ट्रॅक्टर : (कर्षित्र, कर्षक). गाड्यावर घातलेली वा त्यालाच सरळ जोडलेली शेतकामाची व अन्य प्रकारची यंत्रे तेल, पाणी किंवा अन्य पदार्थ असलेल्या गाड्यांवरील टाक्या सामान लादलेले चालीत डबे (अनुवाहन, ट्रेलर) वगैरे ओढण्यासाठी वापरावयाचे स्वयंचलित शक्तिसाधन. अचल यंत्रेही ट्रॅक्टर (त्यावरील कप्पी-पट्ट्याच्या मदतीने) चालवू शकतो. ट्रॅक्टर हे केवळ चाके लावलेले एंजिन असते आणि त्यामुळे स्वतः ट्रॅक्टरावर सामान वगैरे काही लादता येत नाही. तरी पण हे विविध प्रकारची कामे करणारे बहुगुणी यंत्र आहे.

ट्रॅक्टर जनावरांऐवजी नुसते ओढण्याचे कामच करीत नाही तर तो मालसामान भरण्याचे, कणसे-लोंब्या खुडण्याचे, कापण्याचे, फवारामारण्याचे, झोडण्याचे, थप्प्या लावण्याचे वगैरे माणसांनी करावयाची कामेही करू शकतो. त्याचा सर्वांत जास्त उपयोग शेतीसाठी, पड जमीन नांगराखाली आणण्यासाठी आणि मोठाल्या बांधकामात होतो. भारतात त्याचा प्रसार मुख्यत्वे शेतीसाठी होत आहे.

इतिहास : किले नावाच्या ब्रिटिश तंत्रज्ञांनी १८७५ मध्ये शेतीची अवजारे (मोठी यंत्रे) ओढण्यासाठी जनावरांऐवजी वाफेच्या एंजिनावर चालणाऱ्या ट्रॅक्टराचा उपयोग केला. त्या वेळी नांगर वगैरे अवजारे ट्रॅक्टराला तारदोरांनी जोडीत असत. ट्रॅक्टराचा जन्म जरी अशा तऱ्हेने इंग्लंडात झाला असला, तरी त्याचा खरा विकास अमेरिकेतच झाला. तेथे विपुल जमीन असल्यामुळे शेती उद्योगाच्या यांत्रिकीकरणाला खूपच वाव होता. अमेरिकेत शेतकामाची यंत्रे, उदा., झोडणी, मळणी, कोळपणी, लाकूड कापणी (शेती उद्योगातील उपांग) करणारी यंत्रे सु. १८५० पासून वापरात येऊ लागली. ती एकाच जागी मालकाच्या शेतात असत. वर उल्लेखिलेला वाफ एंजिनाचा ट्रॅक्टर आल्यावर तो मग घोडे लावून यंत्र असलेल्या ठिकाणी नेण्यात येत असे व ट्रॅक्टराची कप्पी यंत्राच्या कप्पीला पट्ट्याने फिरवी. या पद्धतीचा गव्हाच्या शेतीला अमेरिकेत त्या वेळी फार उपयोग झाला. काही दिवासांनी या ट्रॅक्टराला गाड्यावर बसवण्यात आले व तो ओढून नेण्यासाठी घोडे अनावश्यक झाले. बांधलेले रस्ते किंवा रूळ न लागणाऱ्या ट्रॅक्टरांनी जेव्हा जमीन नांगरण्यात येऊन लागली तेव्हा ‘ट्रॅक्टर’ शब्दाचा जन्म झाला. त्या वेळी ट्रॅक्टराची चाके पोलादाची असत आणि जमिनीत पकड मिळवण्यासाठी त्यांच्या प्रधींवर (कडांवर) कंगोरे ठेवलेले असत (आ. १).

