कडवंची : (लॅ. मॉमोर्डिका सिंबॅलॅरिया कुल-कुकर्बिटेसी). ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) वेल दक्षिण आफ्रिका, पश्चिम भारत (महाराष्ट्रात सोलापूर, सातारा, कोकण) व तमिळनाडू (तिरुनेलवेली) इ. भागांत कुंपणाच्या कडेने व पाण्याच्या कडेने सामान्यपणे आढळते. हिचे खोड बारीक मुळे कठीण व ग्रंथिल आणि प्रताने (तनावे) तारेसारखी व लवदार असतात. पाने साधी, वाटोळी किंवा मूत्रपिंडाकृती, तळाशी हृदयाकृती, गुळगुळीत किंवा किंचित केसाळ व काहीशी खंडित असतात. पुं-पुष्पे व स्त्री-पुष्पे एकाच वेलीवर व त्यांची सामान्य संरचना ⇨ कुकर्बिटेसी या कुलात वर्णिल्याप्रमाणे. नोव्हेंबरात येणाऱ्या मंजरीवर छदहीन पांढरी किंवा पिवळी २ — ५ पुं-पुष्पे असतात. संवर्त नळीसारखा व केसाळ असून पुष्पमुकुट पिवळसर व केसरदले फक्त दोन असतात. स्त्री-पुष्पे एकाकी, छदहीन, किंजपुट टोकदार व किंजल्के दोन असतात [→ फूल]. मृदुफळे लांबट, मांसल, गर्द हिरवी, १⋅८ — ४ सेंमी. लांब, मध्ये फुगीर व दोन्हीकडे टोकदार असून त्यांवर आठ कंगोरे असतात. बिया गर्द पिंगट, बारीक, चकचकीत, थोड्या चपट्या व नाभिजातयुक्त (बीजकरंध्राजवळील वाढीने युक्त). मुळे गर्भपातक कोवळ्या फळांची भाजी करतात आणि फोडी उन्हात वाळवून किंवा लोणचे करून खातात.
मुजुमदार, शां. ब.
“