कर्करोग : ऊतकांतील (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या म्हणजे पेशींच्या समूहांतील) कोशिकांची अत्यधिक नवोत्पत्ती झाल्यामुळे शरीराला मारक असे जे अर्बुद (गाठ) उत्पन्न होते त्याला कर्करोग असे म्हणतात. या नवोत्पन्न कोशिकांची रचना प्राकृत (सर्वसाधारण) कोशिकांच्या रचनेपेक्षा निराळी असून त्या कोशिका शरीराला निरुपयोगीच नव्हे तर हानिकारक होतात. या कोशिकांचे प्रचुरजनन (कोशिकांचे गुणन होऊन नवीन कोशिका उत्पन्न होणे) अप्रतिहत आणि अनियंत्रित असून त्यामुळे हा रोग पसरतो अथवा रक्त वा लसीकेद्वारे (ऊतकांकडून रक्तात जाणारा व रक्तद्रवाशी साम्य असलेल्या द्रव पदार्थामार्फत) शरीरातील इतर इंद्रियांत प्रक्षेप (गौण अर्बुद) उत्पन्न करून परिणामी मारक ठरतो. कर्करोग व त्याच्यामुळे उत्पन्न झालेल्या समस्या अजून पूर्णपणे समजलेल्या नाहीत. जगातील सर्व देशांत या रोगाबद्दलचे संशोधन चालू आहे.
सामाजिक महत्त्व : मानवी समाजात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे असे दिसते. हा रोग प्रामुख्याने उत्तरवयात होतो. विसाव्या शतकापूर्वी बाल व तरुण वयात मृत्यूचे प्रमाण फार मोठे असे. उत्तरवयापर्यंत पोहोचलेल्या व्यक्ती सापेक्षतेने समाजात कमी असत. त्यामुळे कर्करोगग्रस्तांचे दर हजार लोकसंख्येतील प्रमाण कमी असे. सांसर्गिक व आहारत्रुटीमुळे उत्पन्न होणारे रोग जसजसे कमी होत गेले तसतसे उत्तरवयापर्यंत पोहोचलेल्या व्यक्तींचे समाजातील प्रमाण वाढत गेले. त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसते. असे असले तरीदेखील कर्करोगाचा एकूण प्रादुर्भाव वाढत आहे असेच म्हणावे लागते.
वर्गीकरण: सर्व बहुकोशिक (अनेक कोशिका असलेल्या) प्राण्यांत कर्करोग आढळतो. भ्रूणाच्या(विकासाच्या पूर्व अवस्थेत असणाऱ्या बालजीवाच्या) बाह्य आणि अंतःस्तरापासून उत्पन्न झालेल्या त्वचा,श्लेष्मकला(श्वसन मार्ग,आतडी इ. इंद्रियांचा आतील बुळबुळीत असा ऊतकांचा थर),ग्रंथी,>मस्तिष्क(मेंदू),तंत्रिका(मज्जातंतू) इ. ऊतकांच्या मारक अर्बुदांना कर्क,तर मध्यस्तरापासून उत्पन्न होणाऱ्या स्नायू,अस्थी,तंत्वात्मक ऊतक,लसीका व लसीका पिंड(लसीका) कोशिकांच्या ऊतकांचा परिवेष्टित पुंजका) आणि रक्त यांमध्ये उत्पन्न होणार्या मारक अर्बुदांना मांसकर्क असे म्हणतात.
कारणे: कर्करोगाची कारणे अजून बरीचशी अज्ञात असली तरी (१) पूर्वप्रवृत्तिकर आणि(२) प्रेरक असे त्याचे दोन प्रकार कल्पिले जातात.
पूर्वप्रवृत्तिकर कारणे: यांमध्ये आनुवंशिकता,वंशभेद,वय,लिंग वगैरे कारणांचा अंतर्भाव होतो. या कारणांमुळे कर्करोग होतोच असे नाही,परंतु तो होण्याची प्रवृत्ती या कारणांवर अवलंबून असावी असे मानण्यात येते.
कर्करोग आईबाबांपासून मुलांना होतो असे नाही,परंतु तो होण्याची प्रवृत्ती मात्र आनुवंशिक असावी असे दिसते. आई व बाप या दोघांनाही कर्क असल्यास मुलाला कर्क होण्याची प्रवृत्ती अधिक दिसते. आजी,आई व मुलगी अशा तीन पिढ्यांमध्ये स्तनांचा कर्क झाल्याची अनेक उदाहरणे दिसतात.
