कालिदास : ‘कविकुलगुरू’ म्हणून गौरविला गेलेला संस्कृतातील श्रेष्ठ महाकवी. त्याची चरित्रविषयक माहिती फारशी उपलब्ध नाही आणि त्याच्या कालासंबंधीही वाद आहेत. डॉ. कुन्हन राजा ह्यांच्या मताप्रमाणे तो इ.स. पू. दुसऱ्या शतकात होऊन गेला असावा. इ.स.पू. पहिले शतक हा त्याचा काळ असावा, असे चिंतामणराव वैद्यांचे मत. सर रामकृष्ण गोपाळ भांडारकरांसारख्या अनेक भारतीय विद्वानांना तो इ.स.चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेला असावा, असे वाटते. बहुतेक यूरोपीय विद्वानांचे मतही असेच आहे. मॅक्स म्यूलर ह्याच्या मते तो इसवी सनाच्या सहाव्या शतकात होऊन गेला. इ.स.चौथ्या शतकाचा उत्तरार्ध आणि पाचव्या शतकाचा आरंभ ह्या कालखंडात केव्हा तरी कालिदास होऊन गेला असावा, असा विचार डॉ. वा. वि. मिराशी ह्यांनी मांडला आहे. कालिदासाच्या जन्मस्थळासंबंधीही निर्णायकपणे काहीच सांगता येत नाही. बंगाल, काश्मीर, विदिशा, मंदसौर, उज्जैन अशा अनेक प्रदेशांचा आणि शहरांचा निर्देश कालिदासाची जन्मभूमी म्हणून केला जातो. तथापि उज्जैन शहराविषयी त्याच्या साहित्यातून व्यक्त झालेले उत्कट प्रेम लक्षात घेता तेथेच त्याचा जन्म झाला असावा, असे मानण्याकडे अनेक विद्वानांचा कल आहे.
कालिदासाच्या व्यक्तिमत्त्वाभोवती अनेक दंतकथा गोळा झाल्या आहेत. काही दंतकथांनी त्याला विक्रमादित्याच्या किंवा भोजराजाच्या नवरत्नांत नेऊन बसविले आहे. एका दंतकथेनुसार तो मुळात मठ्ठ व निरक्षर होता. एका हट्टी राजकन्येची खोड मोडण्यासाठी रचलेल्या कपटनाटकानुसार कालिदासाचे तिच्याशी लग्न लावून देण्यात आले. ते कपट उघडकीस आल्यावर कालिमातेचा वरदहस्त मिळवून कालिदास महापंडित झाला आणि त्या राजकन्येने ‘अस्ति कश्चित् वाग्विशेष:’ (आपल्या वाणीत काही फरक झाला काय?) असे विचारताच, कुमारसंभव, मेघदूत व रघूवंश ही तीन काव्ये त्याने तिला उस्फूर्तपणे म्हणून दाखविली. पुढे त्या राजकन्येचा पत्नी म्हणून स्वीकार न केल्यामुळे तिने त्याला दिलेल्या शापानुसार कालिदासाचा अंत एका वेश्येच्या हातून झाला. कालिदासाने केलेल्या समस्यापूर्तीच्या अनेक कल्पितकथा भोजप्रबंध ह्या ग्रंथात आहेत. कालिदास हा राजकवी असावाच तथापि तो राजाचा प्रकृति–पुरुष अधिकारीही असण्याचा संभव आहे.
रघुवंश व कुमारसंभव ही महाकाव्ये,ऋतुसंहार व मेघदूत ही खंडकाव्ये आणि मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय व अभिज्ञानशाकुंतल ही नाटके त्याने लिहिली. यांशिवाय कुंतलेश्वरदौत्य ह्या नावाचा एक ग्रंथ त्याने लिहिला होता, असे क्षेमेंद्राच्या औचित्यविचारचर्चेतील एका विधानावरून दिसते. कुंतलेश्वरदौत्य हा ग्रंथ आज अनुपलब्ध आहे. इतर सात ग्रंथ संस्कृत साहित्याची भूषणे आहेत. त्यातून एका समृद्ध संस्कृतीचे, अभिजात कलाविलासाचे आणि उन्नत सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब उमटलेले आहे. वेद, उपनिषदे, भगवद्गीता, रामायण, महाभारत इ. प्राचीन साहित्य, षड्दर्शने व इतर विविध शास्त्रे, संगीत, नृत्य, चित्रादी ललित कला यांचे मर्मदर्शी उल्लेख त्याच्या साहित्यात आढळतात त्यावरून विद्वत्ता आणि रसिकता ह्यांचा मनोज्ञ संगम त्याच्या व्यक्तिमत्त्वात झाला होता, हे स्पष्ट दिसते. शृंगार आणि करूण ह्या दोन रसांचा परिपोष कालिदासाच्या साहित्यकृतींत