हा ट्रॅक्टर इंधन व पाणी भरण्यासाठी अधून-मधून थांबवावा लागे. नांगराच्या तेरा फाळांपैकी सहा फाळ वापरून हा ट्रॅक्टर ७२ मिनिटांत २·६३ एकर ( १ हेक्टरांपेक्षा किंचित जास्त) जमीन नांगरीत असे. या कामात गुंतलेली माणसे म्हणजे ट्रॅक्टराचा परिचालक, लाकडे आणि पाणी यांच्या पुरवठ्यासाठी एक माणूस व घोडे, एक आगवाला, दोन नांगर परिचालक आणि संशोधकातर्फे एक माणूस (ट्रॅक्टराच्या देखरेखीसाठी) अशी सहा माणसे व काही घोडे असत.

आ. १. पोलादी चाकांचा वाफ एंजिन ट्रॅक्टर (१९११) : ट्रॅक्टर १२ फाळांचा नांगर ओढत आहे.

ट्रॅक्टर हा अंतर्ज्वलन (सिलिंडरातच इंधनाचे ज्वलन होणाऱ्या) एंजिनाचाच असला पाहिजे अशी नंतरच्या काळात श्रद्धा बनली आहे. वाफ ट्रॅक्टर ही एक केवळ सुरुवातीची अल्पकालिक अवस्था होती. १८८९ मध्ये एका वाफ ट्रॅक्टराच्या गाड्यावर द. डकोटा राज्यात, जेव्हा एक एकसिलिंडरी ‘चार्टर’ वायू एंजिन, चार्टर गॅस एंजिन कंपनीने बसवून नव्या तऱ्हेचा ट्रॅक्टर तयार केला तेव्हाच खऱ्या अर्थाने ट्रॅक्टर पर्वाला सुरुवात झाली असे मानतात. या कंपनीने असले आणखी सहा ट्रॅक्टर बनविले. पहिला पेट्रोल एंजिन ट्रॅक्टर जे. आय्. केस थ्रेशिंग मशीन कंपनीने १८९२ मध्ये बनविला. पुढील ७–८ वर्षांत जॉन फ्रोएलिक व जॉन डीअर यांनी अमेरिकेत, नीकोलाउस ओटो यांनी जर्मनीत व तसेच काही तंत्रज्ञांनी इंग्लंडात अंतर्ज्वलन एंजिनाचे ट्रॅक्टर बनविले. ओटो यांनी तर आपले १५ ट्रॅक्टर अमेरिकेत विकले. १९०१ मध्ये सी. डब्ल्यू. हार्ट व सी. एच्. पार यांनी एक मोठ्या तेल-शीतन मंद गती, दोन फेरी आवर्तन एंजिनाचा ट्रॅक्टर बनविला. तसलेच आणखी १५ ट्रॅक्टर त्यांनी १९०३ पर्यंत विकले. ते इतके चांगले होते की, त्यातील निम्मे तरी १९२० पर्यंत चांगले काम देऊ शकले. १९०४ मध्ये बेंजामिन होल्ट यांनी पहिला पेट्रोल एंजिनी साखळीपट्ट्याचा ट्रॅक्टर बनिवला. पट्ट्याला लाकाडाचे ठोकळे बसविलेले होते. यात प्रत्येक पट्ट्याला स्वतंत्र क्लच बसविला होता व त्यामुळे तो वळविणे सोपे झाले. हे तत्त्व साखळीपट्ट्याच्या सर्व वाहनास अजूनही वापरले जाते. अशा तऱ्हेने ट्रॅक्टराचा विकास होत असता १९०६ मध्ये एकदम ११ ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांच्या स्थापनेने ट्रॅक्टर उद्योगाला सुरुवात झाली.

