणून रहाटाच्या पृष्ठभागावर साखळीचे दुवे अडकतील अशा खाचा असतात. दोरखंड ओढताना रहाटावर दोरखंडाचे दोन तीन वेढे देऊन त्याचे सुटे टोक एक माणूस ओढून धरतो. या टोकाला ओढ बसताच दोरखंडावर ताण येऊन ते गुंडाळण्यास सुरुवात होते व दोरखंडाला बांधलेले जहाज सरकू लागते. रहाटाच्या पृष्ठभागावरील गोलाईमुळे दोर मध्यभागालाच गुंडाळला जातो.

तांबे, मु. शं.