कार्टराइट, एडमंड : (१४ एप्रिल १७४३—३० ऑक्टोबर १८२३). ब्रिटिश संशोधक. त्यांनी यांत्रिक मागाचा शोध लावला. त्यांचा जन्म मार्नहॅम (नॉटिंगॅमशर) येथे झाला. त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले. ते लेस्टरशरमधील गोआडबी मारवुड येथे १७७९ मध्ये रेक्टर व १७८६ मध्ये लिंगन येथील चर्चमध्ये धर्मोपदेशक होते. ते आयुष्यभर धर्मोपदेशकच राहिले असते, पण योगायोगाने त्यांचे लक्ष यंत्राच्या साहाय्याने कापडाचे विणकाम कसे करता येईल याकडे गेले व ते उत्तम संशोधक झाले.

दोन सशक्त माणसांना चालविता येईल असा एक माग त्यांनी प्रथम बनविला. त्यामध्ये त्यांनी बऱ्याच सुधारणा करुन एक यांत्रिक माग तयार केला व त्याचे १७८५ मध्ये पेटंटही घेतले. परंतु मॅंचेस्टर येथील गिरणी मालकांनी या यांत्रिक मागाबद्दल उत्सुकता न दाखविल्यामुळे त्यांनी डाँकॅस्टर येथे १७८६ मध्ये स्वतःची कापड गिरणी सुरु केली. १७९१ मध्ये मॅंचेस्टर येथे वाफेवर चालणाऱ्या यांत्रिक मागावर त्यांनी कापड उत्पादन सुरू केले. परंतु ही गिरणी १७९२ मध्ये मुद्दाम लावलेल्या आगीमध्ये भस्मसात झाली. त्यामुळे त्यांना डाँकॅस्टर येथील गिरणी विकावी लागली. यामध्ये त्यांना जवळजवळ ३० हजार पौंडांचा तोटा झाला. पुढे त्यांचे यांत्रिक माग सर्रास वापरण्यास सुरुवात झाल्यावर सरकारने १८०९ मध्ये त्यांना १० हजार पौंडांची देणगी दिली.

त्यांनी १७८९ मध्ये लोकर विंचरण्याच्या यंत्राचे पेटंट घेतले. त्याचप्रमाणे त्यांनी वाफेवर चालणाऱ्या एंजिनातील दट्‌ट्यासाठी लागणारे धातूचे संवेष्टन (आवरण) बनविले तसेच पाव बनविण्याचे यंत्र, विटा बनविण्याचे यंत्र, दोरखंड बनविण्याचे यंत्र इ. विविध यंत्रांचे शोध लावले. १७९३ मध्ये त्यांनी पिकाची कापणी करण्याचे यंत्र बनविण्यासंबंधी काही सूचना केल्या. शेतीसंबंधीच्या त्यांच्या निबंधास शेती मंडळाकडून १८०१ साली बक्षीस मिळाले आणि १८०५ साली खतासंबंधीच्या निबंधासाठी त्यांना सुवर्ण पदक मिळाले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते विविध प्रकारचे संशोधन करीत होते. ते हेस्टिंग्ज येथे मृत्यू पावले.

वैद्य, श्री.द.