हेन्‍री फोर्ड यांनी १९०६ साली २४ अश्वशक्तीचे (अश.चे) चार सिलिंडरी उभे मोटारगाड्यांचे पेट्रोल एंजिन व ग्रहमाली प्रेषण व्यवस्था वापरून एक प्रयोगिक ट्रॅक्टर बनविला. या रचनेने पूर्वीच्या भारी वजनाच्या ट्रॅक्टरांचे पर्व संपून नव्या हलक्या ट्रॅक्टरांचे पर्व सुरू झाले. यानंतर ट्रॅक्टरांच्या बांधणीत सुधारणा करण्याचे प्रयत्न चालूच होते. फोर्ड कंपनीने १९१७ मध्ये एंजिन, प्रेषण चक्रमाला, अंतिम मळसूत्री (वर्म) चालक ही सर्व बिडाच्या एकाच पेटीत बसविली. दंतचक्रे तेलात बुडविलेली होती. तसेच एंजिनाला लागणारी हवा एका मोठ्या ओल्या कपडाच्या गाळणीतून पुरविलेली होती. त्याला खालची चौकट अशी नव्हतीच. या ट्रॅक्टरला ‘फोर्डसन’ असे नाव देण्यात आले होते. हा ट्रॅक्टर लोकांना एकदम पसंत पडून त्याचा मोठा खप झाला व पुढील दशकात ट्रॅक्टरबांधणीसाठी तो प्रमाण मानला गेला. १९१८ हे साल अमेरिकेचे पहिल्या महायुद्धात असल्याचे दुसरे वर्ष होते आणि त्यावर्षी तेथे शेतमजुरांचा भयंकर तुटवडा जाणवू लागला. यामुळे ट्रॅक्टर उत्पदनाला जोर आला. उत्पादनाच्या नव्या सोप्या पद्धती, बांधणीत सुधारणा यांच्या संशोधनाला चालनाही मिळाली. मोटारगाडी उद्योगातील जोडणी-साखळी पद्धत ट्रॅक्टरांसाठी वापरण्यास सुरुवात झाली. तसेच अभिकल्पात आणि बांधणीत सुधारणा होऊन ट्रॅक्टराच्या मागच्या बाजूने स्वतंत्र्य रीत्या एंजिनचलित्र फिरत्या दंडाच्या रूपाने शक्तिग्रहणाची प्रथमच सोय करण्यात आली. यामुळे मागे जोडलेली अवजारे, उदा., गवत कापणीची, बांधणीची, ट्रॅक्टराच्या पुढे जाण्याच्या कमी-जास्त वेगावर परिणाम न होता एका कायम वेगाने एंजिनानेच चालवणे शक्य झाले. ही व्यवस्था इतकी महत्त्वाची होती की, ती त्यानंतर सर्व ट्रॅक्टरांत आवश्यक गोष्ट ठरून गेली. या अगोदर या यंत्रांचे चालन त्यांच्या चक्रांनी म्हणजे ट्रॅक्टराच्या गतीने होत असे व ते अर्थातच ट्रॅक्टराच्या वेगांवर अवलंबून असे. यानंतरची मोठी महत्त्वाची घटना म्हणजे १९३१–३२ साली ट्रॅक्टरांकरिता पोलादी धावांच्या लोखंडी चाकांच्या जागी रबरी हवेचे टायर वापरण्यास सुरुवात झाली. प्रथम हे टायर गोल छेदाचे होते पण पुढे त्यांची उंची कमी करून रुंदी वाढविण्यात आली. तसेच त्यातील हवेचा दाब ०·८ ते १·४ किग्रॅ./सेंमी.इतका कमी ठेवण्यात येऊ लागला. टायरवर पावले (ट्रेडिंग) व मोठ्या पण दूरदूर असलेल्या सोंगट्या ठेवण्याची पद्धत आली. या गोष्टींमुळे या धावांचा परिघर्षण रोध कमी झाला. जमिनीवरील पकड वाढली व त्यामुळे कार्योपयोगी शक्तीत व परिणामतः ट्रॅक्टराच्या कार्यक्षमतेत वाढ झाली. एंजिनाच्या बाबतीत वाफ एंजिन, वायू (कोळशाचा वा नैसर्गिक म्हणजे खनिज) एंजिन, केरोसीन एंजिन, पेट्रोल एंजिन आणि शेवटी आपले स्थान अजूनही टिकवून असलेले डीझेल एंजिन असे त्याच्या विकासातील टप्पे पडतात. सुरुवातीच्या वाफ एंजिनाच्या व लोखंडी चाकांच्या ट्रॅक्टराचेवजन सु. ९ टन असे ते सध्याच्या चार चाकी रबरी हवाई टायरांच्या प्रमाणित ट्रॅक्टराचे सु. १·५ टन किंवा कमीही इतके कमी झाले आहे. ट्रॅक्टराची अश्वशक्ती ३०–४० वरून आता (मोठ्यांची) १२०–१५० पर्यंत गेली आहे.