काही विशिष्ट मानववंशांमध्ये विशिष्ट जातीच्या कर्करोगाचे प्राबल्य दिसते. उदा.,जपानी लोकांत जठराचा कर्क अधिक प्रमाणात दिसतो,तर त्वचेचा कृष्णकर्करोग नीग्रोंमध्ये अगदी क्वचितच दिसतो.
कर्करोग उत्तरवयात अधिक प्रमाणात दिसतो तथापि तो कोणत्याही वयात होऊ शकतो. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत डोळ्यातील तंत्रिकाधार(मज्जातंतूंना आधार देणार्या ) ऊतकांचा आणि वृक्काचा(मूत्रपिंडाचा) कर्क अधिक प्रमाणात दिसतो,तर तरुण वयात वृषणाच्या(पुरुषाच्या लिंग ग्रंथीच्या) कर्काचा संभव अधिक दिसतो. तिशीच्या पुढे सर्वच ऊतकांतील कर्काचे प्रमाण वाढत जाते.
स्त्रियांमध्ये स्तन आणि गर्भाशय यांच्या कर्काचे प्रमाण जास्त असल्यामुळे एकूण कर्कग्रस्त व्यक्तींमध्ये स्त्रियांचे प्रमाण अधिक दिसते.
प्रेरक कारणे:(१) विषाणू(व्हायरस): कर्करोग विषाणूंमुळे होत असावा असे मत अलीकडे शास्त्रज्ञांना मान्य होत चालले असले तरी सर्व कर्करोगात विषाणू सापडत नाहीत. त्यामुळे त्यासंबंधी निश्चित असे विधान करता येत नाही. विषाणू शरीरातील कोशिकांमध्ये घुसून त्या कोशिकांतील जीवद्रव्य व केंद्रक(कोशिकातील क्रियांवर नियंत्रण ठेवणारा जटिल गोलसर पुंज) यांचा नाश करतात आणि केंद्रकातील गुणसूत्रांत(आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून दुसर्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांत) विकृती उत्पन्न करून त्यामुळे कर्क उत्पन्न करतात असे मानले जाते.
(२) परजीवी(दुसर्या जीवावर उपजीविका करणार्या ) जंतूंमुळेही कर्करोग होत असावा. उदा.,यकृतातील पर्णकृमी अथवा क्षय,उपदंशादी रोगांतील व्रण.
(३) प्रारणजन्य:क्ष-किरण,जंबुपार किरण(वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य किरण),किरणोत्सर्ग(विशिष्ट मूलद्रव्यांपासून बाहेर पडणारे कण वा किरण) वगैरे प्रारणांचा(तरंगरूपी ऊर्जेचा) शरीराशी वारंवार संबंध आला तर कर्करोग झाल्याची उदाहरणे दिसतात,त्यावरून अशी प्रारणे हे एक प्रेरक कारण मानले जाते.
(४) काही रासायनिक पदार्थ कर्कजन्य(कर्करोग उत्पन्न करणारे) ठरलेले आहे. डांबर,पेट्रोल व तंबाखू यांचा धूर,धूळ आणि कारखान्यांत वापरण्यात येणारे अनेक पदार्थ कर्कजन आहेत. बेंझोपायरीन आणि फेनँथ्रेसीन हे पदार्थ या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहेत.
(५) अभिघात (शॉक): एखाद्या अवयवावर वारंवार आघात होत राहिल्यास कर्करोगाची उत्पत्ती झाल्याची उदाहरणे दिसतात. उदा.,थंडीपासून संरक्षण म्हणून शरीराजवळ शेगडी बाळगण्याची पद्धत हिमालयातील लोकांत आहे. त्यांच्यामध्ये त्वचेच्या कर्काचे प्रमाण अधिक दिसते तसेच पान व तंबाखू खाणार्यांमध्ये मुखकर्काचे प्रमाण अधिक दिसते.
उत्पत्ती: कोशिकांचे अमर्याद,विकृत आणि स्वयंप्रेरित प्रचुरजनन होत राहणे हेच कर्करोगाचे मुख्य लक्षण असते. कर्ककोशिका प्रचुरजननाशिवाय दुसरे काहीच कार्य करीत नाहीत.
