नौकोद्वार : उथळ पाण्यात रुतून अडकलेल्या वा खोल पाण्यात बुडालेल्या जहाजाला उचलून पाण्याच्या पृष्ठभागावर पूर्ववत तरंगण्याच्या स्थितीत आणण्याचे कार्य. याकरिता जहाज कोणत्या कारणाने बुडले आहे व ते कोणत्या स्थितीत आहे याचा पूर्ण तपास करावा लागतो. जहाज सुस्थितीत असले, तरी एकंदर परिस्थितीचा विचार करून ते जहाज वर काढणे खर्चाच्या दृष्टीने फायद्याचे होईल किंवा नाही, हेही ठरवावे लागते.

उथळ पाण्यातील जहाज : पुष्कळ वेळा ओहोटी असताना जहाजाचा खालचा भाग पाण्याच्या तळावर टेकतो. त्यामुळे जहाज चालविता येत नाही. अशा जहाजाला भोक पडले नसेल, तर ते जहाज खोल पाण्यात ओढून नेण्यासाठी प्रथम मोठ्या ओढबोटींची (टगची) मदत घेतात. ओढबोटींची एंजिने जास्त शक्तिशाली असतात. त्यांच्या यांत्रिक रहाटाने रुतलेल्या जहाजाला दोर बांधून त्याला खोल पाण्याकडे ओढतात. बहुतेक वेळा ही पद्धत यशस्वी होते. ज्या ठिकाणी ओढबोटी मिळत नाहीत तेथे अडकलेल्या जहाजावरील सर्व नांगर जवळच्या खोल पाण्यात नेऊन टाकतात व त्यांना बांधलेले दोर अडकलेल्या जहाजावरील यांत्रिक रहाटांनी ओढतात. त्यामुळे अडकलेले जहाज खोल पाण्याकडे सरकते व तरंगू लागते. अशा पद्धतीने जहाज सुटले नाही, तरी दोरावरचा ताण तसाच कायम ठेवतात त्यामुळे भरतीच्या धक्क्याने जहाज किनाऱ्याकडे ढकलले जात नाही व पाणी वाढले, तर ते तरंगण्याची बरीच शक्यता असते. ज्या वेळी वरील कोणतीच पद्धत उपयोगी पडत नाही तेव्हा जहाजावरचे वजन कमी करण्याची पद्धत वापरतात. भरतीच्या वेळी पाण्याची पातळी कोठपर्यंत चढेल ते नीट पाहतात व त्या वेळी जहाज तरंगण्यासाठी त्यामधून किती वजन काढून घ्यावे लागेल त्याचा हिशोब करतात आणि तितके वजन काढून टाकतात. प्रथम जहाजातील सर्व पाणी पंपाने बाहेर काढतात. नंतर द्रव इंधन पंपाच्या साहाय्याने दुसऱ्या नौकेत भरतात आणि सर्व सुटा माल व सुवाह्य बाहेर काढून एखाद्या नौकेत घालून किनाऱ्याकडे नेतात. किनाऱ्याकडे माल पाठविता आला नाही, तर तो समुद्रात सोडून देतात. हे नुकसान नंतर उद्धार केलेल्या जहाजातून वसूल करतात. अशा प्रकारे वजन कमी झालेले जहाज भरतीच्या वेळी पाण्याची पातळी वाढली म्हणजे तरंगू लागते. जहाजातील सामान बाहेर काढण्यासाठी शक्य तेथे त्याच जहाजाची यारी वापरतात परंतु जरूर पडल्यास दुसऱ्या जहाजावरील यारीही वापरता येते. अशा प्रकारे वजन काढून टाकण्यापूर्वी अनेक नांगर पाण्यात टाकतात व ते जहाज नांगरांना नीट बांधून ठेवतात. ही काळजी घेतली नाही, तर हलके झालेले जहाज वाऱ्याने व भरतीच्या लाटांनी कोरड्या किनाऱ्याकडे फेकले जाते व त्याची सोडवणूक करणे अवघड होते.

चिखलात अडकलेल्या जहाजात भोक पडून पाणी शिरले असेल, तर प्रथम भोक बुजवून पंपाने पाणी काढून टाकावे लागते. भोक बुजविण्यासाठी जहाजाच्या आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने पुरेशी मोकळी जागा असली, तर वितळजोड (वेल्डिंग) पद्धताने पत्र्याचे ठीगळ जोडता येते, लोखंडी बोल्ट वापरून लाकडी पट्टीचे ठिगळ बसविता येते किंवा पोलादी जाळी बसवून सिमेंट भरता येते. लाकडी पट्टीचे ठिगळ लावताना तेलात भिजवलेल्या चिंध्यांचे भरण पारतात, त्यामुळे तो सांधा चांगला झिरपरोधक होतो. भोके बुजविण्याचे काम झाले म्हणजे आत साठलेले पाणी पंपाच्या साहाय्याने बाहेर काढतात. यासाठी जहाजावरचे पंप उपयोगी पडतात परंतु जरूर असल्यास दुसऱ्या जहाजावरील पंपांची मदत घेता येते. जहाजाच्या आत साठलेले पाणी कमी होत गेले म्हणजे जहाज हळूहळू तरंगू लागते. काही वेळा जहाजातील कोठीमध्ये भरलेले पाणी संपीडित (दाबयुक्त) हवा भरून काढून टाकता येते. यासाठी कोठीचे तोंड बंद करतात व त्यात संपीडित हवा सोडतात. बाहेरच्या पाण्याची उंची ३ मी. असेपर्यंत ०.५ किग्रॅ./सेंमी. दाबाची हवा आत सोडली, तर आतले पाणी नळाच्या मोरीतून बाहेर पडते परंतु बाहेरच्या पाण्याची उंची १० मी. पर्यंत असेल, तर हवेचा दाब १.५ किग्रॅ./सेंमी. पर्यंत वाढवावा लागतो. इतका दाब साधारण भिंतीचे पत्रे सहन करू शकत नाहीत. त्यामुळे ही पद्धत वापरावयाची असेल, तर प्रथम पत्र्यांच्या भिंती प्रबलित कराव्या लागतात. हवा भरण्यासाठी ओढबोटीवर किंवा उद्धारक जहाजावर मोठे संपीडक बसविलेले असतात. सर्व उपाय करून खडकात अडकलेले जहाज सुटले नाही, तर जहाजाच्या खालचा खडक फोडून जहाजाला वाट करून द्यावी लागते. या कामासाठी मोठे बुलडोझर वापरावे लागतात.

