जहाजातील यंत्रसामग्री : जहाजाचा प्रचालक (मळसूत्री पंखा) फिरविण्यासाठी बसविलेल्या मुख्य एंजिनाशिवाय इतर बरीच कामे करण्यासाठी जहाजात आणखी काही एंजिने, जनित्रे, चलित्रे (मोटर) व यांत्रिक उपकरणे वापरावी लागतात. त्यांना साहाय्यक यंत्रे म्हणतात.

आ. १. सुकाणू फिरविण्याची द्रवीय माध्यमाची यंत्रणा : (१) सुकाणूचा अक्षदंड, (२) अक्षदंडाला जोडलेले चाक, (३) दट्ट्या, (४) दट्ट्याचा सिलिंडर, (५) झडपेचा सिलिंडर, (६) झडप दांडी, (७) दाब दिलेले तेल आत घेण्याचा मार्ग, (८) दाबरहित तेल निष्कास.

सुकाणू चालक : मोठ्या जहाजाचे सुकाणू फिरविण्यासाठी बरीच मोठी शक्ती लागते. त्यासाठी वाफ एंजिन किंवा विद्युत् चलित्र वापरता येते. जहाजाचे सुकाणू नेहमी पाण्यात बुडलेले असते. ते त्याच्या उभ्या अक्षाभोवती फिरवावे लागते. यासाठी त्याला एक उभा दंड जोडलेला असतो. या दंडाचे वरचे टोक जहाजाच्या वरेतून (मागच्या भागातून) वर नेऊन वरच्या गच्चीवर आणलेले असते. या टोकावर एक आडवा दांडा किंवा वर्तुळखंड बसवतात ते फिरविले म्हणजे खालचे सुकाणू फिरते. सुकाणू फिरविण्याचे काम नुसती यांत्रिक शृंखला वापरून वा द्रवीय माध्यम वापरून साधता येते. यांत्रिक शृंखलेला मोठी जागा लागते व तिचा बराच आवाज होतो. द्रवीय माध्यमाची यंत्रणा आटोपशीर असते, ती आवाज करीत नाही व तिची कार्यक्षमता यांत्रिक शृंखलेपेक्षा पुष्कळ जास्त असते. द्रवीय माध्यमाने सुकाणू फिरविण्याची यंत्रणा आ. १ मध्ये दाखविली आहे. सुकाणू फिरविण्याच्या यांत्रिक शृंखलेमध्ये स्क्रू आणि नट पद्धती किंवा दंतचक्रांची वेगबदल पेटी वापरून सुकाणूचा दंड उलट-सुलट फिरविता येतो आणि पाहिजे त्या जागी धरून ठेवता येतो. आ. १ मध्ये दाखविलेले १ हे सुकाणूच्या दंडाचे वरून दिसणारे टोक आहे आणि २ हे त्या दंडावर बसविलेले वर्तुळखंड आहे. वर्तुळखंड फिरविण्यासाठी त्याच्याभोवती बसविलेल्या साखळीची टोके ३ या दट्ट्याच्या दोन्हीकडील दांड्यांना जोडलेली आहे. ३ हा दट्ट्या ४ या मोठ्या सिलिंडरामध्ये दाब दिलेल्या तेलाच्या धक्क्याने पुढे-मागे सरकतो. तेलावर दाब देण्यासाठी विद्युत् चलित्राने चालणारा एक पंप असतो. त्या पंपातून बाहेर पडणारे दाबाखालचे तेल ७ या नळाने वरच्या लहान सिलिंडरात येते. या सिलिंडरामध्ये एक मार्गदर्शक झडप असते. ती सरकवण्यासाठी तिच्या दोन्हीकडे ६ या दांड्या जोडलेल्या आहेत. या दांड्या एंजिनाच्या शक्तीने सरकविल्या जातात. झडप मधल्या जागेपासून एका बाजूला सरकली म्हणजे दुसऱ्या बाजूकडचा तेलाचा मार्ग उघडतो व त्या मार्गाने दाबयुक्त तेल खालच्या मोठ्या सिलिंडरात जाते. या वेळी झडपेच्या दुसऱ्या टोकाशी असलेल्या मार्गाचे द्वारही मोकळे होते पण त्याचा संबंध झडपेच्या आतल्या भागाशी जोडला जातो आणि या मार्गाने खालच्या सिलिंडरातील दाबाखालचे तेल बाहेर पडू लागून तेथील दाब कमी होतो. ३ या दट्ट्याच्या एका बाजूवर दाबाखालील तेल व दुसऱ्या बाजूवर दाब नसलेले तेल असल्यामुळे दट्ट्या दाब नसलेल्या बाजूकडे सरकतो व २ या वर्तुळखंडाभोवती बसविलेल्या साखळीला ओढतो. त्यामुळे १ हा सुकाणूचा दंड आणि त्याला जोडलेले सुकाणूही फिरते. जहाजाचे चालन आणि नयन करणारा अधिकारी जहाजाच्या वरच्या मजल्यावरील सज्जात उभा राहून पुढील मार्ग पाहत असतो. जहाज वळविण्यासाठी त्याच्यासमोर एक उभे चाक बसविलेले असते. ते चाक हाताने फिरविले म्हणजे त्याला जोडलेले तारदोर ओढले जाऊन आ. १ मध्ये दाखविलेल्या ६ या दांड्या पुढे-मागे सरकविल्या जातात व त्यामुळे १ हा सुकाणूचा दंड फिरतो. जहाज सरळ पुढे नेण्यासाठी सज्जातील चाक त्याच्या मधल्या जागी धरून ठेवावे लागते. जहाजाच्या नयनाचे काम हाताने करता येते, परंतु लांब प्रवास करणाऱ्या जहाजात ते स्वयंचलित यंत्राच्या मदतीने करवून घेण्यात येते. या कामात सेलसिन (आपोआप समकालिक होणाऱ्या) विद्युत् चलित्रांचा [⟶ विद्युत् चलित्र] उपयोग करतात. मोठे जहाज भर वेगाने पुढे जात असताना १५ सेकंदांत सुकाणू कोणच्याही एका बाजूला ३५ तून फिरविता आले पाहिजे व ते पूर्ण वेगाने मागे जात असेल तेव्हा ३० सेकंदांत ते ३०फिरविता आले पाहिजे.


