स्वयंचल अभियांत्रिकी : ही अभियांत्रिकीची एक शाखा आहे. रस्त्यावर चालणारी सर्व प्रकारची स्वयंचलित वाहने व ती चालविण्यासाठी ( परिचालनासाठी ) कराव्या लागणार्‍या कृती यांच्याशी स्वयंचल अभियांत्रिकीचा संबंध येतो. स्वयंचलित वाहनांचा व त्यांना लागणार्‍या भागांचा अभिकल्प ( आराखडा ) तयार करणे व त्यांचे उत्पादन करणे हे या शाखेचे कार्यक्षेत्र आहे. स्वयंचलित वाहन हे अंतर्ज्वलन एंजिनाद्वारे चालणारे वाहन असून माल, प्रवासी इत्यादींच्या रस्त्यावरील वाहतुकीसाठी ते वापरतात. मोटारगाडी, बस, मालमोटार, ट्रॅटर, जीप, मोटारसायकल, रिक्षा इ. काही परिचित स्वयंचलित वाहने आहेत.

स्वयंचल अभियांत्रिकी ही यांत्रिक अभियांत्रिकीची उपशाखा म्हणता येईल. यामुळे या दोन्ही प्रकारच्या अभियंत्यांना स्वयंचलित वाहनाची, त्याच्या प्रेषण प्रणालीची यंत्रणा व विविध उपयोग इत्यादींची माहिती असावी लागते. स्वयंचलित वाहनाची प्रेषण गती निर्माण होण्यासाठी अंतर्ज्वलन एंजिनाच्या सिलिंडरात भिन्न प्रकारची इंधने उच्च तापमानाला जाळतात. बहुतेक स्वयंचलित वाहने केवळ अंतर्ज्वलन एंजिन असलेली असतात. एके काळी वाफ एंजिनावर व कोल गॅसवर चालणारी मोटारगाड्यांसारखी स्वयंचलित वाहनेही होती.

मराठी विश्वकोशात ट्रॅटर, मोटारगाडी, मोटारगाडी उद्योग, मोटार-सायकल, रिक्षा, स्कूटर यांसारख्या स्वतंत्र नोंदी आहेत आणि त्यांमध्ये स्वयंचलित वाहनांविषयीचा इतिहास तसेच त्यांच्या रचनेतील प्रमुख भाग व विविध प्रणाल्या यांची तपशीलवार माहिती दिली आहे. उदा., ‘मोटारगाडी’ या नोंदीत इतिहास, तळगाडा, साटा, संधारण रचना, मूलचालक ( एंजिन ), प्रेषण प्रणाली, आस व चाके, गतिरोधक, सुकाणू यंत्रणा, बैठकी, उपकरण-फलक ( डॅश बोर्ड ), विद्युत् प्रणाली, वाता-नुकूलन, अवजड मोटारगाड्या व सांस्कृतिक प्रभाव यांची सविस्तर माहिती दिली आहे.

स्वयंचलित वाहनांचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारे करतात. जड वाहतूक वाहने (हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हीइकल एचटीव्ही) अथवा जड चालक वाहने (हेव्ही मोटर व्हीइकल एचएमव्ही ) उदा., मालमोटारी, बस हलकी वाहतूक वाहने (लाइट ट्रान्स्पोर्ट व्हीइकल एलटीव्ही) उदा., पिकअप, स्टेशन वॅगन इ. आणि हलकी चालक वाहने (लाइट मोटर व्हीइकल एलएमव्ही) उदा., लहान मोटारगाड्या (कार), जीप इत्यादी हे वाहनाच्या भारानुसार केलेले प्रकार आहेत.

दोन चाकी (उदा., स्कूटर, स्कूटी, मोटारसायकल इ.), तीन चाकी (उदा., रिक्षा, अपंगांसाठीच्या तीन चाकी स्कूटर, टेंपो इ.), चार चाकी (उदा., मोटारगाडी, जीप, बस, मालमोटार इ.) आणि सहा व अधिक चाकांची स्वयंचलित अवजड वाहने (उदा., दोन गिअर अक्ष व प्रत्येकाला चार चाके) हे चाकांच्या संख्येनुसार होणारे प्रकार आहेत.

