कँटरबरी : आग्नेय इंग्लंडमधील केंट परगण्यातील जुन्या संस्कृतीचे शहर. लोकसंख्या ३३,१५७ (१९७१). हे स्टौर नदीकाठी असून लंडनच्या आग्नेयीस ८८ किमी. व डोव्हरच्या वायव्येस २५·६ किमी. आहे. रोमन काळात हे महत्त्वाचे केंद्र होते. त्यावेळचे सेंट मार्टिन्स चर्च सर्वांत जुने असून त्यास ‘मदर चर्च ऑफ इंग्लंड’ म्हटले जाते. ५९७ मध्ये सेंट ऑगस्टीनने येथे मठ स्थापून इंग्लंडमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसाराची सुरुवात केली. तोच इंग्लंडमधील पहिला आर्चबिशप. म्हणूनच इंग्लंडच्या प्रमुख धर्मप्रमुखाचे स्थान अद्यापिही येथेच आहे. बाराव्या शतकात येथील आर्चबिशप सेंट टॉमस बेकेट याचा खून झाल्याने कँटरबरीला मध्ययुगात तीर्थक्षेत्राचे महत्त्व आले. इंग्लिश साहित्यातही त्याला स्थान मिळाले. जुने कॅथीड्रल अनेक वेळा जळाले, पडले सध्याचे कॅथीड्रल भव्य असून निरनिराळ्या कालखंडातील वास्तुशिल्पांचे ठसे त्यावर उमटलेले दिसतात. येथे अनेक चर्च असून येथील इ. स. ६०० मध्ये स्थापन झालेले ‘किंग्ज स्कूल’ प्रसिद्ध आहे.
शाह, र. रू.