कच्छी बोली : गुजरात राज्यातील कच्छच्या प्रदेशाची कच्छी ही बोली भाषिक दृष्ट्या सिंधी भाषेला अधिक जवळची आहे. १९६१च्या जनगणनेप्रमाणे कच्छी भाषिकांची संख्या ३,९२,२४९ असून त्यांतील ३,४१,६६० गुजरात राज्यात ४५,५७६ महाराष्ट्र राज्यात व बाकीचे भारताच्या इतर भागांत होते.
कच्छीच्या अनेक पोटबोली असून त्यांच्यापैकी कच्छी, कायस्थी, भाटिया, मेमण (मोमीन) इ. विशेष महत्त्वाच्या आहेत. सांस्कृतिक दृष्ट्या या सर्वांचा संबंध गुजरातशी अधिक जिव्हाळ्याचा आहे.
कच्छीचे सिंधीशी असलेले नाते ज्या वैशिष्ट्यांनी स्पष्ट होते, त्यांत स्वामित्वदर्शक ‘ज्’ हा प्रत्यय आहे. गुजरातीत तो ‘न्’ आणि मराठीत ‘च्’ असा आहे. सांस्कृतिक संबंधामुळे गुजरातीचा कच्छीवर जो प्रभाव पडला आहे, त्यामुळे ती गुजरातीला जवळची वाटते. म्हणून तिला सिंधी व गुजराती यांच्यामधले संक्रमक रूप म्हणता येते.
नमुना : हिकडे माडूजा ब पुतर हुआ, तें मिंझानूं निंढे पुतर पेके चिओ, ‘‘पे, मिल्कत मिंझानूं जु को मंजी वती थिए से मूंके डे’’.
भाषांतर : एका माणसाचे दोन मुलगे होते. त्यांच्या मधल्या लहान मुलाने बापाला म्हटले, ‘‘बाबा, मिळकतीमधला जो काही माझा भाग असेल, तो मला दे’’.
संदर्भ : Grierson, G. A. Ed. Linguistic Survey of India,Vol. VIII, Part I, Delhi, 1968.
कालेलकर, ना. गो.