कबीरपंथ : मध्ययुगीन भारतातील एक भक्तिमार्गी धार्मिक पंथ. स्वतः कबीराने ह्या पंथाची स्थापना केल्याबाबतचा निश्चित पुरावा उपलब्ध नाही. कबीरपंथीय अनुयायी मात्र कबीरानेच स्वतः हा पंथ स्थापन केला असे मानतात. कबीर हा हिंदू की मुसलमान हा विवाद्य प्रश्न असल्याकारणाने, ह्या पंथास हिंदू अथवा इस्लामी धर्मपंथ म्हणता येत नाही.
विभूती व कवी म्हणून कबीराचे स्थान अनन्यसाधारण असल्याकारणाने स्वाभाविकच त्याच्या भोवती फार मोठा शिष्यसमुदाय जमला. कबीराच्या पश्चात त्याच्या शिष्यांनी त्याच्या शिकवणुकीच्या प्रसारार्थ अनेक पंथोपपंथ सुरू केले तसेच त्याच्या काव्याचा व वचनांचा संग्रह करून त्याच्या तत्त्वांचा व विचारांचा प्रसार करण्याची मोहीम हाती घेतली. जनमानसातील कबीराचे स्थान अत्यंत आदराचे असल्यामुळे, ह्या पंथांना चांगला प्रतिसाद मिळून त्यांचा झपाट्याने प्रसार झाला.कबीर पंथ म्हणून सांगितल्या जाणाऱ्या अनेक पंथोपपंथांतील आचार-विचारांमध्ये फारशी एकवाक्यता आढळत नाही.
पंथोपपंथ : अनुरागसागर (सु. अठरावे शतक) ह्या ग्रंथामध्ये कबीराच्या बारा उपपंथप्रवर्तकांची नामावळी आलेली आहे. वास्तविक भारतातील विविध प्रांतांत यापूर्वीच वेगवेगळे कबीर पंथोपपंथ स्थापन होऊन स्थिरस्थावर झालेले होते आणि त्यांच्यात स्पर्धा-संघर्षही चालू होते. आधीच्या कबीरपंथीय साहित्यात कबीराने आपले चत्रभुज, बंकेजी, सहतेजी व धर्मदास हे चार प्रमुख शिष्य स्वमतप्रसारार्थ भारताच्या वेगवेगळ्या भागांत पाठविले होते असा उल्लेख आहे. या चार शिष्यांपैकी धर्मदासाव्यातिरिक्त कोणाचीच माहिती मिळत नाही. धर्मदासाने मात्र पंधराव्या शतकाच्या अखेरीस मध्य प्रदेशात बांधोगढ येथे ‘धर्मदासी’ अथवा ‘छत्तीसगढी’ नावाची कबीरपंथीय शाखा स्थापन केल्याचे दिसते. तात्पर्य, वरील बारा अथवा ह्या चार शिष्यांची आणि त्यांनी स्थापिलेल्या पंथोपपंथांची माहिती निश्चित पुराव्याअभावी संपूर्णपणे विश्वासार्ह मानता येत नाही.
