कबाबचिनी : ( सितलचिनी , कंकोळ इं.क्युबेब लॅ.क्युबेबाऑफिसिनॅलिस कुल-पायपरेसी). या नावाची सुकी फळे बाजारात मिळतात.ती ज्या वेलीपासून मिळतात ती मूळची ईस्ट इंडीजमधील असून जावा , थायलँड , श्रीलंका , वेस्ट इंडीज इ.प्रदेशांत तिची लागवड करतात.
भारतात तिची लागवड विशेषतः कर्नाटकामध्ये होते. ही वनस्पती मिरीच्या वंशातील एक जाती असल्याने त्यांचे अनेक लक्षणांत साम्य आहे. [→मिरे].अश्मगर्भी( आठळीयुक्त) फळे मिरीसारखी पण लांब देठाची असून अपक्व असताना सुकवून ठेवतात. ती उदी रंगाची व वावडिंगापेक्षा किंचित मोठी असतात.त्यांत ४ – १३% बाष्पनशील( उडून जाणारे) तेल व क्युबेबीन हे अल्कलॉइड असते.फळाला कंकोळ असेही म्हणतात व तो पानाच्या विड्यात घालतात.तो कडवट , तिखट व उग्र वासाचा असून सुगंधी द्रव्ये , मसाले , व औषधे यांत वापरतात.कफ व परमा यांवर तो गुणकारी असतो.
पहा : पायपरेसी.
वैद्य, प्र.भ.
“