कळक : (वेळू हिं. बास, कोटा गु. बांस क. बिदरू सं. वंश, कीचक इं. थॉर्नी बांबू लॅ. बांबुसा ॲरुंडिनॅशिया कुल–ग्रॅमिनी). ही परिचित प्रचंड गवताची जाती हिमालयाखेरीज भारतात सर्वत्र, ब्रह्मदेशात व श्रीलंकेत, शिवाय अधिक पावसाठी जंगलात, नद्या व ओढे यांच्या काठाने निसर्गत:च आढळते याची लागवडही केली जाते. भूमिस्थित (जमिनीतील) मूलक्षोडापासून वर हवेत सरळ वाढणारे संधिक्षोड [→खोड] काटेरी, २४–३० मी. उंच व १५–१८ सेंमी. व्यासाचे, पिवळट रंगाचे असून अनेकांचे एकत्र बेट बनलेले असते. तळाजवळच्या पेऱ्यांपासून मुळे व वरच्या पेऱ्यांपासून आडव्या काटेरी फांद्या येतात. कांडे पोकळ, ४५ सेंमी. लांब असून पाने लांबट, भाल्यासारखी व खरबरीत कडांची असतात. आवरक (खोडास वेढणारा देठाचा भाग) चिवट, रेषांकित, विविध आकाराचे व गोलसर टोकाचे असतात. सु. ३०–४० वर्षांतून एकदा प्रचंड परिमंजिरी (फुलोरा) व त्यावर कणिशकांचे झुबके येतात [→पुष्पबंध]. कणिशके व फुलांची रचना सामान्यत: ⇨ग्रॅमिनी कुलात वर्णिल्याप्रमाणे. सु. तीस वर्षांत एका बेटात अदमासे ३०० खोडे (बांबू) बनतात व त्यातील फुलोऱ्यातून ५–१० किग्रॅ. बी मिळते. नवीन लागवड बियांपासून निसर्गत: होते. तथापि लागवडीस फुटवे किंवा कोवळे तुकडे वापरतात. फुलोरा येऊन जाण्यापूर्वी काढलेला बांबू अधिक उपयुक्त त्यानंतर बेटात नवीन खोडे येणे थांबते. ही झाडे फार उपयोग आहेत. घरबांधणी, तराफे, शेतीची अवजारे, शिड्या, पूल बांधणी, कागद व रेयॉन–निर्मिती, जनावरास चारा इत्यादींकरिता वापरतात. कोवळ्या कोंबाची भाजी व लोणची करतात. त्यामुळे भूक व पचनक्रिया सुधारते. दुष्काळात बी धान्याप्रमाणे खातात. पाने आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारी) वरक्तवांतीवर गुणकारी पाने जनावरांना मीठ व काळ्या मिरीबरोबर हगवणीवर देतात घोड्यांच्यासर्दी-खोकल्यावर उपयुक्त. कांड्यातून मिळणारा पांढरा रस सुकून घट्ट झाला म्हणजे त्याला ‘तबशीर’,‘मॅन्ना’ किंवा ‘वंशलोचन’ म्हणतात. हा पौष्टिक आणि वाजीकर (कामोत्तेजक) असून ज्वरनाशक व कफनाशक असतो.
ठोंबरे, म. वा.
“