कार्बन टेट्राक्लोराइड : एक कार्बनी संयुग. सूत्र CCl4. क्लोरोफॉर्मावर सूर्यप्रकाशात क्लोरिनाची विक्रिया करून हे संयुग बनते, असे रेनॉल्ट या शास्त्रज्ञांस १८४० मध्ये आढळून आले.
उत्पादन : (१) कार्बन डायसल्फाइडावर क्लोरिनाची विक्रिया करून हे संयुग मिळते. ही विक्रिया आयोडीन किंवा ॲल्युमिनियम क्लोराइड यांच्या उत्प्रेरणाने (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविण्याच्या क्रियेने) सुलभतेने घडून येते. (२) मिथेनावर क्लोरिनाची विक्रिया करूनही हे मिळते. मिथेल व क्लोरीन यांची विक्रिया अत्यंत उष्मादायी (उष्णता बाहेर टाकणारी) असल्यामुळे योग्य त्या प्रमाणात या वायूंचे मिश्रण करून व अवश्य तेवढे तापमान राखून, या विक्रियेपासून मिथिल क्लोराइड (CH3CL), मिथिलीन क्लोराइड (CH2Cl2), क्लोरोफॉर्म (CHCl3) व कार्बन टेट्राक्लोराइड ही द्रव्ये आवश्यकतेप्रमाणे कमीजास्त प्रमाणात मिळविता येतात. या विक्रियेत हायड्रोक्लोरिक अम्ल हा एक उपपदार्थ तयार होतो. त्याचा उपयोग करून घेता आला, तर ही कृती उत्पादनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.
कार्बन व क्लोरीन यांची सरळ सरळ विक्रिया घडवून आणून हे संयुग बनविण्याचे प्रयत्न झालेले आहेत, तथापि अशा कृती अद्याप व्यवहारात आणण्याइतक्या यशस्वी झालेल्या नाहीत.
गुणधर्म : वर्णहीन द्रव्य क्लोरोफॉर्मासारखा गंध ज्वालाग्राही नाही वितळबिंदू – २२·९६० से. उकळबिंदू ७६·८० से. वि. गु. १·५९४ पाण्यात अविद्राव्य (विरघळत नाही) अल्कोहॉल आणि ईथर यांमध्ये विद्राव्य.
क्लोरोफॉर्म, ट्रायक्लोर एथिलीन इत्यादींशी तुलना केली असता हा पदार्थ स्थिर प्रकृतीचा आहे. त्याचे अपघटन (घटक द्रव्ये सुटी होणे) सुलभ नाही. तथापि कित्येक धातूंच्या (उदा., ताम्र व लोह) उपस्थितीत पाण्याने त्याचे अपघटन होते आणि त्या अपघटनाने तयार झालेल्या हायड्रोक्लोरिक अम्लाचा परिणाम त्या धातूवर होतो. नेहमीच्या तापमानात ही विक्रिया सावकाश होते, परंतु तापमान त्याच्या उकळबिंदूच्या जवळपास असताना ती त्वरेने होते.
उपयोग : या संयुगात क्लोरिनचे प्रमाण सापेक्षत: अधिक असल्यामुळे त्याची संवेदनाहरण करण्याची शक्ती क्लोरोफॉर्मापेक्षा जास्त आहे. परंतु याचा विषारीपणाही जास्त असल्यामुळे संवेदनाहारक म्हणून याचा उपयोग केला जात नाही.
याची विद्रावकता (पदार्थ विरघळविण्याची क्षमता) चांगली असल्याने नैसर्गिक पदार्थातील तेल, चरबी, मेण इ. वेगळे काढण्यासाठी याचा उपयोग करतात. हे ज्वालाग्राही नसल्यामुळे निर्जल धुलाईसाठी याचा उपयोग सुरक्षितपणे करता येतो.
प्राथमिक स्वरूपातील आगी विझविण्याच्या अग्निशामक उपकरणात याचा उपयोग करतात. तापमान कमी करण्यासाठी प्रशीतकामध्ये (थंड पाण्याच्या उपकरणामध्ये) जे फ्रियॉन नावाचे पदार्थ वापरले जातात, त्यांच्या निर्मितीसाठी याचा उपयोग होतो. तसेच जंत व अंकुशकृमी यांचा नाश करण्यासाठीही हे वापरले जाते.
संदर्भ : Parkes, G. D., Ed. Mellor’s Modern Inorganic Chemistry, London, 1961.
शहा, ज. रा.