कॅपॅरिडेसी : (वरुण कुल). आवृत्तबीज (बंदिस्त बीज असलेल्या) वनस्पतींपैकी (द्विदलिकित वर्गातील) ऱ्हीडेलीझ या गणात या कुलाचा अंतर्भाव होतो यात सु. ४५ वंश व ७०० जाती असून त्या उष्ण, उपोष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत आढळतात. या वनस्पती ओषधी [→ ओषधी], लहानमोठी क्षुपे (झुडपे), काही वेली व वृक्ष आहेत. पाने साधी किंवा संयुक्त, हस्ताकृती, सोपपर्ण (उपपर्णासह) किंवा अनुपपर्ण (उपपर्णे नसलेली) कधी उपपर्णांचे काट्यांत रुपांतर होते. काही जाती रूक्ष जागी वाढणाऱ्या असून पर्णहीन असतात [→ नेपटी], तर काहीत दृढसूत्रे (लांबट, बारीक व भित्ती जाड असलेल्या पेशींनी तयार झालेले परिकाष्ठातील धागे] किंवा घन कोशिका (रुंदीपेक्षा फारशा लांब नसलेल्या, लिग्निनयुक्त जाड भित्तीच्या पेशी) असतात. फुले बहुधा अरसमात्र, द्विलिंगी, चतुर्भागी, अवकिंज आणि मंडलित पुष्पदलांची असून एकेकटी किंवा अकुंठित फुलोऱ्यात येतात. क्वचित प्रदले नसतात केसरदले काहींत अनेक [→ वागाटी] किंजमंडलाखाली व केसरदलांच्यावर अक्षाचा लांबट भाग (किंजधर) अनेकदा आढळतो [→ काबरा] किंजदले दोन, जुळलेली किंजपुट ऊर्ध्वस्थ व त्यातील एकच कप्प्यात अनेक बीजके तटलग्न असतात (→ फूल). फळ विविध प्रकारचे, शुष्क किंवा मांसल बी बहुधा मूत्रपिंडाकृती व पुष्क (वाढणाऱ्या गर्भाचे पोषण करणारा अन्नद्रव्ययुक्त भाग) फार थोडे⇨ क्रुसिफेरी, _पॅपॅव्हरेसी व फ्यूमॅरिएसी या त्याच गणातील इतर कुलांशी या कुलाचे जवळचे नाते आहे. नेपटी, तरटी, काबरा, तिळवण व वायवर्णा ही औषधी आहेत गोविंदफळ, तरटी, वागाटी इ. खाद्य आहेत.
घवघवे, ब. ग.
“