फुप्फुसकर्काची उत्पत्ती पुढीलप्रमाणे होते. फुप्फुसात हवा पोहोचविणार्या श्वासनलिकेच्या अंतःस्तरांतील सर्वांत आतल्या कोशिका लोमश(सूक्ष्म केशयुक्त) असून त्यांच्या बाहेर गोलसर कोशिकांचा एक थर असतो आणि त्यांच्या बाहेर आधारकला(आधार देणारा पातळ पडदा) असते. या गोलसर कोशिकांचे प्रचुरजनन प्रथम होऊ लागून त्यामुळे आतील लोमश कोशिकांचा स्तंभाकृती आकार बदलून त्या चपट्या बनतात. त्याच वेळी त्या गोलसर कोशिकांचे प्रचुरजनन अधिक होऊन त्यांचे स्वरूप बदलते. हे प्रचुरजनन इतक्या त्वरेने होते की,कोशिकांचा आकार व गुणधर्म बदलून त्यांच्या केंद्रकांतही विकृती होते. त्यांचे रंजकधर्मही(कोशिकांच्या सूक्ष्मदर्शकाने अभ्यास करण्याकरिता वापरण्यात येणारे विशिष्ट रंग शोषण्याचे गुणधर्मही) बदलतात व हळूहळू त्या प्रचुरजनित कोशिका आधारकलेचा भेद करून आत खोलवर पसरत जातात आणि फुप्फुस-ऊतकावर आक्रमण करून त्यांचा नाश करून सर्व बाजूंस पसरत जातात.
विषाणू किंवा कर्कजनके यांच्यामुळे गोलसर कोशिकांचे प्रचुरजनन होत असावे असे मानतात. तसेच कर्कजनकांच्या कार्यामुळे शरीरातील कोणत्यातरी जागी दीर्घकालीन विनाशक्षेत्र उत्पन्न होते व हा विनाश भरून काढण्यासाठी जवळच्या क्षेत्रातील कोशिकांना प्रचुरजननाची प्रेरणा मिळत असावी. परंतु प्राकृत अवस्थेप्रमाणे त्या प्रचुरजननाला नैसर्गिक मर्यादा न राहिल्यामुळे त्या कोशिका सतत प्रचुरजननच करीत राहतात व त्यालाच कर्क असे स्वरूप मिळते. या कोशिकांच्या प्रचुरजननामुळे जो कोशिकापुंज उत्पन्न होतो,तो पुंज काही काळ सौम्य अर्बुदाच्या स्वरूपात असतो. पुढे त्याचेच पर्यवसान कर्करोगात होते. या कर्ककोशिका जरी शरीकोशिकांपासून उत्पन्न होतात तरी त्या शरीराविरुद्ध बंड करून एखाद्या परजीवीप्रमाणे वागू लागतात. आपले भरणपोषण त्या शरीरापासून ओढून घेतात परंतु शरीराला उपयुक्त असे काहीच कार्य करीत नाहीत. या कोशिकांचे प्रचुरजनन इतक्या त्वरेने होत राहते की,त्यांना पुरेसे पोषण घेण्यालाही अवसर मिळत नाही आणि त्यामुळे एकीकडे कर्क वाढत असताना दुसरीकडे पोषण कमी पडल्यामुळे त्याच्या काही भागाचा नाश होत राहतो.