सामान्य वर्णन : आधुनिक ट्रॅक्टराचे मुख्य भाग पुढीलप्रमाणे असतात : (१) एंजिन, (२) चार चाके किंवा साखळीपट्टा आणि (३) शक्तिप्रेषणातील दंतचक्रे असलेली प्रेषण पेटी. अचल यंत्रे चालविण्यासाठी कप्पी-पट्ट्याचीही सोय करता येते. तसेच ट्रॅक्टराला जोडलेल्या अवजाराचे परिचालन करण्यास द्रवीय व्यवस्था असते व तिची कळ ट्रॅक्टर चालकाच्या जवळच ठेवलेली असते. ट्रॅक्टराच्या मागील बाजूस अवजार किंवा अनुवाहन जोडण्याची दोन-तीन बिंदू अडकवण पद्धतीची व्यवस्था असते. ट्रॅक्टराची निर्धारित अश. ही खेच अश. व पट्टा अश. या राशींनी दर्शवितात.

खेच किंवा ओढदांडा अश. ही एंजिनाच्या अश.च्या सु. ८० ते ९०% चाकीच्या ट्रॅक्टरांत व सु. ५०% साखळीपट्टा ट्रॅक्टरांत असते. ट्रॅक्टराच्या उपयोगानुसार त्यात एंजिन पेट्रोल, केरोसीन किंवा डीझेल जातीचे असते. ट्रॅक्टर त्यांच्या शक्तीप्रमाणे भारी, मध्यम व हलके अशी तीन प्रकारचे असतात. पहिल्या दोहोंसाठी डीझेल एंजिन व हलक्या ट्रॅक्टरांसाठी पेट्रोल एंजिन वापरले जाते. कधीकधी पेट्रोलऐवजी केरोसीनही वापरतात. एंजिने चार धावांच्या आवर्तनाची [→ अंतर्ज्वलन-एंजिन], बहुधा मंदगतीची, सु. २,००० प्रती मिनिट फेऱ्यांची (प्रमिफे.ची), उभ्या बांधणीची व २, ४, ६ किंवा ८ सिलिंडरांची असतात. त्यांची चालक शक्ती मागील चाकांना अथवा मागील आणि पुढील अशा चारही चाकांना दिलेली असते. पुढील चाकांनाही चालक शक्ती पुरविली, तर शक्ती पुरविली, तर ट्रॅक्टराचे खेचबळ वाढते.

ट्रॅक्टराचा पुढे जाण्याचा वेग कमी-जास्त करण्याकरिता ३ ते १२ पुढील चालटप्पे आणि १ किंवा २ उलट चालटप्पे असतात. हे टप्पे पेटीतील दंतचक्रांच्या वेगवेगळ्या जोडणीने साधता येतात. प्रेषण व्यवस्थेत क्लच किंवा द्रवीय पद्धती वापरतात. त्यामुळे ट्रॅक्टर चालत असतानाही वेगबदल सहज करता येतो. ट्रॅक्टर ताशी ८ ते ४५ किमी. वेगाने जाऊ शकतो. पण जरूर पडल्यास त्याची गती एंजिन पूर्ण वेगाने चालत असता ताशी १५ किमी.पर्यंत कमी करता येते. ट्रॅक्टरला ओढदांडा तीन बिंदू अडकवण पद्धतीने जोडलेला असतो व ओढदांड्याच्या मागील टोकाला अवजार जोडतात. एंजिनातील द्रवीय पंप लवचिक (होस) नळाने अवजाराला जोडतात, त्यामुळे चालकाला अवजार खाली-वर (कार्यन्वित किंवा कार्यरहित) बसल्या जागेवरून सहज करता येते. ट्रॅक्टराच्या टायरावरील भार (वजन) व जमिनीच्या घर्षणयुक्त संबंधामुळे ट्रॅक्टर जमिनीवर घट्ट पकड घेतो, टायर घसरत नाही व त्याला खेचण्याचे बळ प्राप्त होते.