प्रामुख्याने आढळतो. वर्ण्य विषयातील सौंदर्य अचूक हेरून ते मोजक्या शब्दांत व्यक्त करणे, हे त्याचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. संस्कृत साहित्यशास्त्रातील परिभाषेप्रमाणे कालिदासाची शैली किंवा रीती वैदर्थी ठरते. दीर्घ समास आणि कठोर वर्ण तीत सामान्यत: आढळत नाहीत. विविध भाषालंकार त्याच्या काव्यनाटकांत आढळतात. विशेषत: त्याच्या उपमांतील तरल सौंदर्यामुळे ‘उपमा कालिदासस्य’ ही एका सुभाषितकाराची तत्संबंधीची गौरवोक्ती रूढ झालेली आहे. उपमांचे एक वैविध्यपूर्ण विश्व कालिदासाने आपल्या साहित्यकृतींतून उभे केले आहे. विविध प्रकृतींच्या व्यक्तींचे मार्मिक स्वभावचित्रण करण्याचे त्याचे कौशल्यही फार मोठे आहे. अभिज्ञानशाकुंतलातील दुष्यंत, शकुंतला प्रियंवदा मेघदूतातील यक्ष आणि यक्षपत्नी मालविकाग्निमित्रातील मालविका, धारिणी व इरावती रघुवंशातील सुदक्षिणा ही त्याच्या उत्कृष्ट व्यक्तिरेखनाची काही उदाहरणे. तथापि त्याच्या मानसपुत्रांपेक्षा त्याच्या मानसकन्याच विशेष प्रभावी वाटतात. जिवंत निसर्गचित्रण हे कालिदासाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. त्या द्दष्टीने त्याचे ऋतुसंहार हे काव्य म्हणजे निसर्गाचा एक सौंदर्यपटच आहे. अभिज्ञानशाकुंतलातील निसर्ग तर नाटकातील एक पात्र ठरावे अशा सचेतनपणे अवतरलेला आहे. कुमारसंभवात आणि रघुवंशात केलेल्या नद्या, पर्वत, वृक्ष, पशू, पक्षी इत्यादिकांच्या चित्रणात कल्पकताही जाणवते. मेघदूतातील निसर्गवर्णनेही सूक्ष्म सौंदर्यद्दष्टीची द्योतक आहेत. तथापि निसर्गाच्या सौम्य व मृदू रूपाचाच त्याला मोह आहे. कुमारसंभवातील हिमालयाच्या वर्णनातूनही हिमालयाचे ‘देवतात्म’ आणि ‘अनंतरत्नप्रभव’ असे रूपच मनावर ठसते. निसर्गवर्णनाला पुढील संस्कृत साहित्यात सामान्यत: जो सांकेतिकपणा आला, तो कालिदासाच्या वर्णनांतून आढळत नाही. जीवनाकडे आनंदी आणि खेळकर द्दष्टिकोणाने पाहण्याच्या वृत्तीतूनच त्याचा ह्रद्य विनोद फुललेला आहे. अभिज्ञानशाकुंतलातील प्रियवंदा ही त्या द्दष्टीने लक्षात राहणारी एक व्यक्तिरेखा. कालिदासाच्या विदूषकांनी केलेल्या राजांच्या थट्टेतून निर्माण होणारा विनोद मात्र बोचरा आणि तत्कालीन राजजीवनावर प्रकाश टाकणारा आहे.
जीवनाच्या रौद्रभीषण अनुभवांपासून मात्र हा सौंदर्यान्वेषी कवी दूरच राहिलेला आहे. साहित्यिक या नात्याने त्याच्या व्यक्तिमत्त्वाची मर्यादा म्हणूनही ह्या वस्तुस्थितीचा निर्देश करण्यात येतो. शृंगारवर्णनांच्या संदर्भात त्याच्यावर अश्लीलतेचा आरोपही काही टीकाकारांकडून केला जातो. तथापि कालिदासाच्या वाङ्मयीन गुणवत्तेच्या तुलनेने हे दोष गौण ठरतात.
कालिदासाला जागतिक कीर्ती लाभली. सर विल्यम जोन्सने त्याला ‘भारताचा शेक्सपिअर’ ही पदवी बहाल केली. गटे, श्लेगेल, हंबोल्ट ह्यांसारख्या पश्चिमी साहित्यश्रेष्ठींनी कालिदासाच्या प्रतिभेची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे.
पहा : अभिज्ञानशाकुंतल कुमारसंभव मालविकाग्निमित्र मेघदूत रघुवंश विक्रमोर्वशीय.
संदर्भ :
1. Keith, A. B. The Sanskrit Drama, London, 1924.
२.कंगले, र.पं.कालिदासाची नाटके, मुंबई, १९५७.
३. भट, गो. के. कालिदास–दर्शन, पुणे, १९६८.
४. मिराशी, वा. वि. कालिदास, आवृ. दुसरी, पुणे, १९५७.
भट, गो. के.