आ. २. नांगर यंत्रणा : (अ) साधी यंत्रणा : (१) नांगर, (२) साखळी ओढणारा आडवा यांत्रिक रहाट, (३) गतिरोधकाचा हस्तक; (आ) विद्युत् यंत्रणा : (१) दोर किंवा साखळी गुंडाळणारे चाक, (२) गतिरोधक पट्टा बसविण्याची कप्पी, (३) क्लच, (४) दंतचक्रमाला, (५) धारवे (बेअरिंगे), (६) विद्युत् चलित्र.

नांगर यंत्रणा : जहाज बंदरात आल्यावर किंवा उथळ समुद्रात असताना थांबवून एका जागी स्थिर ठेवण्यासाठी जहाजाच्या नाळेवर (पुढील टोकावर) दोन्ही बाजूंना लांब साखळीने टांगून ठेवलेले  वजनदार पोलादी नांगर असतात ते वर ओढण्यासाठी यांत्रिक रहाटाचा उपयोग करतात. नांगर खाली सोडताना तो आपल्या वजनानेच खाली जातो. तो तळावर टेकला म्हणजे साखळी सैल सोडण्याचे काम एकदम थांबविता येते. साखळी ज्या रहाटावरून जाते त्याच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पट्ट्याचे गतिरोधक बसविलेले असतात. त्याशिवाय साखळी अडकवून ठेवण्यासाठी काही आकडेही बसवतात. नांगर टांगून ठेवण्याची जागा, नांगराची साखळी आणि साखळी ओढणारा रहाट आ. २ मध्ये दाखविला आहे व विद्युत् चलित्राने फिरणाऱ्या आडव्या रहाटाची वरून दिसणारी मांडणी आ. २ (आ) मध्ये दाखविली आहे. यामध्ये विद्युत् चलित्र १,५०० प्रमिफे. वेगाने फिरले, तरी साखळी ओढणारा रहाट १०० प्रमिफे. वेगाने फिरावा अशी यांत्रिक योजना केलेली असते. जहाजाच्या वरेवरही असाच एक नांगर राखीव म्हणून ठेवलेला असतो. जहाज उभे असताना वादळ झाले, तर त्या नांगराचाही उपयोग करतात [नांगर (जहाजाचा)].

उभे रहाट : (कॅप्स्टन). धक्क्याजवळ आलेले जहाज धक्क्याला लावण्यासाठी यांचा मुख्यतः उपयोग करतात [⟶ कॅप्स्टन].

