कर्मकांड : मुळात कर्मविधायक वेदभागास ‘कर्मकांड’ अशी संज्ञा आहे. प्रत्येक धर्माचे जसे विशिष्ट तत्त्वज्ञान असते, तसेच प्रत्येक धर्माचे ठराविक असे कर्मकांड असते. हे कर्मकांड त्या त्या धर्माच्या प्रमाणभूत धर्मग्रंथांतून सांगितलेले असते. वेद, स्मृती, पुराणे व तंत्रागम हे हिंदूंचे प्रमाणभूत धर्मग्रंथ आहेत. मुसलमानांचा कुराण आणि ख्रिश्चनांचा बायबल हा प्रमाणग्रंथ आहे. हिंदुधर्मात मोक्ष हा श्रेष्ठ पुरुषार्थ म्हणून सांगितला आहे आणि त्याच्या प्राप्तीकरिता कर्ममार्ग, ज्ञानमार्ग व उपासनामार्ग असे तीन मार्ग सांगितले आहेत. ‘कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतं समा:’ (ईशावास्योपनिषद २) – ह्या लोकात कर्मे करीतच शंभर वर्षे जगण्याची इच्छा धरावी. ‘कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः’ (गीता ३⋅२०) – जनकादिक कर्मे करूनच सिद्धीस पावले. अशा प्रकारची कर्मकांडाची प्रशंसा करणारी पुष्कळ वचने उपलब्ध आहेत.

वेदकाळात यज्ञयागादी कर्मांना प्राधान्य होते. यज्ञाने देवतांना संतुष्ट करून आपले उद्दिष्ट प्राप्त करणे, हाच त्या काळचा धर्म होता. पुढे उपनिषत्कालात औपनिषदिक तत्त्वज्ञानाचा उदय झाला. त्यामुळे यज्ञयागादी कर्मांना गौणत्व प्राप्त होऊन ज्ञानकांडाला प्राधान्य मिळाले. परंतु आत्मज्ञान हे एकदम प्राप्त होत नाही. त्याकरिता वर्णाश्रमविरहित कर्मे करावीच लागतात. कर्मांच्या द्वारा चित्तशुद्धी झाल्यानंतर तो आत्मज्ञानाचा अधिकारी होतो. तात्पर्य कर्म हे आत्मज्ञानाचे साधन असल्यामुळे कर्मकांडाचे महत्त्व राहतेच. सामान्य मनुष्याला जन्मभर कर्मकांड करावेच लागते. 

कर्माचे प्रकार : नित्य, नैमित्तिक, काम्य व निषिद्ध असे कर्माचे चार प्रकार आहेत. संध्यावंदन, पूजा, पितृतर्पण तसेच स्वर्ग, यश, पुत्र यांची प्राप्ती, संकटहरण, रोगनिवारण इ. नित्य. नित्यकर्म ते केलेच पाहिजे, न केल्यास पाप लागते. ग्रहणातली उपवास, स्नान किंवा श्राद्ध इ. नैमित्तिक कर्मे होत. ग्रहण, श्राद्धतिथी इ. निमित्ते उपस्थित झाली म्हणजे, नैमित्तिक कर्मे करावयाची असतात. विशिष्ट फलाची कामना मनात धरून जी कर्मे केली जातात ती काम्यकर्मे होत. उदा., स्वर्ग, यश, पुत्र, वृष्टी, संकटनाश, रोगनिवारण इ. उद्देशांनी करावयाची कर्मे. यज्ञ, तीर्थयात्रा, सत्यनारायण, नवस इ. कर्मे विहित असून त्यांनी पुण्यप्राप्ती होते. सुरापान, स्तेय, परस्त्रीगमन इ. निषिद्ध कर्मे केल्यास पाप लागते. म्हणून निषिद्ध कर्मे करू नयेत. कोणी ‘दैव’ देवांकरिता व ‘पित्र्य’ पितरांकरिता असे दोनच विहित कर्माचे प्रकार मानतात. कोणी प्रमाणभूत धर्मग्रंथांना अनुसरून श्रौत म्हणजे वेदोक्त, स्मार्त म्हणजे स्मृतिविहित व पौराण म्हणजे पुराणोक्त असे कर्माचे तीन प्रकार मानतात. श्रौत – यज्ञयागादी स्मार्त – देवपूजा, श्राद्ध इ. आणि पौराण – तीर्थयात्रा, व्रतादी कर्मे होत. 

कर्मकांड हे सर्व धर्मांच्या संप्रदायांत असते. उदा., ख्रिस्ती धर्मात चर्चमध्ये नियमाने जाणे, प्रार्थना करणे, बायबलचे पठण करणे, पवित्र स्थानांचे दर्शन घेणे इत्यादी. इस्लाम धर्मात मशिदीत ठराविक दिवशी जाणे, प्रार्थना करणे, हाजयात्रेस जाणे, कुराण पढणे, विशिष्ट कालात उपवास करणे इत्यादी बौद्ध धर्मात मंत्रोच्चार करणे, मठात राहणे, भिक्षू होऊन भिक्षा मागणे, धर्मप्रचार करणे इत्यादी. 

कर्म केले म्हणजे त्याचे फळ मिळतेच. त्या फळाच्या उपभोगाकरिता पुन्हा जन्मही घ्यावा लागतो. ‘कर्मणा बध्यते जन्तुर्विद्यया तु प्रमुच्यते’. कर्माच्या योगाने प्राणिमात्र बंधनात पडतो, ज्ञानाने मुक्त होतो. ज्याला मुक्त व्हावयाचे असेल, त्याने कर्मकांडात रममाण न होता आत्मज्ञानाकरिता प्रयत्न करावा. 

जोशी, रंगनाथशास्त्री