काटेरी मुंगीखाऊ: स्तनिवर्गाच्या मॉनोट्रेमाटा गणातील टूकिग्लॉसिडी कुलातला मुंग्या आणि वाळवी खाणारा प्राणी. याला एकिड्ना असेही नाव आहे. शास्त्रीय नाव टॅकिग्लॉसस ॲक्युलिएटस. हा एक विचित्र प्राणी आहे. सरीसृपांची (सरपटणाऱ्या प्राण्यांची) कित्येक लक्षणे याच्यात दिसून येतात.
अंसमेखला (पुढच्या पायांची जोडी वा हात हाडाच्या सांगाडयाच्या ज्या भगाशी सांधलेले असतात तो भाग) अस्थिमय, तापमान नियंत्रण अपुरे, दीर्घकाळ अन्नाशिवाय राहण्याचे सामर्थ्य, अवस्कर (आतडे, मूत्रवाहिन्या आणि जननवाहिन्या ज्यामध्ये उघडतात असा शरीराच्या मागच्या टोकाकडे असलेला समाईक कोष्ठ) व्दार, पातळ कवचाची पुष्कळ पीतक (पोषक द्रव्य) असलेली अंडी व स्वसंरक्षणाकरिता विषाचा उपयोग.
हा ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनीत आढळतो. यांची एक जाती, टॅकिग्लॉसस सेटोसस, टॅस्मेनियात आढळते. जंगलात, खडकाळ व डोंगराळ प्रदेशांत आणि सपाट रेताड जागी हे असतात. बिळात किंवा खडकांच्या कपारीत ते राहतात.
डोक्यासकट शरीराची लांबी सु.३५-५५ सेंमी. शेपटीची सु.१० सेंमी. प्रौढ प्राण्याचे वजन ३-६ किग्रॅ. बहुते शरीर कंटकांनी (काटयांनी) झाकलेले असते, कंटकांची लांबी सह सेंमी. पर्यंत त्यांची बुडे पिवळी व टोके काळी असतात क्वचित सबंध कंटक पिवळा असतो हे विशिष्टीभूत (विशेष कार्याकरिता रुपांतर झालेले) केस असून पोकळ असतात कंटकांच्या मधूनमधून केस असतात. शरीराच्या खालच्या बाजूवर कंटक नसतात ती मऊ केस व दृढ रोमांनी (दाट लवीने) आच्छादिलेली असते. मुस्कट लांब असते जीभ लांब, बारीक व चिकट असून तिचा उपयोग मुंग्या व वाळवी पकडण्याकरिता होतो. पायांवर प्रत्येकी पाच बोटे असून त्यांच्या टोकांवर मजबूत चपटे नखर (नख्या) असतात. नराच्या टाचेकर आर असून ती विषग्रंथीला जोडलेली असते.
एकिड्ना संध्याकाळी व रात्री बाहेर पडतो. स्वसंरक्षणाकरिता बिळातल्या मातीत नखर व कंटक खोल सुपसून घट्ट चिकटून असतो किंवा अंगाचे चेंडूसारखे वेटोळे खणून त्यांतील वाळवी व मुंग्या आपल्या लांब, चिकट जिभेने तो टिपतो. याचे तोंड लहान असून दात नसतात.
याच्या शरीराचे तापमान इतर सस्तन प्राण्यांच्या तापमानापेक्षा कमी असते आणि पर्यावरणाच्या (सभोवतालच्या परिस्थितीच्या) तापमानाच्या बदलांप्रमाणे ते थोडेफार बदलते. हिवाळयात आणि बहुधा उन्हाळयात हा शीत व ग्रीष्मसुप्तीत (विश्रांतीत) जातो.
प्रजोत्पादनाच्या काळात मादीच्या उदरावर चंद्रकोरीच्या आकृतीची त्वचेची एक दुमड उत्पन्न होऊन तिची पिशवी बनते. मादी एकच अंडे घालते व अवस्करातून ते बाहेर पडल्यावर ती ते या पिशवीत ठेवते. अंड्यात पीतकाचा मोठा साठा असतो व त्याचे कवच लवचिक, पातळ चामड्यासारखे असते. अंडे फुटून बाहेर पडलेले पिल्लू, त्याच्या अंगावर केसांचे आवरण तयार होईपर्यंत पिशवीतच राहते. मादीच्या स्तनातून पिशवीत दूध पडते व पिशवीतील केसांचे झुपके चोखून पिल्लू ते पिते. स्तनांना बोंडशी नसते.
पाळलेला एकिड्ना ५० वर्षापेक्षा जास्त जगल्याची नोंद आहे. याला माणसाशिवाय दुसरा शत्रू नाही. ऑस्ट्रेलियातील आदिवासी याचे मांस खातात.
न्यू गिनीमध्ये एकिड्नाच्या आणखी तीन जाती आढळतात पण त्या झॅगलॉसस वंशाच्या आहेत. यापैकी झॅगलॉसस बु्रइज्नाथ ही सगळया न्यू गिनीत आढळते. बाकीच्या दोन काही भागांतच आढळतात. झॅगलॉसस वंशातील मुंगीखाऊचे मुस्कट लांब नळकांड्यासारखे व खाली वाकलेले असते त्याच्या अंगावरील कंटक टूकिग्लॉससापेक्षा अखूड आणि बोथट असून दाट नसतात. कंटकांचा रंग पांढऱ्यापासून काळयापर्यंत कोणत्याही छटेचा असतो.
कर्वे, ज.नी.
“