जहाजाच्या गच्चीवरील (डेकवरील) यारी : धक्क्यावरचा अवजड माल उचलून तो जहाजाच्या कोठीत सोडण्यासाठी व कोठीतील माल वर काढून धक्क्यावर ठेवण्यासाठी प्रत्येक कोठीच्या तोंडाजवळ एक वा दोन याऱ्या उभ्या केलेल्या असतात. त्यांच्या मदतीने वर उचललेला माल डेकवरून आडव्या दिशेनेही नेता येतो. त्यामुळे मालाचा चढ-उतार झपाट्याने होऊ शकतो. अशा यारीने साधारणतः दोन टनांपर्यंत वजनाचा बोजा उचलता येतो. या यारीचे दोर ओढण्यासाठी यांत्रिक रहाट जोडलेले असतात व ते चालविण्यासाठी डीझेल एंजिन किंवा विद्युत् चलित्र वापरतात. या प्रकारची एक यारी आ. ३ मध्ये दाखविली आहे. या प्रकारात एक मध्यवर्ती खांब असतो व त्याच्या आधाराने चारी बाजूंना चार स्वतंत्र याऱ्या उभ्या करतात [⟶ यारी].

आ. ३. जहाजाच्या गच्चीवरील यारी : (१) गच्ची, (२) उभा खांब, (३) यारी.

पंप : जहाजामध्ये निरनिराळ्या कामांसाठी अनेक प्रकारचे पंप वापरावे लागतात. बाष्पित्रामध्ये (बॉयलरमध्ये) पाणी भरण्यासाठी जास्त दाब देणारा पश्चाग्र गतीचा (दट्ट्याची सरळ रेषेत पुढे-मागे हालचाल होणारा) पंप बसवितात. हा पंप वाफेच्या एंजिनाने चालवितात. बहुतेक पाण्याचे पंप केंद्रोत्सारी (केंद्रापासून अरीय दिशेने दूर ढकलणाऱ्या प्रेरणेचा उपयोग करणाऱ्या) जातीचे असतात व ते चालविण्यासाठी विद्युत् चलित्रांचा उपयोग करतात. इंधन तेलाचा पुरवठा करणारे पंपही केंद्रोत्सारी जातीचे असतात व तेही विद्युत् चलित्रांनी चालवितात. बाष्पित्राच्या भट्टीमध्ये लागणारी हवा पुरविण्यासाठी विद्युत् चलित्रावर फिरणारा केंद्रोत्सारी जातीचा पंखा वापरतात. वायुवीजनासाठी बसविलेले सर्व पंप विद्युत् चलित्राने चालणारे केंद्रोत्सारी जातीचे असतात. डीझेल एंजिनाच्या सिलिंडरांचे संमार्जन करण्यासाठी (जळालेले वायू बाहेर ढकलण्यासाठी) लागणारी थोड्या दाबाची हवा पुरविण्यासाठी दोन घूर्णकांचे (फिरणाऱ्या भागांचे) विद्युत् चलित्रावर फिरणारे पंखे वापरतात. डीझेल एंजिन सुरू करण्यासाठी लागणारी जास्त दाबाची हवा पुरविण्यासाठी हवा संपीडक (दाबयुक्त हवा पुरविणारे यंत्र) वापरतात. या संपीडकामध्ये दोन वा तीन पदे (टप्पे) असतात व प्रत्येक दोन पदांमध्ये गरम झालेली हवा थंड करण्याची व्यवस्था केलेली असते. हवा संपीडकाने तयार केलेली दाबाखालची हवा एका दाबपात्रामध्ये साठवून ठेवतात व जरूर पडेल तेव्हा तिचा उपयोग करतात.


उष्णता विनिमयक : (अधिक तापमानाच्या द्रवातील वा वायूतील उष्णतेने कमी तापमानाचा द्रव किंवा वायू तापविणारे साधन). ज्या जहाजामध्ये जहाज चालविण्याचा पंखा फिरविण्यासाठी वाफ एंजिन किंवा वाफ टरबाइन वापरतात तेथे एंजिनातून बाहेर जाणाऱ्या वाफेचे संघनन (द्रवीभवन) करून निर्गम मार्गामध्ये निर्वात स्थिती उत्पन्न करण्यासाठी वाफ संघनक (वाफ द्रवीभूत करणारी उपकरणे) जोडलेले असतात. या संघनकांत येणारी वाफ संघनित करण्यासाठी जलमार्गातील थंड पाणी वापरतात व ते फिरविण्यासाठी केंद्रोत्सारी जातीचा पंप वापरतात. निर्गम मार्गातून येणारी हवा व संघटित न होणारे वायू बाहेर काढण्यासाठी वाफेच्या झोताने चालणारा वायु-बहिस्सारक किंवा विद्युत् चलित्राने चालणारा निर्वात पंप बसवतात.