स्थूलस्वरूप: बहुतेक कर्करोग एका जागीच उत्पन्न होऊन वाढत व पसरत जातात. क्वचित ते बहुकेंद्रकोत्पत्तीचेही(अनेक कोशिका एकत्र होऊन अनेक केंद्रके असलेली कोशिका तयार होण्याचेही) असू शकतात. कर्करोगाचे स्थूल स्वरूप त्याच्या वाढण्याच्या वेगावर व त्याला आधार देणार्या धारणोतकाच्या(आधार देणार्या ऊतकाच्या) प्रमाणावर व स्थितीवर अवलंबून असते. सामान्य मध्यममारक कर्काची गाठ किंचित कठीण,खडबडीत,अचाल्य(न हलणारी) आणि भोवतालच्या ऊतकांत तंतूंमुळे घुसलेली असते. तिच्या सीमा अनिश्चित असून काही कमी मारक कर्करोगाभोवती गुच्छासारखे संपूर्ण वेष्टन असू शकते. काही वेळा देठासारख्या आधाराने लोंबती गाठ असल्यासारखी दिसते. हे स्वरूप सौम्य अर्बुद होण्यापूर्वी दिसतेत्याला कर्कपूर्व स्वरूप असे म्हणतात. पुढे ते अर्बुद एकाएकी त्वरेने वाढू लागून त्याच्या कडेपासून तण निघू लागतात व हे तण शेजारच्या ऊतकांत घुसून त्यांचे स्वरूप खेकड्याच्या आकड्यांसारखे दिसते म्हणूनच या रोगाला कर्क असे नाव पडले आहे. हे तण शेजारच्या ऊतकांत रूतून बसलेले असल्यामुळे कर्काची गाठ घट्ट बसलेली अचाल्य अशी होते. कर्काच्या मुख्य पुंजात कित्येक वेळा अपकर्षक्षेत्रे (र्हास झालेला भाग) उत्पन्न होतात,त्यामुळे ह्या पुंजात ठिकठिकाणी मऊपणा आल्यासारखा दिसतो. कित्येकवेळा त्याला क्षते (भोके) पडून तेथे रक्तस्रावही होतो.या अवस्थेमध्ये कर्काचा प्रसार फक्त स्थानिकच असतो. या अवस्थेत शस्त्रक्रियेचा व किरणोत्सर्ग चिकित्सेचा चांगला उपयोग होत असल्यामुळे त्याचे निदान करणे महत्त्वाचे असते. ही संधी गमावली तर चिकित्सेचे फळ पन्नास टक्क्यांनी कमी होते.
त्वचेखाली असलेल्या कर्कपुंजामुळे त्वचा उचलली जाऊन तेथे फुगवटी दिसू लागते. पुंज वाढत गेल्यामुळे त्वचा फाटून अथवा अधःस्त्वचेत(त्वचेखालील भागात) कर्काचा विस्तार झाल्यास तेथे व्रण(जखम) उत्पन्न होतो. या व्रणाचा तळ खालच्या ऊतकाला घट्ट चिकटल्यासारखा असून त्याच्या कडा फुगीर व बाहेरच्या बाजूस वळल्यासारखा असून तो कणात्मक दिसतो. या व्रणाला कर्कव्रण म्हणतात.
फार त्वरेने वाढणारा कर्क कोशिकापुंजाचा बनलेला असून त्याचा चयापचय(सतत होणारे रासायनिक-भौतिक बदल) वेगाने चाललेला असल्यामुळे त्याला पोषकद्रव्यांचा पुरवठा भरपूर प्रमाणात लागतो,तो भोवतालच्या भागांतील वाहिन्यांच्या शाखांमधून मिळतो. या शाखा मोठ्या,फुगीर व नागमोडी असून त्यांच्यापासून निघणार्या अनेक केशिकाजालांमुळे(केसासारख्या लहान वाहिन्यांच्या जाळ्यामुळे) कर्काला रक्तपुरवठा होत असतो. रक्तपुरवठा विपुल असल्यामुळे अशा कर्काचा रंग लालसर असून तो मऊ असतो. अशा कर्कातील धारणोतकातील तंतूंची पुरी वाढ होण्यास वेळ मिळत नसल्यामुळे ते तर्कुरूपच(मध्यभाग फुगीर असून टोके निमुळती असलेले) राहतात. नवप्रसूत स्त्रियांमध्ये भरपूर दुग्धोत्पत्ती होत असताना तेथे जर कर्कोत्पत्ती झाली,तर तो कर्क मऊ व लालसर असून तो फार मारक असतोत्याला मृदुकर्क असे म्हणतात.
काही स्तनकर्क अतिशय मंदगतीने वाढतात. या कर्काला आधार देणारे धारणोतक तंत्वात्मक असल्यामुळे हा कर्क दगडासारखा कठीण असतो. त्याला कठीणकर्क म्हणतात.
आंत्रमार्गातील(आतड्यातील) कर्कव्रण फुलकोबीच्या आकृतीच्या गुच्छासारखे दिसतात. त्यांच्या वाढीमुळे आंत्रमार्ग संकुचित होतोकेव्हा केव्हा हा कर्क आंत्रात विस्तृत भागावर पसरलेला दिसतो.
