कारनॅक-१ : मध्य ईजिप्तमधील नाईल नदीच्या पूर्वकाठी वसलेले प्राचीन अवशेषांचे खेडे. प्राचीन काळी उत्तर ईजिप्तची राजधानी थीब्ज होती. तिचे बरेच अवशेष कारनॅक येथे सापडले आहेत. त्यांत ॲमन देवतेचे भव्य मंदिर, ॲमनची पत्नी मूट आणि पुत्र खेन्सू ह्यांची मंदिरे आहेत. ही सर्व मंदिरे एकाचवेळी बांधलेली नसून त्यांचे बांधकाम कित्येक वर्षे चालू होते. सर्वसाधारणतः इ.स.पू.२००० ते इ.स.पू.३० ह्या काळात येथील वास्तूंच्या बांधकामास प्रत्येक राजाने हातभार लावला आहे. परंतु त्यांतील ॲमनचे मंदिर दुसरा रॅमसीझ ह्याने पूर्ण केल्याचे उपलब्ध पुराव्यांवरुन दिसते. इतर बहुतेक अवशेष ईजिप्तच्या अठराव्या राजवंशाच्या कारकीर्दीतील आहेत. तेथील ऑबेलिस्क पहिला थटमोझ व राणी हॅटशेपसूट ह्यांनी उभारिले. वास्तुशिल्पाचे दृष्टीने ॲमनचे मंदिर हे एक अप्रतिम मंदिर समजण्यात येते. त्यातील १४० अजस्त्र स्तंभी दिवाणखाना (१०२ x ५२ मी.) भव्य असून त्यात भिंतींवर पहिला सेती आणि दुसरा रॅमसीझ ह्यांच्या जीवनातील प्रसंग चित्रित केलेले आहेत.
कारनॅकचे विलोभनीय रंगकाम व भरदार स्फिंक्स वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
पहा : ईजिप्त संस्कृति.
संदर्भ : Bratton, F.G. A History of Egyptian Archaeology, London, १९६८.
देव, शां.भा.
“