बाष्पित्रामध्ये भरण्याचे पाणी अगोदर तापवून भरले, तर इंधन खर्चात काटकसर करता येते. हे पाणी तापविण्यासाठी बाष्पित्राच्या भट्टीतून बाहेर पडणाऱ्या उष्ण वायूंचा उपयोग करतात. उष्ण वायूंची उष्णता थंड पाण्यामध्ये घेण्यासाठी उष्णता विनिमयकाचा उपयोग करतात. बाष्पित्राच्या भट्टीमध्ये जाळण्याचे तेल अगोदर तापवून ज्वालकात सोडले, तर ते लवकर पेट घेते व त्यामुळे ज्वालकाची कार्यक्षमता वाढते म्हणून उष्णता विनिमयक वापरून इंधन तेलाचे तापमान शक्य तितके वाढवितात. एंजिनामध्ये वापरलेले वंगण तेल तापून गरम होते, ते थंड करून व गाळून पुन्हा वापरता येते. गरम झालेले वंगण तेल थंड करण्यासाठी उष्णता विनिमयक वापरतात. यामध्ये तेलातील उष्णता काढून घेण्यासाठी थंड पाण्याचा उपयोग करतात. उष्णता विनिमयकामधील द्रव पदार्थ खेळविण्यासाठी केंद्रोत्सारी पंप वापरतात आणि ते विद्युत् चलित्राने फिरवितात [⟶ उष्णता विनिमयक].

वातानुकूलन : जहाजातील पुष्कळ भागांत वातानुकूलन करावे लागते आणि त्यासाठी विशेष प्रकारची यंत्रसामग्री बसवावी लागते. ती चालविण्यासाठी विद्युत् चलित्राचा उपयोग करतात. जहाजावर खाद्यपदार्थ ठेवण्याच्या कोठारात थंड हवा खेळवावी लागते. हवा थंड करण्यासाठी शीतक यंत्रणा बसवावी लागते. ती चालविण्यासाठी बहुतेक ठिकाणी विद्युत् चलित्र वापरतात. थंड प्रदेशातून जाताना जहाजावरील पुष्कळ विभागांत हवा गरम ठेवण्याची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी वाफेने गरम होणारे नळ बसवितात. ही वाफ पुरविण्यासाठी स्वतंत्र बाष्पित्र बसवितात किंवा एंजिनातून बाहेर पडणाऱ्या वाफेचा उपयोग करतात. काही ठिकाणी उष्णता उत्पन्न करण्यासाठी विद्युत् प्रवाहाने गरम होणाऱ्या रोधक तारा बसवितात.

ऊर्ध्वपातक : समुद्रातून प्रवास करताना गोडे पाणी संपले म्हणजे खारे पाणी उकळून त्याच्या वाफेपासून गोडे पाणी तयार करण्यासाठी ऊर्ध्वपातक यंत्र बसवितात. खारे पाणी तापविण्यासाठी उष्णता विनिमयक जातीचे दाबपात्र वापरतात. यामध्ये खारे पाणी उकळण्यासाठी वाफेचा उपयोग करतात व खाऱ्या पाण्याच्या वाफेचे संघनन करून गोडे पाणी तयार करण्यासाठी वाफ संघनक वापरतात. या यंत्रणेत पाणी खेळविण्यासाठी विद्युत् चलित्राने फिरणारे केंद्रोत्सारी पंप वापरतात.

विद्युत् जनित्र : जहाजावर दिवे लावण्यासाठी व विद्युत् चलित्रे चालविण्यासाठी विद्युत् शक्तीचा पुरवठा करावा लागतो. या दोन कामांशिवाय संदेशवहन, रेडिओ, रडार, मार्गणक यंत्रे, स्वयंपाकगृह व उपहारगृह, बोलपट, ध्वनिक्षेपक, संरक्षक साधने आणि नियंत्रक साहित्य अशा अनेक कामांसाठी विद्युत् शक्तीचा उपयोग करावा लागतो. विद्युत् शक्ती पुरविण्यासाठी काही जहाजांत मुख्य एंजिनालाच एक विद्युत् जनित्र जोडतात परंतु बहुतेक जहाजांत विद्युत् जनित्र फिरविण्यासाठी स्वतंत्र डीझेल एंजिन बसवितात. हे एंजिन बंद पडल्यास महत्त्वाच्या कामासाठी विजेचा पुरवठा नेहमी उपलब्ध असावा म्हणून एक विद्युत् घटमाला बसविलेली असते. दिवे लावण्यासाठी १२० किंवा २३० व्होल्टचा विद्युत् दाब वापरतात. पंखे आणि सुबाह्य विद्युत् उपकरणांसाठी १२० व्होल्टचा दाब वापरतात. चलित्रे चालविण्यासाठी २३० किंवा ४४० व्होल्टचा दाब वापरतात.

संदर्भ : 1. King, R. C. Practical Marine Engineering, Englewood Cliffs, N. J., 1956.

2. Seward, H. L. Marine Engineering, 2 Vols., New York, 1942–44.

ओगले, कृ. ह.; ओक, वा. रा.