सूक्ष्मरचना: कर्ककोशिका व त्यांना आधार देणाऱ्या धारणोतकांची मिळून कर्काची सूक्ष्मरचना होते.
कर्ककोशिका:कर्क ज्या ऊतकामध्ये उत्पन्न होतो त्यातील कोशिकांसारख्या दिसाणार्या च कर्ककोशिका असतात. मात्र अतित्वरेने वाढणार्या मारक कर्कातील कोशिकांची रचना लांबलांब स्तंभासारखी किंवा घनपुंजासारखी दिसते. अतिशय मारक कर्काच्या कोशिकांचे नुसते पुंजकेच दिसतात. जितका मारकपणा अधिक तितक्या कर्ककोशिका मूळच्या ऊतकातील कोशिकांपेक्षा निराळ्या दिसतात. जितका मारकपणा कमी तितक्या कर्ककोशिका प्राकृत कोशिकांसारख्याच दिसतात.
अतिशय मारक कर्काच्या कोशिका विविध आकारांच्या असून त्यांच्या रंजनक्रिया प्राकृत कोशिकांपेक्षा निराळ्या दिसतात. त्या कोशिकांची केंद्रके फुगीर,द्रवाने भरलेली आणि वारंवार विभाजन होत असल्यामुळे विभाजनाच्या विविध अवस्था असलेली अशी दिसतात. कित्येक वेळा त्या कोशिका बहुकेंद्रकी असून रंजकतंतूंनी भरलेल्या तर कित्येक वेळा जाड दाणेदार अशा रंजकतंतूंच्या असतात. केव्हा केव्हा त्या कोशिकांचे स्वरूप बृहत्कोशिकांच्या रूपात आढळते.
धारणोतक: कर्काला आधार आणि पोषण-पुरवठा करणारे ऊतक मूळ शरीरापासूनच उपलब्ध होते. या ऊतकात रक्तवाहिन्या,लसीकावाहिन्या आणि तंत्वात्मक ऊतक यांचा समावेश असतो. त्या ऊतकाला धारणोतक असे नाव असून ते कर्काच्या सर्व बाजूंनी कर्काकडे जात असल्यामुळे त्याला कर्काला जणू वेढाच पडल्यासारख्या असतो. या ऊतकाचे वाहिनीधारक पट्टे कर्काच्या अंतर्भागापर्यंत गेलेले असतात. भ्रूणाच्या बाह्य आणि अंतःस्तरापासून उत्पन्न होणार्या कर्काचे धारणोतक श्वेततंतू व लसीकावाहिन्यांच्या जाळ्यांचे बनलेले असल्यामुळे त्या जातीच्या कर्कांचे प्रक्षेप प्रथम लसीकावाहिन्यांच्या मार्गाने लसीका ग्रंथीमध्ये होतात. पुढे मात्र असे प्रक्षेप रक्तमार्गानेही होतात.
मांसकर्क भ्रूणमध्यस्तर ऊतकांपासून उत्पन्न होत असल्यामुळे मांसकर्ककोशिका स्वतःचाच रक्तमार्ग बनवितात,कारण रक्तवाहिन्याही भ्रूणमध्यस्तरापासूनच उत्पन्न होतात. मांसकर्काने बनविलेला असा रक्तमार्ग कोठे अरुंद तर कोठे अर्धमीलित असतो. त्यांच्या काठावरील मांसकर्ककोशिका कित्येक वेळा रक्तात मिसळून रक्तप्रवाहाबरोबरच शरीराच्या इतर भागांत जाऊन तेथे प्रक्षेप उत्पन्न करतात. अवटू,अधिवृक्क [→ अंतःस्रावी ग्रंथी],फुप्फुस वगैरे इंद्रियांत निसर्गतः पुष्कळ व पातळ भित्तींच्या रक्तवाहिन्या असतातम्हणून त्यांचे प्रक्षेप रक्तमार्गेच पसरतात.
कर्काची आक्रमक शक्ती: कर्काचा प्रसार त्याच्या कोशिकांच्या प्रचुरजननशक्तीच्या वेगावर आणि त्याच्या धारणोतकाच्या रचनेवर काही अंशी अवलंबून असतो. परंतु मुख्यतः हा प्रसार कर्ककोशिकांच्या जवळच्या ऊतकाचा अपकर्ष करण्याच्या सामर्थ्यावर आणि त्या जवळच्या कोशिकांची परिरोध यंत्रणा उदासीन(क्रियाहीन) करण्याच्या सामर्थ्यावर अवलंबून असतो. या दोन प्रकारांच्या सामर्थ्यामुळे कर्काला आक्रमक शक्ती येते. ही शक्ती जशी कमीअधिक असेल तसा कर्क कमीअधिक मारक ठरतो. हा प्रसार स्थानिक,लसीकेमार्गे अथवा रक्तामार्गे होतो.
