कशनी, आर्थर रॉबर्टसन : (६ मार्च १८६६—२५ फेब्रुवारी १९२६). स्कॉटिश वैद्य व औषधिशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म स्पेमाऊथ मरिशर (स्कॉटलंड) येथे झाला. ॲबर्डीन (स्कॉटलंड), स्ट्रासबर्ग (जर्मनी) व बर्न (स्वित्झर्लंड) येथे त्यांचे शिक्षण झाले. मिशिगन (१८९३ – १९०५), लंडन (१९०५–१८) व एडिंबरो (१९१८–२६) येथील विद्यापीठांत ते औषधिशास्त्राचे प्राध्यापक होते.

वृक्कस्राव (मूत्रपिंडातून स्रवणारा द्रव) कसा उत्पन्न होतो यावर त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले, त्याशिवाय हृद्स्नायूंचे तंत्वाकुंचन (हृदयाच्या स्नायूंमध्ये असणाऱ्या तंतूंचे आकुंचन) वडिजिटॅलिस औषधाचा हृद्स्नायूंवर होणारा परिणाम आणि प्रकाशीय समघटकी (रेणूंमधील अणूंची रचना भिन्न असल्यामुळे विशिष्ट प्रतलात कंपन पावणाऱ्या प्रकाशाचे प्रतल वळविण्याचा गुणधर्म निरनिराळे असणाऱ्या) पदार्थांचा जैवसंबंध यांवरही त्यांनी संशोधन केले.

ए टेक्स्टबुक ऑफ फार्माकॉलाजी अँड थेराप्यूटिक्स (१८९९), द सिक्रिशन ऑफ द यूरीन (१९१७), द ॲक्शन अँड द युझेसइन मेडिसीन ऑफ डिजिटॅलिस अँड इट्स अलाइज (१९२५) आणि बायालॉजिकल रिलेशन्स ऑफ ऑप्टिकली आयसोमेरिक सबस्टन्सेस (१९२६) ही पुस्तके त्यांनी लिहिली. ते एडिंबरो येथे मरण पावले.

कानिटकर, बा. मो.