कॅक्टेसी : (नागफणा कुल कंथारी कुल). फुलझाडांपैकी (द्विदलिकित वर्गातील) कॅक्टेलीझ ह्याप्रारंभिक गणातील एकमेव कुलाचे नाव. या कुलाचे ⇨निंफिएसी कुलाशी जवळचे नाते आहे. ह्याकुलामध्ये विलिस यांच्या मताप्रमाणे एकूण सु. ५०–१५० वंश व २,००० जाती असून बहुतेक सर्वअमेरिकेतील (विशेषत: मेक्सिको, ब्राझील) आणि काही इतर खंडांतील रुक्ष प्रदेशांत आढळतात. त्याबहुतेक सर्व मांसल व काटेरी ओषधी [→ ओषधि], क्षुपे (झुडपे), क्वचित वेली व वृक्षही आहेत. काहीअपिवनस्पती (दुसऱ्या वनस्पतींच्या पानांच्या देठांचा आधार घेणाऱ्या पण त्यांच्यावर उपजीविका न करणाऱ्या वनस्पती) आहेत (उदा., ऱ्हिप्सॅलीस, एपिफायलम व फायलोकॅक्टस). खोड फार लहान किंवा ते २० मी. उंचीपर्यंत मोठे (उदा., सेरियस जायगँशियस), हिरवे, सपाट किंवाकोनीय, धारायुक्त किंवा दंडाकृती असते पाने साधी, एका आडएक, मांसल (उदा., पेरेस्किया) अथवा खवल्यासारखी असूनकधी ती मुळीच नसतात [पर्णकांड, → खोड]. खोडावर अनेकदालहान उंचवट्यांवर राठ केस व पानांचे रूपांतरीत काटे असतात.फुले अवृंत (बिनदेठाची), द्विलिंगी, अपिकिंज, अरसमात्र, मोठी, बहुधा एकेकटी किंवा फुलोऱ्यात (परिमंजरी, कणिश) येतात.नलिकाकृती पुष्पासनावर सर्पिल, सारखी, असंख्य व सुटीपरिदले असून संदलांतून प्रदलांकडे संक्रमण आढळते व बहुधासुंदर रंगसंगतीही दिसते. केसरदले असंख्य व सर्पिल आणि केसरतंतू विविध किंजदले अनेक व जुळलेली किंजपुट अध:स्थ, बीजके अनेक वतटलग्न [→ फूल] मृदुफळ क्वचित शुष्क, काटेरी व अनेकबीजी बियांवर पंख किंवा सूक्ष्म खाचा असतात.
खोडांच्या आकार वैचित्र्याने व सुंदर फुलांमुळे अनेक जाती शोभे करिता लावतात. काहींची फळे खाद्य व काहींची खोडे, फुले आणि फळे औषधी आहेत. मोठ्या जाती. (उदा., सेरियस ग्रँडिफ्लोरस) कुंपणाकरिता लावतात.⇨निवडुंग व ⇨नागफणा या जाती भारतात सामान्यपणे आढळतात. ज्या कोचिनीयल किड्यांपासून तांबडा रंग मिळतो, त्यांचे भक्ष्य असलेला निवडुंग (नोपालिया कॉक्सिनेलिफेरा) उष्णकटिबंधातील देशांत लागवडीत आहे. भारतात याची लागवड यशस्वी झालेली नाही तथापि बागेत लावलेला कोठे कोठे आढळतो. सेरियस, सेलेनिसेरियस, पेरेस्किया, र्हिप्सॅलीस, एपिफायलम इ. वंशांतील जाती बागेत शोभेकरिता लावतात.
परांडेकर, शं. आ.
“