या आक्रमक शक्तीमुळे कर्करोग जवळच्या ऊतकांत जेथे मऊ सापडेल तेथे तण पसरून घुसत जातो. या प्रकाराला संलग्नी प्रसार असे म्हणतात. काही कर्करोग शरीरातील आंतरावकाशातून(पोकळीतून) प्रसार पावून त्या आंतरावकाशातील इतर इंद्रियांत(अंतस्त्यांत) स्वतंत्र अशा वसाहती उत्पन्न करतात. त्याला आंतर-आंतरावकाशीय प्रसार असे म्हणतात.
कर्काचे सर्वांत भयावह आक्रमण म्हणजे कर्ककोशिका लसीका आणि रक्तवाहिन्यांच्या मार्गाने शरीरातील दूरवरच्या इंद्रियांतही जाऊन तेथे कर्कप्रक्षेप उत्पन्न करतात हे होय. या प्रक्षेप प्रसारामुळे हा रोग सर्व शरीरभर पसरून शेवटी मारक ठरतो.
कर्काच्या मारक श्रेणी: कर्करोगाच्या मारक गुणाच्या तीव्रतेनुसार त्याच्या चार श्रेणी मानलेल्या आहेत.
प्रथम श्रेणीचा कर्करोग मूळ जागीच वाढतो व त्याच्या कोशिका प्राकृत कोशिकांपेक्षा फारच थोड्या प्रमाणात बदललेल्या असतात. या श्रेणीचा कर्क शस्त्रक्रिया किंवा किरणोत्सर्गचिकित्सेने साध्य होऊ शकतो.
द्वितीय श्रेणीच्या कर्काच्या कोशिका निश्चितपणे बदललेल्या असल्या तरी त्यांची रचना पुष्कळशी सुबद्ध असते. कर्काची गाठ मोठी व अचाल्य असली,तरी त्याचे प्रक्षेप जवळच्या लसीका ग्रंथीपर्यंतच पोहोचलेले असतात. या श्रेणीचे ५० टक्क्यांपर्यंतचे रोगी शस्त्रक्रिया व किरणोत्सर्गचिकित्सा या उपायांनी बरे होऊ शकतात.
तृतीय श्रेणीच्या कर्काचा आकार बराच मोठा असून तो बाजूच्या ऊतकांत घट्ट बसलेला असतो. त्याचे प्रक्षेप जवळच्या लसीका ग्रंथींत पुष्कळ व दूरच्या लसीका ग्रंथींत थोड्या प्रमाणात झालेले असतात. रक्तमार्गाने मात्र काही प्रक्षेप झालेले नसतात. या श्रेणीतील कर्कावर शस्त्रक्रिया व किरणोत्सर्गचिकित्सा वारंवार करूनही २५ टक्क्यांपेक्षा अधिक रोग्यांना गुण येत नाही.
चतुर्थ श्रेणीचा कर्क त्वरेने वाढणारा आणि संपूर्णपणे विकृत कोशिकांचा बनलेला असून त्याचे प्रक्षेप शरीरात दूरवर पसरलेले असतात. हा कर्क असाध्य आहे.
चिन्हे आणि लक्षणे: ककरोगाबद्दल दुर्दैवाची गोष्ट अशी की,तो साध्य स्थितीत असताना त्याची लक्षात येण्यासारखी लक्षणे फारच थोडी असतात. गाठ हाताला लागणे,त्या गाठीचा दाब आजूबाजूच्या इंद्रियांवर पडून त्यामुळे उत्पन्न होणारी लक्षणे एवढीच लक्षणे प्रथम दिसतात. क्वचित तंत्रिकांवर दाब पडल्यामुळे वेदना होतात. शरीरातील पुष्कळसे रक्त कर्कच वापरीत राहिल्यामुळे अशक्तता,थकवा,कृशता वगैरे लक्षणे कर्क बराच प्रगत झाल्यावर दिसतात. शरीरातील महत्त्वाच्या इंद्रियांच्या कर्करोगाची विशिष्ट लक्षणे त्या त्या इंद्रियाच्या रोगवर्णनात दिलेली आहेत.