आ. २. सामान्य चाकी ट्रॅक्टर

प्रकार व वर्णन : ट्रॅक्टरांचे चाकी व साखळीपट्ट्याचे (कॅटरपिलर) असे दोन मुख्य भिन्न वर्ग आहेत. या दोन्ही वर्गांत एंजिनाच्या शक्तीप्रमाणे मोठे, मध्यम व लहान असे प्रकार आहेत. चाकी ट्रॅक्टराची बांधणी अगदी साधी असून त्याला खाली चौकट व स्प्रिंगा नसतात. पुढच्या आसावर एंजिनाचे पुढचे टोक टेकते. एंजिन व प्रेषण पेटी एकत्र असतात व पेटीतून बाहेर आलेल्या आसावर मागील चाके आधारलेली असतात. तो सहज वळविता येतो. त्याचे टायर रबरी असतात. त्यामुळे चालकाला हादरे कमी बसून त्रास कमी होतो व ट्रॅक्टरही जास्त काळ टिकतो. याचे दुचालक व चतुर्चालक असे प्रकार असतात. साखळीपट्टा ट्रॅक्टर वळविणे त्यामानाने बरेच कठीण असते. या ट्रॅक्टराची खेचण्याची शक्ती चाकी ट्रॅक्टरापेक्षा जास्त असते. या ट्रॅक्टराचे वजन दोन मोठ्या निरंत साखळीपट्ट्यांवर विभागलेले असते. पुढे एक व मागे एक अशा दोन दंतचक्रांवर साखळी फिरते. मागील चक्रांना चालक शक्ती पुरविली जाते. ही दोन्ही दंतचक्रे निरनिराळ्या स्वतंत्र आसांवर बसवितात व त्यामुळे यात विभेदी चालनाची जरूर राहत नाही. ट्रॅक्टर सरळ जाताना दोन्ही चालक दंतचक्रे एकाच गतीने फिरतात पण ट्रॅक्टर वळविण्यासाठी या दंतचक्रांच्या गतीत फरक करावा लागतो. तीव्र वळण घेताना एक पट्टा थांबवूनही धरता येतो. हा उंच सखल जमिनीवरूनही सहज जाऊ शकतो. चाकी ट्रॅक्टराला यासाठी पोटाखाली बरीच मोकळी जागा ठेवतात तर, साखळीपट्टा आ. ३. सामान्य साखळीपट्टा ट्रॅक्टर

ट्रॅक्टराच्या पट्ट्यांची पुढची टोके एकमेकांसापेक्ष वर-खाली होऊ शकतात. साखळीपट्टा ट्रॅक्टरात चालीचे टप्पे चाकी ट्रॅक्टरातल्यापेक्षा साधारणतः जास्त असतात. या ट्रॅक्टराची रचना-बांधणी चाकी ट्रॅक्टरापेक्षा क्लिष्ट असते (आ. ३). याच्या एंजिनाची शक्तीही चाकीपेक्षा जास्त असते व त्याला किंमतही अधिक पडते. तसेच याचा चालू व देखभालीचा खर्चही जास्त असतो. त्यामुळे पुष्कळ जमीन असणाऱ्या बागाईतदारांना किंवा बऱ्याच लहान शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थेला तो घेणे परवडते आणि फायद्याचेही होऊ शकते, कारण याचा कामाचा उरकही मोठा असतो साखळीपट्टा ट्रॅक्टर हरळी, कुंदा, कास वगैरे तणांनी व्यापलेली जमीन नांगरण्यास फार उपयुक्त असतो. याला स्वतःचा मार्ग बाळगणारा ट्रॅक्टर असेही म्हणतात. या दोहोंपैकी चाकी ट्रॅक्टर हा बहुगुणी आणि सर्वकामी असतो व तोच जास्त (एकंदरपैकी जवळजवळ ९५%) प्रचारात आहे.

