कस्तूर : मसिकॅपिडी पक्षिकुलाच्या टर्डिनी उपकुलातील पक्ष्यांना सामान्यत: कस्तूर म्हणतात. हे पक्षी जगभर आढळत असले, तरी यूरोपाच्या व आशियाच्या समशीतोष्ण व उपोष्ण प्रदेशांत ते प्रामुख्याने आढळतात. काही जाती उत्तर अमेरिकेत राहतात.
कस्तूर मध्यम आकारमानाचे असतात मोठ्या पक्ष्यांच्या आणि पिल्लांच्या पिसाऱ्यावर सामान्यत: ठिपके असतात पंख साधारणपणे लांब व टोकदार चोच मजबूत रंग तपकिरी, करडा, निळा, हिरवट किंवा तांबूस हे बव्हंशी भूचर आहेत पण काही वृक्षवासी असतात. फळे, कीटक, कृमी आणि गोगलगाई हे यांचे भक्ष्य होय. हे गाणारे पक्षी असून सकाळ संध्याकाळ गातात.
घरटे बांधणे व अंडी उबविणे ही कामे मादी करते. नर व मादी दोघेही पिल्लांना भरवितात. घरटे वाटीसारखे किंवा सपाट असून चिखलात मुळ्या, शेवाळ, गवत वगैरे मिसळून त्यांचे बनविलेले असते. मादी ३–५ अंडी घालते.
भारतात आढळणाऱ्या कस्तुरांपैकी तीन जातींचे संक्षिप्त वर्णन येथे दिले आहे. (१) ब्लॅकबर्ड (कस्तूरक).शास्त्रीय नाव टर्डस मेरूला. हा विंध्याद्रीच्या दक्षिणेस सगळीकडे आढळतो. हा डोंगरावरील दाट जंगलात १,५२५ मी. उंचीपर्यंत आढळतो. हिवाळ्यात तो खालच्या सपाट प्रदेशात येतो. हा साळुंकीएवढा असतो. नराचा रंग करडा तपकिरी, डोके काळे मादी राखी रंगाची, डोके तपकिरी पाय व चोच नारिंगी पिवळी डोळ्याभोवती नारिंगी पिवळे वलय. हिवाळ्यात हानारिंगी डोक्याचा भू-कस्तूर नारिंगी डोक्याचा भू-कस्तूर क्रीऽऽई असा तीव्र स्वर किंवा चक्-चक् असा घशातून आवाज काढतो. प्रजोत्पादनाच्या काळात (मे–ऑगस्ट) नर मंजुळ स्वरात गातो. तो इतर पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करतो. (२) ऑरेंजहेडेड ग्राउंड थ्रश (नारिंगी डोक्याचा भू-कस्तूर). शास्त्रीय नाव झोऑथेरा सायट्रिना हा साळुंकीएवढा गुबगुबीत पक्षी उत्तर भारतात आढळतो. नराचा रंग चकचकीत नारिंगी काळसर पाठ, पंख व शेपटी निळसर करडी मादीचा रंग फिक्कट नारिंगी काळसर आणि पाठ,पंख व शेपटी तपकिरी पिवळसर हिरवी. याच पक्ष्याची एक प्रजाती दक्षिणेत आढळते, तिचे शास्त्रीय नाव सायानोटस आहे. याची हनुवटी, गळा व डोक्याच्या दोन्ही बाजू पांढऱ्या असतात. डोळ्याच्या खालच्या काठापासून दोन आखूड तिरकस काळे पट्टे निघतात. कस्तूरकाप्रमाणेच या जातीचा नर गाणारा आहे. (३) ब्ल्यूहेडेड रॉक थ्रश (निळ्या डोक्याचा शैल-कस्तूर). शास्त्रीय नाव माँटिकोला सिंक्लोऱ्हिंकस. बुलबुलाएवढा हा पक्षी सबंध भारतात आढळतो. डोके, हनुवटी आणि गळा निळा पाठीवरचा भाग निळा काळा ढुंगण आणि खालचा भाग काळसर नारिंगी.
जमदाडे, ज. वि.
“