कचोरा : (कचरा, नरकचोरा हिं. हखीर, काली हलदी गु. कचुरो क. कचोरा सं. कर्चुर, गंधमूलक इं. झेडोरी लॅ. कुकुर्मा झेडोरिया कुल-झिंजिबरेसी). भारतात पूर्व हिमालयात व कारवारात जंगली अवस्थेत आणि इतरत्र सर्वत्र लागवडीत असलेली एक बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) लहान ⇨ ओषधी. आले व हळद यांच्या खोडाप्रमाणे हिचे जाडजूड हस्ताकृती, वलयांकित, भूमिस्थित (जमिनीतील) खोड (मूलक्षोड) आतून पिवळट असते त्याला कापरासारखा वास येतो. पाने साधी, चार ते सहा, लांब देठाची व रुंदट भाल्यासारखी, ३० — ६० सेंमी. लांब, मध्यापासून खाली जांभळट असून पावसापूर्वी येतात एप्रिलमध्ये प्रथम खोडापासून २० — २५ सेंमी. उंचीचा, आवरकांनी (खोडास वेढणाऱ्या पानांच्या देठांनी) वेढलेला कणिश फुलोरा [→ पुष्पबंध], येतो व त्यावर हिरव्या-लालसर छदांनी वेढलेली पिवळट फुले येतात त्यानंतर पाने येतात. पुष्पमुकुट नसराळ्यासारखा, ओठ गर्द पिवळा व त्रिखंडित [→ फूल] बोंड त्रिकोनी, बिया लंबगोल व पांढऱ्या अध्यावरणाने बाहेरील विशिष्ट वाढीने अंशत: झाकलेल्या असतात.
खोडात बाष्पनशील (उडून जाणारे) सुगंधी तेल असते खोड कडवट, शीतकर, सुगंधी, रक्तशुध्दी करणारे, उत्तेजक, वायुनाशी, दीपक (भूक वाढविणारे),शक्तिवर्धक व मूत्रल (लघवी साफ करणारे) असून पांढरी धुपणी व परम्यातील स्राव बंद करते. खरचटणे व मुरगळणे यांवर ते उगाळून तुरटीबरोबर लावतात. प्रसूतीनंतर स्त्रियांना शक्तिवर्धक पदार्थांतून देतात. पानांचा रस जलसंचयावर व कुष्ठावर गुणकारी. सर्दीवर याचे खोड, मिरी, दालचिनी व मध यांचा काढा गुणकारी असतो पटकीवर त्याचा रस कांद्याच्या रसातून देतात. खोडाचे चूर्ण सुगंधी मसाल्यात वाटून अंगास लावतात. खोडापासून अबीर (बुक्का) नावाची पूड करतात.
पहा : अबीर सिटॅमिनी.
परांडेकर, शं. आ.