धर्मदासी शाखेच्या अनेक उपशाखा आहेत. धर्मदास हा चारित्र्यसंपन्न व विद्वान होता. त्याच्या नावावर बरीच ग्रंथसंपदा आढळते. ‘कबीर-चौरा’ अथवा ‘काशी शाखा’ नावाची आणखी एक प्रसिद्ध शाखा काशी येथे आहे. तिची स्थापना सुरतगोपाल नावाच्या कबीरशिष्याने केली. तेथे सध्या पंथाचा मठ असून दरवर्षी यात्रा भरते आणि नवीन लोकांना कबीर पंथाची दीक्षा दिली जाते. यांव्यतिरिक्त बिहारमध्ये धनौती येथे ‘भगताही’ अथवा ‘धनौती’ नावाची शाखा भागोदास अथवा भगवान गोसाई याने सुरू केली. ओरिसात कटक येथे साहेबदासी नावाची, काठेवाडात मूलनिरंजन पंथ नावाची, बडोदे येथे टकसारी पंथ, भडोच येथे जीवा पंथ ह्या नावाच्या आणखी उल्लेखनीय शाखा आहेत. सत्यकबीर, नामकबीर, दानकबीर, मंगलकबीर, हंसकबीर, उदासीकबीर असे आणखीही काही उपपंथ कबीराच्याच नावे चालविले जातात. तसेच दक्षिणेत कमाल, नित्यानंद व कमलानंद ह्या कबीरपंथीयांच्या नावावर चालणारे उपपंथ असल्याचे कळते. कमाल हा कबीराचा पुत्र व शिष्य असल्याचे तसेच त्याने अहमदाबाद, पंढरपूर इ. दक्षिणेकडील प्रदेशांत कबीर पंथाचा प्रचार केल्याचे सांगतात. बिहारमध्येही धनौतीशाखेतून निघालेल्या आणखी दोन उपशाखा असल्याचे सांगतात तर धर्मदासाच्या उपशाखा नेपाळ, सिंध व सिक्कीममध्ये असल्याचे पंथीय लोक सांगतात.
साहित्य व तत्त्वज्ञान : पंथीय साहित्यात कबीर-बीजक वा बीजक, कबीरमन्शूर, अनुरागसागर, सुखनिधान, निरंजनबोध ह्या ग्रंथांचा समावेश असून बौद्ध जातककथांसारख्या काही कथांचा संग्रहही आहे. कबीरमन्शूर ह्या ग्रंथास पंथात विशेष प्रमाण मानले जाते, तर कबीरबीजक ग्रंथास पंथीयांच्या नित्यपूजेत स्थान मिळाले आहे. स्वतः कबीराने स्वानुभवजन्य ज्ञानाला विशेष महत्त्व देऊन शब्दप्रामाण्य त्याज्य ठरविले व ‘स्वसंवेद्य’ (स्वसंवेद) सत्याची महती सांगितली. जीव प्रथम आपल्या ‘हंसा ’ नावाच्या मूळ स्वरूपात होता. तो पक्क्या पाच तत्त्वांचा बनला होता परंतु आनंदमयत्वामुळे हंसाला आत्मविस्मृती झाली आणि परिणामी त्याचा देह कच्च्या तत्त्वांचा बनला. पक्क्या पंचतत्त्वांपासून कच्ची पंचमहाभूते निर्माण झाली. तसेच प्रकृतीही पंचवीस कच्च्या तत्त्वांत परिणत पावली. हंसा स्वतःच्या सौंदर्याने आनंदविभोर होऊन शून्यात पहात असताना, त्याची छाया स्त्रीरूपात त्याला दिसली. स्त्रीरूपी छायेशी हंसाचा संयोग होऊन त्यातून विश्व निर्माण झाले. हा मायाब्रह्माचा संयोग आहे. अशा प्रकारे सूक्ष्मातून स्थूलात परिणत पावलेल्या आणि आत्मविस्मृतीत पडलेल्या हंसास पुनश्च मूलस्थिती कशी प्राप्त होईल, यावर कबीराने ‘स्वसंवेद’ हा उपाय सांगितला आहे. स्वसंवेद म्हणजे स्वतःच्या मूळ रूपाचे ज्ञान होणे, स्वसंवेदामुळेच जीवाला द्वैताकडून अद्वैताकडे जाता येते. वासना शिल्लक असेपर्यंत खऱ्या अद्वैताकडे त्याला जाता येत नाही व मुक्तीही लाभत नाही. मुक्तीसाठी सद्गुरू लाभावा लागतो. ती मुक्ती मिळवून देण्याचे सामर्थ्य कबीरातच आहे आणि म्हणून तो खरा सद्गुरू होय. कबीर-बीजक ग्रंथात कबीराच्या मूळशिकवणुकीचा आणि तात्त्विक विचारांचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात यथायोग्य संग्रह केलेला आहे.
