कथासरित्सागर : संस्कृतातील प्राचीनतम प्रचंड कथासंग्रह. अकराव्या शतकाच्या उत्तरार्धात हा ग्रंथ रचला गेला. ग्रंथकर्ता काश्मीरी पंडित सोमदेव. गुणाढ्याने पैशाची भाषेत लिहिलेल्या ⇨बड्डकहा (बृहत्कथा) ह्या ग्रंथाच्या आधारे हा ग्रंथ तयार झाला असला, तरी मुळाप्रमाणेच ह्या ग्रंथाची रचना आहे, की संस्कृत भाषेतील एखाद्या काश्मीरी बृहत्कथेवरून ह्या ग्रंथाची उत्पत्ती झाली ह्याबद्दल विद्वानांत मतैक्य नाही. १८ लंबकांचा, १२४ तरंगांचा आणि २१,३८ श्लोकांचा हा ग्रंथ आहे.
ह्यात पंचतंत्रातील प्राण्यांच्या कथा गोवल्या आहेत संपूर्ण वेताळपंचविशंतीही ह्यात अंतर्भूत आहे. वत्सराज उदयनाचा मुलगा नरवाहनदत्त याच्या प्रेमप्रकरणांतून या कथांचा उगम झाला असून, त्या प्रेमपूर्तीसाठी घडणाऱ्या प्रसंगांतून मानवी कल्पकतेला शक्य वाटतील, त्या सर्व प्रकारच्या अनेकविध घटनांची गुंतागुंत या कथांमधून दर्शविली आहे. शिवाय एका कथेमधून दुसरी, दुसरीमधून तिसरी अशा रीतीने कथांची गुंफण चालू असल्यामुळे मूळ कथा वाचक जवळजवळ विसरतो.
ह्या कथांमधून समाजातील विविध प्रकारच्या लोकांचे दर्शन घडते. मूर्ख, धूर्त, लबाड, चोर, फसवे, ठक, जुगारी वगैरे अनेक प्रकारच्या लोकांची वर्णने त्यांत आढळतात. विनोद, उपहास, उद्बोधन वगैरेंनी युक्त असणाऱ्या या कथांतून विविध स्वभावांच्या स्त्रियांची वर्णने आढळतात. धूर्त,छिनाल, खुनी, कपटी, व्यभिचारी वगैरे स्त्रियांबरोबरच विश्वासू, धर्मनिष्ठ, सत्यप्रिय आणि पतिव्रता स्त्रियांच्या कथाही त्यांत अंतर्भूत आहेत. जादूटोणा, मंत्रतंत्र, नरमेध वगैरे प्रथा यांत प्रतिबिंबित झालेल्या आहेत. उच्चवर्णीय लोक चांडालकन्यकांशीही विवाह करीत मद्यमांसाचे सेवन करीत आंतरजातीय व आंतरप्रांतीय विवाह होत उच्चकुलातील स्त्रियाही नृत्य शिकत कारस्थाने, भोगविलास व प्रजेची पिळवणूक राजघराणी करीत वगैरे तत्कालीन जीवनाचे चित्रण त्यांत दिसते.
कलशराजाची आई आणि अनंतदेव या राजाची राणी सूर्यवती हिच्या मनोरंजनासाठी सोमदेवाने हा कथासरित्सागर सांगितला आहे. अनेकदा कथनामध्ये शिथिलता, पाल्हाळ आणि क्लिष्टता आली असली व पुष्कळदा सदभिरुचीला गालबोट लागल्यासारखे वाटले, तरी करमणुकीचा प्रधान हेतू सफल होतो. कथा चित्तवेधक असल्यामुळे वाचकांचे मन खेचून घेतात.
संदर्भ : 1. Tawney, C. H. The Kathasaritsagara, 2 vols., Delhi, 1968.
२. शर्मा, पंडितकेदारनाथ, कथासरित्सागर, दोनखंड, पाटणा, १९६०,१९६१.
पाटील, ग. मो.