चाकी ट्रॅक्टराचे उपयोगानुसार पुढील प्रकार झाले आहेत : (१) कृषिकर्म–प्रमाणित व सर्वकार्योपयोगी, (२) बागायती, (३) यांत्रिक नांगर (पॉवर टिलर), (४) औद्योगिक व (५) हमरस्ता वाहतुकी.


प्रमाणित कृषिकर्म ट्रॅक्टर : याचे चाकोरी अंतर बदलता येत नाही म्हणून त्याला प्रमाणित म्हणतात. नांगरणी, कुळवणी, कापणी इ. नेहमीची शेतीची कामे हा करू शकतो. परंतु पिकाच्या ओळीतून करावयाची कामे करू शकत नाही. याची मागील दोन चालक चाके मोठी असतात व पुढील दोन मार्गणक चाके लहान असतात.

सर्वकार्योपयोगी कृषिकर्म ट्रॅक्टर : याची रचना अशा प्रकारची असते की, सर्वसाधारणपणे शेतीतील पेरणी, लावणी, आंतर मशागत (ओळीतील पिकांची मशागत), फवारणी अशी कामे तो करू शकतो. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पुढील आणि मागील चाकांमधले त्यांचे आसांवरील अंतर ओळीच्या रुंदीला जमेल असे कमीजास्त करता येते. तसेच जमीन व पोट यांमध्ये पिकाला धक्का पोहोचू नये यासाठी भरपूर मोकळी जागा असते. याची इतर वैशिष्ट्ये म्हणजे त्वरित वळण घेता येणे, अवजारे जोडण्याची व सोडवण्याची सोपी व्यवस्था व द्रव दाबावर कळींचे परिचालन ही आहेत. हे निरनिराळ्या शक्तीचे व विविध पिकांना उपयुक्त असणारे अशा निरनिराळ्या प्रकारांत मिळतात. शेतीसाठी या प्रकारच्या ट्रॅक्टराचा प्रसार अधिक झाला आहे.

बागायती ट्रॅक्टर : हा लहान व मध्यम अशा दोन प्रकारांत मिळतो. हा तुटक्या बांधणीचा, बाजूला कमी डोकावणारे भाग असलेला आणि झाडांच्या आसपास वापरता येईल अशा तऱ्हेचा असतो. फवारे मारण्याकरिता, माती व बर्फ हलविण्याकरिता, गवत व रान काढण्याकरिता आणि बागोतील जमीन नांगरण्याकरिता याचा उपयोग होतो. यांचे एंजिन १ ते ६ अश.चे व बहुतेक हवेने थंड केलेले असते. काही ट्रॅक्टर चाकरहित असतात व ते खाली लावलेल्या फिरत्या सोंगट्यांवर आधारलेले असतात.

यांत्रिक नांगर : (पॉवर टिलर). हा जवळ जवळ छोटा ट्रॅक्टरच असून पेरणीसाठी जमीन नांगरून तयार करण्याकरिता याचा उपयोग होतो. याचे हाती मार्गणाचा व यांत्रिक मार्गणाचा असे दोन उपप्रकार आहेत. याचा जपानमध्ये फार प्रसार झालेला आहे. कोकणासारख्या भागातील लहान शेतांना हा उपयुक्त आहे. त्याची किंमतही कमी असते.