निदान: कर्करोगाचे निदान बरेच कठीण आहे. हा रोग विशेषतः उत्तरवयात होत असल्यामुळे त्या वयातील व्यक्तींनी विशेषतः क्ष-किरण,किरणोत्सर्ग,अणुभट्टी आणि डांबर,पेट्रोल वगैरे पदार्थांशी नेहमी संबंध येणार्या व्यक्तींनी लहानशी गाठ जरी कोठेही दिसली,तरी तीसंबंधी जागरूक राहून वेळीच तपासणी करून घेणे फार अगत्याचे आहे. त्यासाठी कर्करोगासंबंधीच्या ज्ञानाचा प्रसार जेवढा होईल तेवढे या रोगाचे निदान लवकर करणे शक्य होईल.
शरीरांतर्गत इंद्रियांतील कर्काच्या निदानाला क्ष-किरण परीक्षेची पुष्कळ वेळा मदत होते. तसेच संशयित गाठीचा अगदी लहान तुकडा सूक्ष्मदर्शकाने तपासल्यासही निदान शक्य होते. [→ जीवोतक परीक्षा]. पर्युदर(उदरातील इंद्रियांवर पसरलेला पातळ पडद्यासारखा थर),परिफुप्फुस(फुप्फुसांभोवतालचे नाजुक व द्रवयुक्त आवरण),योनी वगैरे ठिकाणी मिळणा र्या द्रवातील कोशिकांच्या स्वरूपावरूनही निदान करता येते. काही वेळा अंतर्गत इंद्रियांत सुई घालून त्या सुईतून शोषून घेतलेल्या द्रव्यातील कोशिकांच्या परीक्षणाची मदत होऊ शकते. कान,घसा,गुदद्वार,मूत्रमार्ग वगैरे ठिकाणी नळी घालून प्रत्यक्ष पाहिल्यासही निदान करणे शक्य होते.
चिकित्सा: शस्त्रक्रिया,रेडियम व इतर किरणोत्सर्गचिकित्सा वगैरे उपायांनी प्रथम वा द्वितीय श्रेणीच्या कर्काची चिकित्सा काही वेळा फलदायी ठरते. काही वेळा तात्पुरता गुण आल्यासारख्या वाटतो परंतु कालांतराने प्रक्षेप उत्पन्न होतात. त्याशिवाय फॉस्फरस,कोबाल्ट वगैरेंच्या समस्थानिकांचाही(एकच अणुक्रमांक परंतु निराळा अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकाराचाही) उपयोग करतात. [→ अणुऊर्जेचे शांततामय उपयोगप्रारण चिकित्सासमस्थानिक].
काही विशिष्ट कर्कांत प्रवर्तकांचा [वाहिन्यारहित ग्रंथींतून स्रवणार्या स्रावांचा,→ हॉर्मोने] उपयोग होतो. उदा.,अष्ठीलाकर्कामध्येस्त्रीमदजन(इस्ट्रोजेन) आणि स्तनकर्कात पौरुषजन(अँड्रोजेन) प्रवर्तकांचा उपयोग होतो.
अलीकडे काही रासायनिक औषधे उदा.,नायट्रोजन मस्टर्ड थायोटीपाटीस तयार करण्यात आली असून त्यांचा कर्ककोशिकांवर मारक परिणाम होऊन रोग साध्य – निदान तात्पुरता तरी-होणे शक्य झाले आहे.
जेथे रोगनिर्मूलन करणे शक्य होत नाही तेथे लक्षणानुवर्ती चिकित्सा करून रोग्याचे जीवन शक्य तेवढे सुसह्य करणे एवढेच करणे शक्य होते.