खोल पाण्यात बुडालेले जहाज : जहाज लहान असेल आणि १०० मी. पेक्षा कमी खोल पाण्यात बुडालेले असेल, तरच वर काढता येते. मोठे जहाज वर काढणे फार खर्चाचे असते म्हणून सबंध जहाज वर काढण्यापेक्षा त्यामध्ये अडकलेला मौल्यवान मालच वर काढतात. बुडालेली पाणबुडी किंवा लहान जहाज वर काढण्यासाठी संपीडित हवा, तरंगती यारी वा नावेसारख्या आकाराची मोठी बंदिस्त पोलादी पिंपे वापरावी लागतात. या पिंपाच्या भोवती फळ्यांचे लाकडी आवरण बसवलेले असते. बुडालेल्या जहाजाची दुरुस्ती करण्यासाठी मुद्दाम शिकवून तयार केलेले पाणबुडे कारागीर लागतात. प्रथम उद्धारक जहाजावरील संपीडित हवेची टाकी व बुडालेल्या जहाजावरील हवेची तोटी यांचा संबंध मजबूत रबरी नळीने जोडतात. नंतर बुडालेल्या जहाजाच्या कोठ्यांची झाकणे बंद करून त्यांत संपीडित हवा सोडतात. कोठ्या हवेने भरल्यावर तेथील पाणी बाहेर पडते व बुडालेले जहाज हलके होऊन वर येते. काही वेळा बुडालेल्या जहाजाच्या आकड्यांना तारदोर बांधतात व ते जहाज तरंगणाऱ्या दोन याऱ्यांनी वर ओढतात. काही वेळा चार किंवा आठ मोठ्या बंदिस्त पिंपात पाणी भरून ती पिंपे बुडालेल्या जहाजाच्या दोन्ही बाजूंकडे सोडतात आणि बुडालेल्या जहाजाला बांधून ठेवतात. नंतर या पिंपात संपीडित हवा भरतात. हवा भरली म्हणजे पिंपातील पाणी बाहेर पडते व पिंपे हलकी होतात व बुडालेल्या जहाजाला वर उचलून आणतात. ज्या ठिकाणी संपीडित हवा भरण्याची सोय नसते तेथे पाण्यावर तरंगणारी रिकामी पिंपे बुडालेल्या जहाजाला दोराने बांधून ठेवतात. भरतीच्या प्रवाहाबरोबर ही पिंपे किनाऱ्याकडे जातात व त्यांच्याबरोबर बुडालेले जहाज किनाऱ्याकडे ओढले जाते व उथळ पाण्यात येते.

ज्या वेळी बुडालेले जहाज एका बाजूवर कलंडलेले असते तेथे प्रथम त्या जहाजाला वळवून सरळ करावे लागते. यासाठी जहाजाच्या काही भागात संपीडित हवा भरतात व तेथील पाणी काढून टाकतात. काही वेळा जहाजाची पडलेली बाजू तरंगत्या यारीने दोर बांधून उचलतात व जहाज सरळ करतात.

उद्धाराचे काम करण्यासाठी ओढबोटी, तरत्या यारीची जहाजे, पोलादी पिंपे, संपीडक, रबरी नळ्या, साधे दोर, नांगर, सुवाह्य पंप, भोके पाडण्याची यंत्रे, वितळजोड करण्याचे साहित्य, बोल्ट, नट, पोलादी पत्रे, लाकडी फळ्या, भरणद्रव्ये असे विविध साहित्य लागते व ते हाताळणारे कुशल कामगार लागतात. त्यांना पाण्यात बुडण्याकरिता आवश्यक असणारे साहित्य लागते.

अशा प्रकारचे काम करणे फार धोक्याचे व अवघड असते. त्यामुळे सर्वसामान्य जहाज कंपन्या हे काम अंगावर घेत नाहीत परंतु न्यूयॉर्क, हॅलिफॅक्स, लिव्हरपूल, ग्लासगो, कोपनहेगन, व्हेनिस, टोकिओ व हाँगकाँग येथे अशा प्रकारचे काम करणाऱ्या मोठ्या कंपन्या आहेत. त्यांच्यामार्फत असे काम करवून घेता येते.

संदर्भ : Brady, E. M. Marine Salvage Operations, Cambridge, Md., 1959.

ओक, वा. रा.