औद्योगिक ट्रॅक्टर : उद्योगवाडी वा कसलेही उत्पादन केंद्र यांच्या आसपास कच्चा व पक्का माल हलविण्यास याचा उपयोग करतात. उच्च खेच शक्ती आणि सुलभ चाल यांकरिता या ट्रॅक्टराला भक्कम टायर वापरतात.

हमरस्ता वाहतूक ट्रॅक्टर : मागे जोडलेल्या अनुवाहनातून हमरस्त्यावरून मालाची वाहतूक करण्यासाठी याचा जन्म झाला. याच्या पुढील व मागील आसांतील अंतर कमी असते. दोन चाकी अनुवाहन जोडण्याकरिता याच्या मागील चाकावर (अर्ध) जोड (पाचवे चाक) बसविलेला असतो. शहरातून उतारू वाहतुकीसाठी मोठाली दुमजली अनुवाहने किंवा तेल टाक्या ओढण्यासाठीही याचा वापर करतात. मात्र या प्रकारच्या ट्रॅक्टराला पुढली दोनच चाके असतात.

आ. ४. बागायती तिचाकी ट्रॅक्टर

या वरील चार चाकी ट्रॅक्टरांशिवाय खास ओळीतील पिकांच्या कामासाठी बनविलेला असा तिचाकी ट्रॅक्टरही (आ. ४) असतो. याच्या पोटाखाली मोठी मोकळी जागा ठेवतात. याला पुढे एक किंवा जवळजवळ लागून असलेली दोन लहान चाके असतात.

आ. ५. संकल (कापणी, मळणी व उफणणी करणारे यंत्र)

संकल : (कंबाइन). पिकाची कापणी, मळणी आणि उफणणी ही तीनही कामे एकत्र करता येणारे हे यंत्र आहे. याची आ. ५ वरून कल्पना येते. ते ट्रॅक्टराला जोडता येते किंवा ते स्वयंचलित प्रकारचेही असते म्हणून त्याचा समावेश येथे केला आहे. संकल हे गहू, ज्वारी, भात वगैरे पिकांसाठी उपयुक्त आहे. याच्या वापरामुळे पीक लवकर काढता येऊन दुसरे घेता येते. याचे छोटे व मोठे असे प्रकार असतात. छोट्या संकलाने एकाच वेळी कापल्या जाणाऱ्या पिकाच्या पट्ट्याची रुंदी १·२ ते २·४ मी. असते, तर मोठ्यात ती ३ ते ६ मी. असते. स्वयंचलित संकल एकच माणूस चालवू शकतो. त्याला ४५ ते ६० अश.चे एंजिन बसवितात. ते हमरस्त्यावरून किंवा शेतातूनही नेता येते. संकलाची किंमत अर्थातच जास्त असते व त्यामुळे सामान्य शेतकऱ्याला ते घेणे शक्य नसते.

