कारवी : (क.गुर्गी लॅ.कारविया कॅलोसस, स्ट्रॉबिलँथस कॅलोसस कुल-ॲकॅंथेसी). सु.१·८–६·२० मी. उंच वाढणाऱ्या ह्या बळकट झुडुपाचा प्रसार सह्याद्री घाटात भरपूर असून त्याचे लहान मोठे समूह आढळतात पानझडी जंगलात व दाट जंगलात त्यांचे निम्नरोह (मोठ्या वृक्षांच्या खाली किंवा त्यांच्यामध्ये वाढणारे लहान वृक्ष) असतात मध्य भारतातही त्याचा प्रसार आहे. खोड दृढ, खरबरीत व बारीक दांड्यासारखे पाने १०–२३ x ४–८ सेंमी., संमुख (समोरासमोर) व प्रत्येक जोडीतील एक दुसऱ्यापेक्षा लहान दीर्घवृत्ताकृतीकुंतसम (भाल्यासारखी), काहीशी टोकदार, दंतुर व केसाळ किनारीची, वरून गर्द हिरवी आणि खालून फिकट फुले कक्षास्थ (बगलेत), सच्छद, लहान, वर निळी आणि खाली पांढरी असून साध्या किंवा शाखायुक्त, लांबट गोलसर, कणिश-फुलोऱ्यावर सप्टेंबर–नोव्हेंबरमध्ये सात ते दहा वर्षांच्या अंतराने एकदा येतात. छदे हिरवट गुलाबी, खोलगट व चिकट आणि उग्र वासाच्या स्रावाने आच्छादलेली असतात [ →फूल]. बोंड संवर्ताने वेढलेले, लंबगोल पण तळाशी निमुळते असून त्यात दोन केसाळ बिया असतात [→ऍकॅंथेसी].
खोडाची साल वेदनाहारक असून मुरड्यावर शेकण्यास व लालाग्रंथिशोथावर (लाळ-ग्रंथीच्या दाहयुक्त सुजेवर) बाहेरून लावण्यास उपयुक्त. फुलांनी जखम भरुन येते. खेडूत लोक ताजी पाने शक्तिवर्धक व ज्वरनाशक म्हणून वापरतात, पण त्यामुळे पोटात आग होते व फार ओकाऱ्या होऊन त्रास होतो. पाने जनावरांना चारतात. झाडे वरचेवर छाटून त्यानंतर आलेल्या बारीक फांद्या छपराकरिता व कुडाच्या भिंतीकरिता वापरतात.
जमदाडे, ज.वि.