पेट्रोलवर चालणारी (उदा., मोटारगाड्या, स्कूटर, मोटारसायकल इ.), डीझेलवर चालणारी (उदा., जीप, मालमोटारी, मोटारगाड्या, रिक्षा इ.), इंधन वायूंवर चालणारी (उदा., द्रवीभूत खनिज तेल वायू — एलपीजी — किंवा संपीडित नैसर्गिक वायू — सीएनजी — यांच्यावर चालणारी मोटारगाडी, रिक्षा, बस) आणि विद्युत् घट मालेद्वारे चालणारी (उदा., स्कूटर, मोटारगाडी इ.) हे वापरण्यात येणार्‍या इंधनांनुसार होणारे स्वयंचलित वाहनांचे प्रकार आहेत.

दोन दारांची सिडॅन, चार दारांची सिडॅन, जीप, स्टेशन वॅगन यांसारखी परिवर्तनशील (कन्व्हर्टिबल) हे वाहनांच्या कायेनुसार (बॉडीनुसार) होणारे प्रकार आहेत. तसेच दूध, पेट्रोल, डीझेल, रसायने इ. द्रवरूप पदार्थ वाहून नेणारी (टँकर), आगीचा बंब व रुग्णवाहिका यांसारखी खास कामांसाठीची स्वयंचलित वाहने आहेत.

हाताने गिअर टाकता येणारी, तसेच अर्धस्वयंचलित वाहने असतात (उदा., मोटारगाडी, स्कूटर). स्वयंचलित प्रकारात गिअर हाताने बदलावा लागत नाही, तो वाहनाच्या गतीनुसार आपोआप बदलतो.

वाहनातील एंजिनाच्या स्थानानुसार सुद्धा स्वयंचलित वाहनांचे वर्गीकरण करता येते. बहुतेक वाहने पुढे एंजिन असणारी असतात (उदा., भारता-तील बहुतेक मोटारगाड्या, बस, मालमोटारी इ.), तसेच मागे एंजिन असणारी थोडीच स्वयंचलित वाहने आहेत (उदा., नॅनो कार, सहा आसनी रिक्षा इ.).

भारतात स्वयंचलित वाहनांच्या उद्योगासाठी पूर्वी केंद्र सरकारचा परवाना घ्यावा लागत असे. परंतु जुलै १९९१ मध्ये असा परवाना घेण्याचा नियम मागे घेण्यात आला, तर प्रवासी मोटारगाड्यांच्या बाबतीत हा नियम १९९३ मध्ये मागे घेतला. परदेशी गुंतवणूक व तंत्रविद्येची आयात यांवरील केंद्र सरकारचे निर्बंधही हळूहळू शिथिल होत गेल्यामुळे या उद्योगाची भरभराट होऊन भारत या उद्योगाच्या जागतिक स्पर्धेत पुढे जाऊ शकला. स्वयंचलित वाहनांच्या उत्पादनाच्या सुविधांमध्ये भारतात वाढ झाल्याने स्वयंचलित वाहने व त्यांचे सुटे भाग यांच्या बाबतीत झपाट्याने प्रगती झाली. भारतात २०१२ च्या सुमारास या उद्योगात सु. सव्वा कोटी लोक प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे गुंतलेले होते. २००९ मध्ये भारताचा स्वयंचलित वाहन उत्पादनात जगात सातवा क्रमांक, दुचाकी वाहने व ट्रॅटर यांच्या उत्पादनाच्या बाबतीत दुसरा क्रमांक व्यापारी वाहनांच्या उत्पादनाच्या बाबतीत पाचवा क्रमांक तर आशियातील प्रवासी मोटारगाड्यांच्या बाजारपेठेत दुसरा क्रमांक होता. याच वर्षात भारताने चाळीसहून अधिक देशांत स्वयंचलित वाहनांची निर्यात केली होती. या सर्व माहितीवरून भारताच्या स्वयंचल अभियांत्रिकीशी निगडित असलेल्या उद्योगात झपाट्याने झालेल्या प्रगतीची कल्पना येऊ शकेल.

पहा : ट्रॅटर मोटारगाडी मोटारगाडी उद्योग मोटारसायकल रिक्षा स्कूटर.

ठाकूर, अ. ना.