आचार : हिंदू तसेच मुसलमान स्त्रिया ह्यांचा या पंथात समावेश आहे. मूर्तिपूजेला तसेच वेदाध्ययन, तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, स्पृश्यास्पृश्य, कर्मकांड या गोष्टींना त्यात स्थान नाही. पांढऱ्या रंगाची उंच टोपी, कपाळावर गंधाचे तीन टिळे, गळ्यात १०८ मण्यांची तुळशीमाळा, कबीर-बीजक ह्या ग्रंथाची नित्य पूजा, असा त्यांचा वेश व नित्यक्रम असतो. क्षमा, संतोष, विचार आणि सत्संग यांची मुक्तीसाठी नितांत आवश्यकता असल्याची पंथीयांत दृढ श्रद्धा आहे. स्वतः कबीर जातिभेदांविरुद्ध होता परंतु पंथात खालच्या जातीतील लोक येऊ नयेत, असे त्याच्या शिष्यांचे धोरण दिसते. त्या त्या पंथ अथवा शाखाप्रमुखास महंत म्हणतात.दीक्षा घेणाऱ्याचे प्रथम मुंडन करतात व डोक्याच्या मध्यभागी केसाची एक बट राखून ठेवतात ही बट स्वतः महंत कापून टाकतो. नंतर होम करतात, महंत त्याला आपले वस्त्र देतो आणि नंतर भोजनसमारंभ होतो. दीक्षितास आपले घरदार सोडून मठवास पतकरावा लागतो आणि गुरूची सेवा करावी लागते. महंत आपल्यामागे महंतपदावर एखाद्या चेल्याची (शिष्याची) आधीच नियुक्ती करून ठेवतो.
महंतांचे संन्यासी व गृहस्थ असे दोन वर्ग आहेत. संन्यासी महंतास पर्वत अशी तर गृहस्थ महंतास गीर, अतिथी, पुरी किंवा भारथी अशा उपाध्या आहेत.गृहस्थ ⇨गोसावी-बैराग्यांप्रमाणेच ह्या उपाध्या आहेत. ते सहकुटुंब आपल्या मठात राहतात. संन्यासी कबीरपंथीयांहून यांचा दर्जा हीन मानला जातो. कबीरपंथात – विशेषतः धर्मदासी शाखेत ‘चौकाविधी’, ‘जोतप्रसाद’, ‘परवाना’, इ. विधींना फार महत्त्व आहे. तंत्रमार्गाचा हा प्रभाव असावा.
वर्तमानकालीन कबीर पंथाचे स्वरूप अन्य विविध भक्तिमार्गी वैष्णव पंथांहून तसेच नाथ पंथाहूनही फारसे भिन्न आढळत नाही. कारण इतर भक्तिमार्गी वैष्णव पंथांचा आणि नाथ पंथाचा ह्या पंथोपपंथांवर पुढे बराच प्रभाव पडला.
कबीर, नानक इ. संतांचे त्यांच्यानंतर विशिष्ट असे वेगळे संप्रदाय बनले असले, तरी हिंदू व मुसलमान हे धर्मभेद, खालच्या पायरीवरची धार्मिक स्थिती होय,असे कबीराचे मत होते. उच्च धार्मिक अनुभव व पराभक्ती ही हिंदू व मुसलमान यांच्या धर्मभेदाच्या पलीकडची व सर्वांना व्यापणारी गोष्ट आहे. धर्मपंथांतील अहंताव भेदभाव यांना उच्च धर्मात स्थान नाही, अशी उच्च विचारसरणी प्रसृत करण्यात कबीर, नानक इ. मध्ययुगीन भारतीय संतांची थोरवी दिसून येते. राम व रहिम एकच, असे कबीराने उच्चरवाने सांगितले.
संदर्भ : 1. Westcott, G. H. Kabir and Kabir Panth, Calcutta, 1953.
२.चतुर्वेदी, परशुराम, उत्तरीभारतकीसंत-परंपरा, अलाहाबाद, १९६४.
३.द्विवेदी, केदारनाथ, कबीरऔरकबीरपंथ:तुलनात्मकअध्ययन, अलाहाबाद,१९६५.
सुर्वे, भा. ग.