अनुवाहन : ट्रॅक्टराला किंवा मोटारगाडीला मागे जोडता येईल असे एंजिनविरहित वाहन. गाडी व अनुवाहन जोडण्यास विशेष प्रकारचा जोड वापरतात. त्यायोगे अनुवाहन सहज जोडता व सोडवता येते आणि ट्रॅक्टराला त्यासहित वळणेही घेण्यास त्रास पडत नाही. अनुवाहनाची चाके, निलंबन व गतिरोधक मोटारगाडीप्रमाणेच असतात. मागील बाजूस दिवे बसविलेले असतात. सामान वाहून नेण्याचे अनुवाहन एक आस आणि दोन चाके किंवा दोन आस व चार चाके लावलेले, उघड्या कायेचे असे बनवितात. उतारूंकरिता अनुवाहन मोटारीसारखे बंद कायेचे करतात व आत खुर्च्या, बाके, गाद्या, दिवे, पंखे वगैरेंची सोयही करतात. ते एक किंवा दोन मजली (अर्ध जोड स्वरूपाचे) असते. मुद्दाम पर्यटनाकरिता बनविलेल्या अनुवाहनात स्वयंपाकाची व झोपण्याची सोय केलेली असते. तेल वाहुतकीकरिता मोठाल्या टाक्या असलेली अनुवाहने करतात. त्यातून तेलाची वाहतूक करणे तेल कंपन्यांना सोईचे होते. मोठाल्या अनुवाहनाची गतिरोधक द्रवीय व्यवस्था ट्रॅक्टराच्या व्यवस्थेशी जोडलेली असते व ट्रॅक्टराच्यागतिरोधकांबरोबर अनुवाहनाचेही गतिरोधक कार्यान्वित होतात. छोट्या अनुवाहनात ट्रॅक्टराचा वेग कमी केल्याबरोबर अनुवाहनाचे यांत्रिक गतिरोधक कार्यान्वित होतील अशी व्यवस्था केलेली असते. अनुवाहनाचे उत्पादन करण्यापूर्वी त्याचा तपशीलवार अभिकल्प (आराखडा) तयार करावा लागतो व परिवहन खात्याने तो स्वीकृत केल्यावर ते खाते उत्पादनाला परवानगी देते.


भारतीय उद्योग : भारतात ट्रॅक्टर बनविण्यास सुरुवात झाली ती स्वातंत्र्याप्तीनंतरच पण उत्पादनाला गती आली ती १९६० नंतर. पाश्चिमात्यांचे तांत्रिक ज्ञान व काही प्रमाणात भांडवल यांचा उपयोग करून त्यांच्या साहाय्याने भारतात १९७६ मध्ये १३ कारखाने चालू होते. ते नवी दिल्ली, फरिदाबाद, बडोदे, मुंबई, पुणे, नासिक, बंगलोर, मद्रास येथे आहेत. १९७१ अखेरपर्यंत देशात आठच कारखाने होते व त्यात वार्षिक सु. ४०,००० ट्रॅक्टर तयार होत होते. जसजशी देशाची गरज वाढत गेली तसतशी जुन्या कारखान्यांना उत्पादन वाढीची परवानगी देण्यात आली व नवीन कारखाने काढण्यासही अनुमती देण्यात आली. या कारखान्यांत लहान-मोठे सर्व प्रकारचे साखळीपट्टा जातींसह ट्रॅक्टर बनविण्यात येतात. साखळीपट्टा जातीच्या ट्रॅक्टरांत ४८० अश.च्या जातीचाही समावेश आहे.

देशातील कारखान्यांपैकी एक पुणे येथील राजा बहाद्‌दूर मोतीलाल मिलचा असून तो गिरणीच्या अभियांत्रिकीय विभागाद्वारा चालविण्यात येतो. इतर कारखान्यांनी परदेशी तांत्रिक ज्ञानाचे साहाय्य घेतले पण या कारखान्याने स्वतःचाच अभिकल्प तयार करून व संपूर्ण स्वदेशी सामग्री वापरून आपला ट्रॅक्टर बनविला आहे. त्यात पुढील गोष्टींची खास तरतुद केली गेली आहे : (१) एकाच हस्तकाने अवजाराच्या (उदा., नांगराच्या) खोलीचे स्वयंचलित द्रवीय नियंत्रण. (२) कर्षण सामर्थ्य वाढविण्यासाठी वजन (गुरुत्वमध्यबिंदू) विस्थापित करण्याची युक्ती. (३) काम चालू असता खडक, झाडाचे मूळ यांसारखे अडथळे आले असता यंत्राचे नुकसान टाळणारी सुरक्षा व्यवस्था.

संदर्भ :

1. McColly, H. T. Martin, J. W. An Introduction to Agricultural Engineering, New York, 1995.

2. Richey, C. B. Jacobson, P. Hall, C. W., Eds. Agricultural Engineer’s Handbook,  New York, 1961.

सोमण, ना. श्री. ओगले, कृ. ह.