कालहस्ती : ( श्रीकालहस्ती). आंध्र प्रदेशाच्या चित्तूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठाणे. लोकसंख्या ३४,७३५ (१९७१). हे नागरी टेकड्यांच्या उत्तर टोकाला, स्वर्णमुखी नदीच्या उजव्या तीरावर, चित्तूरपासून ८८ किमी. ईशान्येस असून ते काटपाडा–गुडूर रेल्वेफाट्यावर तिरुपतीपासून ३५ किमी. आहे. संत कण्णप्पाचे जन्मस्थान असलेले हे गाव पूर्वी एका मोठ्या जहागिरीचे मुख्य ठिकाण होते. गावाजवळील एका उंच खडकाच्या पायथ्याशी कालहस्तीश्वराचे वास्तुशिल्पासाठी प्रसिद्ध असलेले शिवालय असून महाशिवरात्रीला तेथे एक लाखापर्यंत यात्रा भरते. जवळच्या नागरी टेकड्या तिरुपती डोंगराचा भाग म्हणून पवित्र मानण्यात आल्याने तेथून दगड, वाळू काढण्यास मनाई आहे. भात सडणे, तेल गाळणे, काचेच्या बांगड्या, तांब्यापितळेच्या वस्तू व कलमकारी रंगकामाचे हातछपाईचे कापड यांसाठी हे प्रसिद्ध आहे.

ओक, शा. नि.