कर्क-संशोधन: जगातील सर्व प्रगत देशांत कर्करोगासंबंधी संशोधन चालू आहे. या संशोधनामध्ये मुख्यतः कोशिकांची अनियंतित्र उत्पत्ती का व कशी होते हे समजून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. शरीराबाहेर ऊतक कोशिकांचे संवर्धन करून व त्यांवर विविध प्रयोग करून कोशिकांच्या प्रचुरजननासंबंधी ज्ञान मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इतर प्राण्यांवर प्रयोग करून कर्करोग उत्पन्न करण्याचे प्रयत्नही चालू असून त्यामुळे कर्करोगाच्या कारणांवर प्रकाश पडण्याची शक्यता वाटते. विषाणू व त्यांच्यामुळे होणार्या विकृतींसंबंधी संशोधन चालू असून त्यातून कर्करोगासंबंधी काही निश्चित ज्ञान मिळण्याची शक्यता आहे. कोशिकांमधील डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल(डीएनए) आणि रिबोन्यूक्लिइक अम्ल(आरएनए) [केंद्रकात प्रथिनरेणूंच्या जोडीने आढळणारी जटिल कार्बनी अम्ले,→ न्यूक्लिइक अम्ले] यांचा परस्परसंबंध व विकृती याबद्दलही पुष्कळ संशोधन चालू असून त्यातूनही या रोगकारणाचा काही धागा हाती लागेल अशी शास्त्रज्ञांची कल्पना आहे. अशा तर्हेने अनेक दिशांनी कर्करोगाचे संशोधन चालू आहे.
भारतात कर्करोगविषयक संशोधन व चिकित्सा करण्यासाठी सर दोराबजी टाटा विश्वस्त मंडळाने टाटा मेमोरियल हॉस्पिटल १९४१ मध्ये मुंबई येथे स्थापन केले. हैदराबाद,मद्रास व कलकत्ता येथेही कर्करोगाचे निदान व चिकित्सा करणार्या संस्था स्थापन झालेल्या आहेत. १९५२ मध्ये कर्करोगविषयक संशोधन करण्यासाठी मुंबई येथे इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर ही संस्था स्थापन झाली. त्यानंतर तुर्भे येथील अणुऊर्जा संशोधन संस्थेचेही या संशोधनास सहकार्य लाभले. इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटरमार्फत तेथील संशोधनावर आधारलेले अनेक निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.
या संशोधनाबरोबरच कर्करोगासंबंधी साधारण जनतेत ज्ञानप्रसार करून शिक्षण देणे व कर्काचे निदान शक्य तितक्या लवकर करून त्वरित उपाय करणे,यांसाठी केंद्रे स्थापन करणे वगैरे गोष्टींवर भर देणे जरूर आहे.
मनोहर,कमलाकर
आयुर्वेदीयचिकित्सा: कर्करोगाला त्याच्या प्रकारानुसार रक्तार्बुद,मांसार्बुद व दुष्टव्रण असे म्हणता येते. ही उत्पन्न होताच उपचार केले तर बरी होऊ शकतात,पण द्विव्यर्बुद(पहिला कर्करोग झाल्यानंतर तो दुसर्या ठिकाणी झाला) किंवा अध्यर्बुद(पहिल्याच कर्कावर दुसरा कर्क झाला) तर तो असाध्य होतो. तो झाल्याबरोबर ज्या स्थानात होत असेल त्या स्थानात झालेल्या रोगाकरिता जी शीर तोडून दुष्ट रक्त काढून टाकावयाचे असते त्या शिरेतून रक्त काढून टाकावे किंवा अर्बुदावर दोषाप्रमाणे जळवा,तुंबडी किंवा शिंग ह्यांनी रक्तस्राव करावा. दोषाप्रमाणे वामक,रेचक किंवा बस्ती देऊन नेहमी कोठा साफ करीत असावे. नंतर अर्बुदविज्ञान व विविध ग्रंथींच्या विषयी असलेल्या स्वतंत्र नोंदींमध्ये सांगितलेली सर्व चिकित्सा करावी. अर्बुदहर रस,रौद्र रस,नित्यानंद रस हे अवस्था पाहून द्यावे. हीरकभस्म द्यावे.
जोशी,वेणीमाधवशास्त्री
संदर्भ : 1. Busch, H. An Introduction to the Biochemistry of the Cancer Cell, New York, 1962.
2. Harris, R. J. C. Cancer : The Nature of the Problem, Baltimore, 1962.
3. Huxley, J. Biological Aspects of Cancer, New York, 1958.
4. Petrov, N. N., Ed., Cancer : A General Guide to Research and Treatment, London, 1962.
5. खानोलकर,व. रा.अनु. कुरुलकर,ग. मा.कॅन्सरचे आलोकन, मुंबई,१९६१.
“